मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Corona चा नवा व्हेरिएंट B.1.1.529 HIV बाधितापासून विकसित झाला? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Corona चा नवा व्हेरिएंट B.1.1.529 HIV बाधितापासून विकसित झाला? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Coronavirus new variant: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या B.1.1529 व्हॅरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या आफ्रिकेमध्ये B.1.1.529 ची 22 प्रकरणं आहेत.

Coronavirus new variant: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या B.1.1529 व्हॅरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या आफ्रिकेमध्ये B.1.1.529 ची 22 प्रकरणं आहेत.

Coronavirus new variant: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या B.1.1529 व्हॅरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या आफ्रिकेमध्ये B.1.1.529 ची 22 प्रकरणं आहेत.

    जोहान्सबर्ग, 26 नोव्हेंबर : गेल्या दोन वर्षांपासून पसरलेल्या कोरोना महामारीचा वेग आता आटोक्यात आला असला, तरी जगाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरस नवीन व्हॅरिएंटसह पुन्हा आक्रमण करत आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) एक नवीन प्रकार (Variant) नुकताच आढळून आला आहे. या प्रकारामध्ये संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर 2021) संबंधित प्रकाराच्या 22 नवीन रुग्णांची नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

    लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधले (imperial college London) विषाणूशास्त्रज्ञ (Virologist) डॉ. टॉम पीकॉक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हायरसच्या नवीन स्वरूपाचे तपशील (B.1.1.529) पोस्ट केले होते. त्यानंतर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी व्हायरसच्या या प्रकारावर संशोधन करण्यास सुरुवात केली. अद्याप यूकेमध्ये हा प्रकार आढळला नसल्यानं चिंतेचं कारण नाही, असं सांगण्यात आलं. अद्याप त्याचं औपचारिकपणे वर्गीकरण करण्यात आलेलं नाही.

    जगभरातले शास्त्रज्ञ आता वेगानं पसरणाऱ्या विषाणूच्या नवीन प्रकाराचा पॅटर्न तपासणार आहेत. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेतल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस'नं (NICD) दुजोरा दिला आहे की, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या B.1.1529 व्हॅरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. सध्या आफ्रिकेमध्ये B.1.1.529 ची 22 प्रकरणं आहेत.

    वाचा : दक्षिण आफ्रिकेत COVID-19 चा आढळला नवा व्हेरिएंट, भारत सरकारनं जारी केले निर्देश

    'दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हॅरिएंट आढळून आला आहे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. अद्याप डेटा मर्यादित असला, तरी आमचे तज्ज्ञ हा नवीन व्हॅरिएंट समजून घेण्यासाठी सातत्यानं काम करत आहेत. विषाणूचा B.1.1.529 व्हॅरिएंट सर्वप्रथम आफ्रिका खंडातल्या बोटस्वाना येथे आढळला होता. जिनॉमिक सिक्वेन्सिंगद्वारे तपासलं असता आतापर्यंत या व्हॅरिएंटची लागण झालेली 22 प्रकरणं समोर आली आहेत,' अशी माहिती एनआयसीडीचे (NICD) कार्यकारी संचालक प्रोफेसर एड्रियन पुरेन यांनी दिली.

    कुठल्या देशांमध्ये आढळले रुग्ण

    11 नोव्हेंबर रोजी बोटस्वानामध्ये विषाणूच्या B.1.1.529 व्हॅरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तीन दिवसांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच प्रकारचे रुग्ण दिसून आले. हाँगकाँगमध्येदेखील याच व्हॅरिएंटची लागण झालेले रुग्ण सापडल्याची अधिकृत नोंद झाली आहे. हाँगकाँगमधली 36 वर्षीय एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेत गेली होती. 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत ती आफ्रिकेत राहिली होती. मायदेशी परतल्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी क्वारंटाइन असताना नवीन व्हॅरिएंटची लागण झाल्याचं लक्षात आलं.

    वाचा : दक्षिण आफ्रिका-बोत्स्वानामध्ये नवीन विषाणूचा कहर! WHO ने बोलावली उच्चस्तरीय बैठक

    संक्रमणाचा वेग जास्त का आहे?

    नवीन व्हॅरिएंटमध्ये आढळलेल्या म्युटेशन P681H ची नोंद, अल्फा (Alpha), एमयू, काही गामा आणि B.1.1.318 या प्रकारांमध्येही झाली आहे. या नवीन प्रकारात N679K म्युटेशनदेखील आहे, ज्याची इतर अनेक प्रकारांमध्ये नोंद झालेली आहे. नवीन व्हॅरिएंटमध्ये N501Y नावाचं म्युटेशन झालं आहे, ज्याला 'व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून सूचीबद्ध करण्यात आलं आहे. अभ्यासकांच्या मते, ही विविध म्युटेशन्स नवीन व्हॅरिएंटला अधिक संसर्गजन्य बनवतात. यामुळे हा व्हायरस मानवी अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम 2(ACE2) या रिसेप्टर्सच्या संपर्कात येतो.

    शास्त्रज्ञांच्या चिंतेचं कारण काय?

    शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे, की नवीन व्हॅरिएंटमध्ये आढळलेली म्युटेशन्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या वलयाला सहज भेदू शकतात. त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडू शकते. आतापर्यंत तीन देशांमध्ये फक्त 22 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तरीदेखील या बातमीनं तज्ज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरस म्युटेशन व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीला सहज पराभूत करू शकतं, हेच त्यामागचं कारण आहे.

    वाचा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी Social Distancing पुरेसं नाही! संशोधनात म्हणतात..

    एड्सग्रस्तातील क्रॉनिक इंफेक्शनमुळं विकसित झाला नवीन व्हेरियंट ?

    हिंदुस्तान टाइम्समधल्या वृत्तानुसार, कॉम्प्युटेशनल सिस्टीम्स बायोलॉजीचे प्राध्यापक आणि यीसीएल (UCL) जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रँकोइस बॅलॉक्स यांनी इशारा दिला, की कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला झालेल्या दीर्घकालीन संसर्गादरम्यान नवीन व्हॅरिएंट विकसित झाल्याची शक्यता आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेली ही व्यक्ती कदाचित एचआयव्ही / एड्सचा रुग्ण आहे, जिनं अद्याप उपचार सुरू केले नाहीत, अशी माहिती सायन्स मीडिया सेंटरच्या प्रेस रिलीझमध्ये बॅलॉक्स यांनी दिली.

    आतापर्यंत कोविड-19चे किती व्हॅरिएंट्स आले समोर?

    जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोना विषाणूचे 4 व्हॅरिएंट्स समोर आले आहेत. अल्फा ( बी.1.1.7, यूके व्हेरियंट), बीटा ( बी.1.351, दक्षिण आफ्रिका व्हॅरिएंट), गॅमा ( पी. 1, ब्राझील व्हॅरिएंट) आणि डेल्टा (वंश बी.1.617.2) यांचा त्यामध्ये समावेश आहे.

    First published:

    Tags: Coronavirus, South africa