मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना महासाथीत Brain Fog चा धोका; काय आहे ही समस्या, यातून कसं बाहेर पडायचं?

कोरोना महासाथीत Brain Fog चा धोका; काय आहे ही समस्या, यातून कसं बाहेर पडायचं?

फोटो सौजन्य - shutterstock

फोटो सौजन्य - shutterstock

ब्रेन फॉगच्या (Brain Fog) स्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर हे पाच उपाय महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मुंबई, 25 मार्च : कोरोना साथीमुळे (Coronavirus Pandemic) गेली दोन वर्षं सर्वच जण विविध निर्बंध, अस्थिर परिस्थिती, एकटेपणा, ताणतणाव अशा परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यातून अनेकांना विस्मरण, अव्यवस्थितपणा असे त्रास होत असल्याचं आढळून आलं आहे. या स्थितीला ब्रेन फॉग (Brain Fog) असं संबोधलं जात आहे. या स्थितीतून बाहेर पडायचं असेल, तर हे पाच उपाय महत्त्वाचे असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मानसशास्त्रज्ञ जिल सुटी यांनी 'ग्रेटर गुड डॉट बर्कले डॉट एज्यु'वर एक सविस्तर लेख  लिहिला आहे. जिल सुटी यांनी या समस्येचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या मैत्रिणीच्या रूपात अनुभवलं. त्याचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलं, की एके दिवशी त्यांना त्यांची मैत्रीण क्रिस्टिना हिनं सांगितलं, की तिनं तिच्या पतीला त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर अनवधानाने कोंडून ठेवलं. तो खाली आहे हे तिला माहीत होतं; पण रात्री दाराला कुलूप लावताना ती ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी पतीने त्याला बाहेर काढण्याचा संदेश तिच्या मोबाइलवर पाठवला, तेव्हा तिला आपण काय केलं आहे याची जाणीव झाली.

आपण आपल्या नवऱ्याशी असं वागलो यावर क्रिस्टिनाचा स्वत:चाही विश्वास बसत नव्हता. तिनं जे काही केलं होतं त्याची तिला त्या क्षणी किंवा नंतरही जाणीव नव्हती, असं तिनं सांगितलं.

हे वाचा - Alert! नव्या कोविड व्हेरिएंटमुळे Corona 4th Wave चं संकट; महाराष्ट्रातही आढळले रुग्ण

जिल म्हणतात, 'अलीकडच्या काळात अनेकांना एकाग्रता साधण्यास, निर्णय घेण्यात (Decision Making) किंवा गोष्टी लक्षात ठेवण्यात त्रास होत असल्याचे अनेक किस्से ऐकण्यात येत आहेत. क्रिस्टिनाच्या अनुभवातून मी स्वत: ते बघितलं. किल्ल्या भलतीकडेच ठेवणं, हरवणं, भेटीच्या वेळा विसरणं, रिकाम्या खोल्यांमध्ये लाइट लावणं आणि विसरून जाणं अशा गोष्टी माझ्याबाबतीत घडत असल्याचाही मी अनुभव घेतला आहे. असे प्रकार बहुतांश वेळी तेव्हा घडतात, जेव्हा कामावर माझं लक्ष केंद्रित होत नाही किंवा वेळेत गोष्टी पूर्ण होण्याची खात्री वाटत नाही. ऑनलाइन वेळ घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. मी बातम्या वाचतो, खरेदी करतो, काम करतो, अगदी झूमद्वारे समूहात मिसळतो. अशा वेळी तुम्ही सतत स्क्रीनकडे टक लावून पाहत असता. सध्या युक्रेन युद्धामुळे तुम्ही युक्रेनमध्ये घडणाऱ्या घटना पाहत असाल, तर त्या संदर्भात अनेक बातम्या, व्हिडिओ यांचा मारा होत असल्याचं लक्षात येईल. सतत या विषयावरचे व्हिडिओ, बातम्या बघून, ऐकून ताण येतो, एकप्रकारचा थकवा येतो.'

आता साथीचं सावट ओसरलं असलं, तरी भावनिक संतुलन राखणं (Emotional Balance) अनेकांना आव्हानात्मक ठरत आहे. या साथीमुळे सर्वांची झोप (Sleep) उडाली आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. लक्ष विचलित होणं, स्मरणशक्ती (Memory) कमी होणं किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी झाल्याचं दिसून येतं. अनेक जण आजही 'ब्रेन फॉग'च्या रूपात त्याची किंमत मोजत आहेत. या साथीमुळे अनेकांच्या आकलनशक्तीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, नियोजन करण्याची क्षमता आणि आणखी अनेक क्षमता कमी झाल्या आहेत. वृद्ध व्यक्तींना (Senior Citizen) याचा त्रास अधिक होत असला, तरी सध्याच्या काळात तरुणाईतही ब्रेन फॉगचा त्रास वाढल्याचे दिसत आहे.

हे वाचा - Relieve stress : स्ट्रेस घालवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे; संशोधनातूनही आता झालं स्पष्ट

हा त्रास कमी करण्यासाठी खालील पाच उपाय महत्त्वाचे आहेत.

बातम्या बघण्याबद्दल अधिक जागरूक व्हा

वर्तमानपत्रं, टीव्हीवरच्या बातम्या आणि अनेक सोशल मीडिया साइट्स (Social Media) जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून पैसे कमावण्याचं काम करत आहेत. यात नकारात्मक बातम्यांचं प्रमाण अधिक आहे. सतत अशा बातम्या ऐकल्या, बघितल्यानं निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. सध्या तर कोविडसह, युक्रेनमधलं युद्ध, तसंच हवामानबदलाचे गंभीर परिणाम अशा समस्यांमुळे भविष्याबद्दल चिंता निर्माण होत आहे. त्याचा परिणाम मेंदूवर होत आहे.

हा ताणतणाव कमी करायचा असेल आणि बुद्धी तीक्ष्ण ठेवायची असेल, तर सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचे मार्ग अवलंबणं आवश्यक आहे. बातम्यांचा आपल्यावर कमीत कमी परिणाम होऊ देणं टाळू शकतो. उदाहरणार्थ, युक्रेनमध्ये काय घडत आहे याविषयी सोशल मीडियावर अपडेट वाचल्यानंतर, तुम्ही 24-तास टीव्हीवरच्या बातम्या पाहणं टाळू शकता. तसंच तुम्ही सोशल मीडियाचा वापरही मर्यादित करू शकता, त्यामुळे एकटेपणा, नैराश्य आणि चिंता कमी होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानापासून काही काळ फारकत घेतल्यास, कामावर आणि इतर ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

नियमितपणे व्यायाम करा :

तणाव दूर करण्यासाठी किंवा नैराश्याशी लढा देण्यासाठी सर्वोत्तम साधनांपैकी एक म्हणजे व्यायाम (Exercise). व्यायाम केल्यानं मेंदूसह आपल्या संपूर्ण शरीरातून रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. एकाच ठिकाणी हालचाल न करता दीर्घकाळ बसण्यामुळेही स्मृतिभ्रंश, तसंच समन्वय साधण्यात अडथळा येणं अशा समस्या उद्भवतात. नियमित व्यायाम केल्यानं आकलनशक्ती सुधारते. अगदी मध्यम प्रकारच्या व्यायामामुळेदेखील नीट विचार करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या घराजवळ एखादं उद्यान किंवा मोकळी जागा असल्यास, अशा हिरव्यागार ठिकाणी जरूर फिरा. यामुळे आकलनशक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो.

इतरांशी कनेक्टेड राहा

कोविड लॉकडाउन (Lockdown) काळात घरातच राहण्याची वेळ आल्यानं सर्वांना समाजात, समूहात मिसळण्याच्या (Sociliazing) अनुभवापासून दीर्घ काळ वंचित रहावं लागलं. हे लादलेलं एकटेपण अनेकांना त्रासदायक ठरलं. याचा परिणाम अनेकांच्या आकलनशक्तीवर झाल्याचं दिसून आलं.

हे वाचा - OMG! डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच शिवला तिचा हात; धक्कादायक आहे कारण

स्कॉटलंडमधल्या संशोधकांनी एका अभ्यासात 18-72 वर्षं वयोगटातल्या 342 प्रौढांची चाचणी केली. लॉकडाउनचे निर्बंध लागू होते तेव्हा आणि नंतर ते कमी झाले तेव्हाही चाचणी करण्यात आली. यात सहभागी झालेल्या व्यक्तींना काही ऑनलाइन टास्क देण्यात आले होते. त्यात त्यांचं लक्ष, स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, वेळेचा अंदाज आणि शिकण्याची कौशल्यं यांचं मोजमाप करण्यात आलं. यात असं आढळलं, की ज्या व्यक्तींना फार कमी काळ इतरांपासून दूर राहावं लागलं, ज्यांना समाजात, समूहात मिसळण्याची अधिक संधी मिळाली त्यांच्या आकलनशक्तीवर फार परिणाम झाला नाही. व्यायामाचा अभाव आदी कारणंही यामागे असू शकतात.

अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांनुसार, निर्णयक्षमता, आकलनक्षमता चांगली राहण्यासाठी सर्वांना समाजात, समूहात राहण्याची संधी मिळणं आवश्यक आहे. शार्प ब्रेन्स गाइड टू ब्रेन फिटनेस, एजलेस ब्रेन आणि किप शार्प अशा पुस्तकांमधून आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही टिप्स मिळू शकतील. निसर्गाजवळ राहणं मेंदूसाठी कसं चांगलं असतं ते जाणून घ्या.

नवीन आव्हानं स्वीकारा :

वृद्ध नागरिकांना असे त्रास होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यावर मात करण्यासाठी काही तरी आव्हानात्मक, नवीन गोष्टी शिकणं (Learn New Things) अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, भविष्यात ग्रीसला जाण्याची इच्छा असल्यानं मी या काळात ग्रीक भाषा शिकू लागलो. हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं; पण यामुळे स्मृतिभ्रंश टाळण्यास मदत होईल. नवीन वाद्य वाजवणं, कथा, कविता लिहिणं, इतिहासाचा अभ्यास करणं, सुतारकाम करणं अशा अनेक नवीन गोष्टी ज्यांनी शिकल्या असतील अशा व्यक्तींचा शोध घ्या. तुम्हालाही हुरूप येईल.

हे वाचा - चेहऱ्याच्या या भागात वेदना जाणवत असतील तर दुर्लक्ष नको; Heart Attack मध्ये असं लक्षण दिसून आलंय

नवीन, आव्हानात्मक मार्गांनी मेंदू वापरणं हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं आहे; मात्र तुम्हाला तुमच्या रोजच्या गोष्टी करताना त्रास होत असेल तर अशा नवीन, आव्हानात्मक गोष्टी टाळाव्यात. अशा वेळी तुमचा फिरायला जाण्याचा नेहमीचा मार्ग सोडून नवीन मार्ग शोधणं, एखादी नवीन रेसिपी करून पाहणं यामुळे मेंदूला चांगला व्यायाम होईल.

स्वतःवर प्रेम करा

ब्रेन फॉगमुळे तुम्ही काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते शक्य होत नसेल तर त्यावरून स्वत:ला दोष देऊ नका. सध्या आपण अगदी वेगळ्या परिस्थितीत जगत आहोत. त्यामुळे स्वत:वर प्रेम (Love Yourself) करणं आवश्यक आहे. याचा अर्थ फक्त तुमच्या चुकांसाठी स्वतःला माफ करणे (जसं की, नवव्यांदा चावी हरवणं) असा नाही. चिंता किंवा नैराश्य आलं असेल तर त्या बाबतीत तज्ज्ञांची मदत घ्या. कारण अशा वेळी उपचार घेणं महत्त्वाचं आहे. आपण नेहमीच सर्वोत्तम राहू शकत नाही, हे मान्य करा. आपल्या मेंदूसाठी काय चांगलं आहे, हे लक्षात ठेवून त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि नको असलेल्या गोष्टी टाळल्या तर अशा आव्हानांचा सामना करणं सोपं जाईल.

First published:

Tags: Coronavirus, Health, Lifestyle