नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : ईएसआय (ESI) आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांच्या घरापासून 10 किलोमीटरच्या अंतरापर्यंत ईएसआयसी रुग्णालय (ESIC Hospital) नसल्यास तो कर्मचारी राज्य विमा महामंडळाने नियुक्त केलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाऊ शकतो. ही माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार ईएसआय योजना नव्या क्षेत्रातही विस्तारित झाल्याने ईएसआय लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे, ईएसआय सदस्यांना त्यांच्या स्वत: च्या निवासस्थानाभोवती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधांचा विस्तार बळकट करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.
निवेदनात म्हटलं आहे की, सध्या ईएसआय रुग्णालय किंवा मेडिकल आणि विमा काढलेले वैद्यकीय चिकित्सक (आयएमपी) १० किमीच्या अंतरात नसल्यामुळे काही भागात वैद्यकीय सुविधा मिळण्यास लाभार्थ्यांना त्रास होत आहे. अशा क्षेत्रात आता ईएसआयच्या लाभार्थ्यांना देशातील ईएसआयसीच्या रूग्णालयातील आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी लाभार्थ्याला कोणत्याही ईएसआयसी रुग्णालय किंवा मेडिकलची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अशा क्षेत्रातील ईएसआय लाभार्थ्यांना ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सेवा विनामुल्य मिळवण्यासाठी रुग्णालयात जावं लागेल. ईएसआय ई-ओळखपत्र / आरोग्य पासबुकसोबत आधार कार्ड किंवा शासनाने दिलेलं ओळखपत्र यावेळी दाखवावं लागेल. अशा लाभार्थ्यांना ओपीडीमध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे पैसे परत घेण्याची सुविधा असेल. ही सुविधा मिळविण्यासाठी लाभार्थ्याला दवाखाने, शाखा कार्यालय किंवा ईएसआयसी क्षेत्रीय कार्यालयात जावे लागेल. निवेदनात म्हटले आहे, की जर लाभार्थ्याला रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असेल तर पॅनलमधील दवाखान्यांना 24 तासांच्या आत ऑनलाईन पद्धतीनं ईएसआयच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. जेणेकरुन लाभार्थ्याला कॅशलेस सुविधा पुरवणं शक्य होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.