मराठी बातम्या /बातम्या /heatlh /एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा

एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा

संशोधकांना कोरोना रुग्णांच्या रक्तात एक विशिष्ट असा घटक सापडला आहे.

संशोधकांना कोरोना रुग्णांच्या रक्तात एक विशिष्ट असा घटक सापडला आहे.

संशोधकांना कोरोना रुग्णांच्या रक्तात एक विशिष्ट असा घटक सापडला आहे.

    ब्रिटन, 14 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभर हाहाकार माजवून आता वर्ष होऊन गेलं आहे. त्यामुळे त्याबाबत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून होणारं संशोधनही पुढे सरकलं आहे. लशी विकसित झाल्या आहेत, होत आहेत आणि आणखी काही पैलूही संशोधक हाताळत आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर बहुतांश रुग्ण बरे होत असले, तरी काही रुग्णांमध्ये मात्र गंभीर लक्षणं दिसून येतात आणि अखेरीस त्यांचा मृत्यू होतो. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कुणाला होणार आहे, हे आता फक्त एका ब्लड टेस्टमधून (blood test) समजू शकतं. त्यामुळे रुग्णावर तसे उपचार करून हा धोका टाळता येऊ शकतो, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

    लंडनमधल्या इम्पेरियल कॉलेजातल्या (Imperial College, London) तज्ज्ञांनी रक्तातलं असं प्रथिन (Blood Protein) शोधून काढल्याचा दावा केला आहे, की ज्याचा थेट संबंध मृत्यूच्या धोक्याशी किंवा आजारपण अधिक तीव्र होण्याच्या शक्यतेशी असतो. त्यामुळे रक्ताची चाचणी केल्यास हा धोका लवकर कळून अशा रुग्णांवर तातडीने पुढच्या टप्प्यातले उपचार करता येतील, असं त्यांचं म्हणणं आहे. 'डेली मेल'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    कोरोना झालेल्या 500 हून अधिक रुग्णांच्या रक्ताचा अभ्यास यासाठी करण्यात आला. ज्यांचा आजार गंभीर होता किंवा ज्यांचा नंतर मृत्यू झाला, त्यांच्या रक्तामध्ये जीएम-सीएसएफ (GM-CSF) प्रथिनाचं प्रमाण खूप जास्त असल्याचं आढळून आलं होतं. हे प्रथिन म्हणजे सायटोकाइन्सचा प्रकार आहे.

    शरीरात एखाद्या बाह्यघटकाचा संसर्ग झाल्यानंतर सायटोकाइन्स ही प्रथिनं रक्तात स्रवली जातात. त्यामुळे त्या बाह्यघटकाशी दोन हात करण्याकरिता शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेला सक्रिय होण्यास चालना मिळते. बहुतांश वेळेला रोग घालवण्यासाठी ही सायटोकाइन्स उपयुक्त असतात; मात्र रक्तात एकाच वेळी सायटोकाइन्सचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे सायटोकाइन स्टॉर्म (Cytokine Storm) उद्भवू शकतं. त्यामुळे रोगप्रतिकारयंत्रणा धोक्याशी लढताना जरूरीपेक्षा जास्त तीव्रतेचा प्रतिसाद देते. त्यामुळे शरीरातल्या अंतर्गत अवयवांना अनियंत्रित सूज येऊ शकते आणि ते कायमचे बाद होऊ शकतात.

    हे वाचा - Corona Vaccine: लसीचे महिलांवर होताहेत सर्वाधिक साइड इफेक्ट्स

    कोरोनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती क्षीण (Immune System) होणं, महत्त्वाच्या इंद्रियांना धोका पोहोचणं किंवा मृत्यू होणं, यासाठी हे प्रथिन जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जीएम-सीएसएफ या प्रथिनाचं प्रमाण कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये सर्वांत जास्त आढळलं.

    कोरोना झालेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्ताची चाचणी केल्यास आणि त्यात ते प्रथिन आढळल्यास अशा रुग्णांवर अधिक लक्ष देऊन उपचार करता येतील. जीएम-सीएसएफ या प्रथिनाचं शरीरातलं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपचार केले गेले, तर कोविडचं रूप गंभीर होण्यापासून आणि मृत्यूपासून रुग्णाला वाचवण्यात यश येऊ शकेल, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

    सध्या आर्थ्रायटिसवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग जीएम-सीएसएफ या प्रथिनावर करता येणं शक्य असल्याचंही  शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या प्रथिनाचं प्रमाण कमी करण्यासाठी सार्ग्रामॉस्टिम (Sargramaustim) आणि ओटिलिमॅब (Otilimab) ही दोन औषधं उपयोगी ठरू शकतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. सार्ग्रामॉस्टिम हे औषध बोन मॅरो ट्रान्स्प्लांटनंतर (Bone Marrow Transplant) वापरलं जातं, तर ओटिलिमॅब हे औषध मल्टिपल स्क्लेरॉसिस (Multiple Sclerosis) आणि हृमॅटॉइड आर्थ्रायटिसवर (Rheumatoid Arthritis) उपचारांसाठी सध्या वापरलं जातं. संबंधित रुग्णाच्या शरीरातली त्या प्रथिनाची पातळी कमी करण्यात यश आलं, तर त्या रुग्णाचा आजार गंभीर रूप धारण करणार नाही.

    हे वाचा - जिममध्ये इनडोअर व्यायाम करताना मास्क घालावा का? वाचा काय सांगतं संशोधन

    'कोविड-19 कोणामध्ये गंभीर रूप धारण करील, याची माहिती हे प्रथिन देऊ शकेल. अर्थात, याचा अजूनही खूप अभ्यास होणं गरजेचं आहे,' असं मत डॉ. रायन थ्वाइट्स यांनी व्यक्त केलं. तर अद्याप मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्याच्या टप्प्यापर्यंत हे संशोधन आलेलं नाही; पण धोक्याचा इशारा मिळण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचं ठरणार असल्याचं प्रा. पीटर ओपेनशॉ यांनी सांगितलं.

    लंडनमधल्या इंटरनॅशनल सीव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी अँड इमर्जिंग इन्फेक्शन कन्सॉर्शियमच्या साह्याने हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा अहवाल 'सायन्स इम्युनॉलॉजी'मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

    First published:

    Tags: Britain, Corona, Coronavirus, Covid19, International, London, Scientist