मुंबई, 21 जानेवारी- अंडी हा प्रथिनांचा सर्वांत चांगला स्रोत मानला जातो. प्रथिनाशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्सदेखील असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. तसंच अंडी खाल्ल्यामुळे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. अंडी घालून एखादी डिश बनवणं खूप सोपं आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण अंडी मोठ्या आवडीनं खातात. एका अंड्यामध्ये 6.3 ग्रॅम प्रथिनं, 69 मिलीग्राम पोटॅशियम, 5.4 टक्के व्हिटॅमिन ए, 2.2 टक्के कॅल्शियम आणि 4.9 टक्के लोह असतं. रोज अंडी खाल्ल्यानं हाडे मजबूत होतात, शिवाय बुद्धीही तीक्ष्ण होते, असे म्हटलं जातं.
स्नायूंना बळकट करण्यासाठी, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडी खाणं फायदेशीर ठरतं. एकंदरीतच, अंड्याचे विविध फायदे सांगता येतील. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांसाठी अंडी खाणं खूपच हानिकारक आहे. त्याचबरोबर अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनीसुद्धा अंड्याचं सेवन करण्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. चला तर, आज आपण जाणून घेऊया कुणी अंडी खाणं टाळावं.
(हे वाचा:...तर पूर्णान्न समजलं जाणारं दूधही तुमच्या आरोग्यासाठी घातक; आहारतज्ज्ञांनीच सांगितलं कारण )
डायबेटिस असणाऱ्यांनी सावध राहावं
डायबेटिसच्या रुग्णांनी अंडी खाण्यापासून दूर राहणं, फायद्याचं ठरतं. मात्र, याबाबत शास्त्रज्ञांचं मत वेगवेगळं आहे. एनसीबीआय वर प्रकाशित झालेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी असं म्हटलं आहे की, अमेरिकेमध्ये जे लोक दर आठवड्याला तीन किंवा अधिक अंडी खातात, त्यांना डायबेटिस होण्याचा धोका 39 टक्क्यांपर्यंत वाढतो. चीनमध्ये, जे लोक नियमितपणे अंडी खातात त्यांना डायबेटिस होण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला डायबेटिस असेल तर तुमच्या डॉक्टरांकडून तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश किती करावा, याबाबत सल्ला घ्यावा. कारण डायबेटिसच्या रुग्णांनी किती प्रथिनं घ्यावीत, याबद्दल डॉक्टर योग्य सल्ला देऊ शकतात. तसंच जर तुमचं वजन जास्त असेल, तर तुम्ही अंडी खाणं टाळावं.
पचनशक्ती कमकुवत असेल
साल्मोनेला (Salmonella) हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे अतिसार, उलट्या, ताप, डोकेदुखी, मळमळ असे आजार उद्भवतात. यामुळे अन्नातून विषबाधा होते. कोंबडीच्या संक्रमित विष्ठेच्या संपर्कात अंडी आणि अंड्याचे कवच आल्यास ते साल्मोनेला बॅक्टेरियानं दूषित होतं. अशी अंडी खाल्ली आणि तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. अशावेळी अंडी नेहमी धुतल्यानंतर खा.
कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास अंडी खाणं टाळा
वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते,उच्च कोलेस्टेरॉलमुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यात अडथळा येऊ शकतो. अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉल आढळते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, जास्त कोलेस्टेरॉल खाल्ल्यानं आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला आधीच कोलेस्टेरॉलची समस्या असेल, तर तुम्ही अंडी खाणं टाळावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Lokmat news 18