मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Types of Heart disease : तुम्ही फक्त हार्ट अटॅकचंच टेन्शन घेताय; तुम्हाला माहिती नसतील असे हृदयाचे आजार

Types of Heart disease : तुम्ही फक्त हार्ट अटॅकचंच टेन्शन घेताय; तुम्हाला माहिती नसतील असे हृदयाचे आजार

types heart diseases

types heart diseases

बहुतेक जण हृदयविकाराला एक स्थिती मानतात. परंतु हृदयविकार हा अनेक भिन्न कारणं आणि परिस्थितींचा एक समूह असतो.

मुंबई, 02 ऑगस्ट : हृदय (Heart) हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित कोणताही विकार (Disease) गंभीर मानला जातो. कारण त्यामुळे प्रसंगी मृत्यूही (Death) ओढवू शकतो. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे हृदयाच्या विकारांचं प्रमाण वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Heart Attack) मृत्यूचं प्रमाणदेखील लक्षणीय आहे. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली, आनुवंशिकता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, तसंच अन्य विकारांवरच्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी योग्य आहार, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा व्यायाम, नियमित वैद्यकीय सल्ला, ताण-तणाव टाळण्यासाठी योगासनं, मेडिटेशनसारखे उपाय करणं हितावह ठरतं. हृदयविकारांचा विचार करता अमेरिकेत कोरोनरी आर्टरी डिसीजच्या (Coronary Artery Disease) रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. या विकारात हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर (Blood Supply) परिणाम झाल्याचं दिसून येतं. हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा त्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोरोनरी आर्टरी डिसीजशिवाय हृदयविकाराचे अन्य काही प्रकार आहेत. या प्रकारांविषयीची माहिती सविस्तर जाणून घेऊ या. हृदयविकारामुळे हृदयाची रचना आणि कार्यावर परिणाम होतो. बहुतेक जण हृदयविकाराला एक स्थिती मानतात. परंतु , हृदयविकार हा अनेक भिन्न कारणं आणि परिस्थितींचा एक समूह असतो. तुमच्या हृदयावर कोणता आणि कसा परिणाम झाला आहे, हे हृदयविकाराच्या प्रकारावरून समजतं. हृदयविकाराच्या प्रकारांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात व्हॅस्क्युलर डिसीज, हार्ट ऱ्हिदम डिसीज, जन्मतः हृदयात दोष असणं, हार्ट व्हॉल्व्ह डिसीज, डिसीज ऑफ हार्ट मसल्स आणि हार्ट इन्फेक्शन अर्थात हृदयाचा संसर्ग यांचा समावेश होतो. हेही वाचा - Cancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का? कसा होतो कर्करोगावर उपचार? कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात व्हॅस्क्युलर डिसीज (Vascular Disease) : हृदयविकाराच्या या प्रकारात धमनीकाठिण्य दिसून येतं. जेव्हा रुग्णाच्या हृदयातल्या धमन्या अरुंद किंवा ब्लॉक होतात, तेव्हा त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. हा हृदयविकाराचा सर्वसामान्य प्रकार मानला जातो. हा प्रकार हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतो. रक्तप्रवाह खंडित झाल्यानं, रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या कार्यावर परिणाम झाल्याचं दिसून येतं. छातीत वेदना होणं, छातीत जडपणा जाणवणं, खांदे, हात, जबड्याला वेदना होणं अशी लक्षणं या विकारात दिसून येतात. एलडीएल कोलेस्टेरॉल (LDL cholesterol) वाढणं, एचडीएल कोलेस्टेरॉल (HDL cholesterol) कमी होणं, हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), डायबेटिस, आनुवंशिकता, व्यसन, लठ्ठपणा आदी बाबी या आजाराला कारणीभूत ठरतात. हार्ट ऱ्हिदम डिसॉर्डर (Heart Rhythm Disorder) : या विकारात हृदयाची धडधड खूप हळू किंवा खूप जलद होते. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानं ही समस्या निर्माण होते. हार्ट ऱ्हिदम डिसॉर्डरचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु, हा विकार हृदयविकाराच्या झटक्यासाठी सूचक मानला जातो. छातीत वेदना होणं, डोकं हलकं वाटणं, डिझीनेस, दृष्टी अंधूक होणं, अस्वस्थ वाटणं ही या विकाराची प्रमुख लक्षणं आहेत. हार्ट व्हॉल्व्ह डिसीज (Heart Valve Disease) : मानवी हृदयाला 4 झडपा अर्थात व्हॉल्व्ह असतात. रक्ताचं पंपिंग योग्य रीतीनं सुरू राहण्यासाठी त्या एकत्रित काम करतात. हार्ट व्हॉल्व्ह डिसीजमध्ये यातल्या एका किंवा सर्व झडपांमध्ये दोष निर्माण झाल्याचं दिसतं. या झडपा अरुंद होणं अर्थात स्टेनोसिस, लीक होणं, अयोग्य पद्धतीनं बंद होणं यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येतो. झडपांच्या कार्यात दोष निर्माण झाल्यास थकवा येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, हृदयाचे ठोके अनियमित होणं, पाय आणि घोट्यावर सूज येणं, छातीत वेदना होणं, दृष्टीवर परिणाम होणं ही लक्षणं दिसतात. हेही वाचा -Mild Heart Attack : हृदयविकाराचा झटका कधी येतो? 'ही'आहेत हृदय विकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणं डिसीज ऑफ हार्ट मसल्स (Disease Of Heart Muscle) : डिसीज ऑफ हार्ट मसल्सला कार्डियो मायोपॅथी (Cardiomyopathy) असंही म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना इजा झाल्यास किंवा स्नायूंना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास हा विकार होतो. कोणतंही काम करताना किंवा आराम करताना श्वास घेण्यास त्रास होणं, पायांवर सूज येणं, थकवा, हृदयाचे ठोके सदोष असणं, डिझीनेस ही या विकाराची सामान्य लक्षणं आहेत. हार्ट इन्फेक्शन (Heart Infection) : एंडोकार्डायटिस हा एक संसर्ग असून, हा हृदयाच्या कक्षा, हृदयाच्या झडपांमधल्या आतल्या भागावर परिणाम करतो. ताप येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा किंवा अशक्तपणा, पाय आणि ओटीपोटात सूज येणं, हृदयाच्या ठोक्याची गती बदलणं, कोरडा खोकला, त्वचेवर व्रण येणं ही हार्ट इन्फेक्शनची सर्वसामान्य लक्षणं आहेत. जन्मतः हृदयात दोष असणं : हादेखील हृदयविकाराचा एक प्रकार मानला जातो. जन्मतः हृदयात दोष असेल तर तो जन्मानंतर जाणवू लागतो. हा विकार असणाऱ्या बालकांमध्ये त्वचा फिकट राखाडी किंवा निळी होणं, डोळ्याखाली, पायांना आणि ओटीपोटात सूज येणं, अर्भकास स्तनपान किंवा आहार घेताना श्वासोच्छवासाचा त्रास होणं, वजन कमी होणं ही लक्षणं दिसून येतात. हा विकार कमी तीव्रतेचा असेल तर बालपणी किंवा तरुणपणात काही लक्षणं दिसून येऊ शकतात. हृदयविकाराचा कोणताही प्रकार गंभीर आणि जीवघेणा असतो. त्यामुळे याबाबत कोणतंही लक्षण दिसल्यास तातडीनं वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेणं आवश्यक असतं.
First published:

Tags: Health, Heart risk, Lifestyle, Serious diseases

पुढील बातम्या