Home /News /heatlh /

चेहऱ्यावरच्या Dark Spots मुळे त्रस्त आहात? 'या' पदार्थांचं सेवन टाळा

चेहऱ्यावरच्या Dark Spots मुळे त्रस्त आहात? 'या' पदार्थांचं सेवन टाळा

त्वचा (Skin) नितळ आणि सुंदर दिसावी, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यासाठी महिला सौंदर्यप्रसाधनांचा (Cosmetics) वापर करतात. काही महिला त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपायदेखील करतात. अलीकडच्या काळात महिलांना चेहऱ्यावरच्या काळ्या डागांच्या (Dark Spots) समस्येला वारंवार तोंड द्यावं लागत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 26 मे : त्वचा (Skin) नितळ आणि सुंदर दिसावी, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. त्यासाठी महिला सौंदर्यप्रसाधनांचा (Cosmetics) वापर करतात. काही महिला त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपायदेखील करतात. अलीकडच्या काळात महिलांना चेहऱ्यावरच्या काळ्या डागांच्या (Dark Spots) समस्येला वारंवार तोंड द्यावं लागत आहे. उपाय करूनही काळे डाग जात नसल्याने साहजिकच त्याचा परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होत असल्याचं दिसून येतं. काळ्या डागांच्या समस्येला तीव्र सूर्यप्रकाश, चुकीचा आहार आणि हॉर्मोन्समध्ये (Hormone) बदल अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. आहारात (Diet) काही पदार्थांचा समावेश असल्यानं हॉर्मोन्समध्ये बदल होऊन हायपरपिग्मेंटेशन (Hyperpigmentation) होऊ शकतं. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. काळ्या डागांची समस्या निर्माण होऊ नये किंवा ही समस्या निर्माण झाल्यास ती लवकर दूर व्हावी, यासाठी आहारातून कोणते पदार्थ वर्ज्य करावेत, याविषयी 'लोक्सा ब्युटी'च्या त्वचारोगतज्ज्ञ केस्निया सोबचक (Kesnia Sobchak) यांनी मार्गदर्शन केलं आहे. सध्याच्या काळात अनेक महिलांना काळ्या डागांची समस्या जाणवते. आहारातून काही पदार्थ वर्ज्य केले तर ही समस्या दूर होऊ शकते. गोड किंवा साखरयुक्त पदार्थ (Sugary Foods) आणि पेयं, तळलेले पदार्थ (Fried Foods) आणि सोयाचा (Soy) जास्त वापर केलेले पदार्थ आदींचा यात समावेश आहे. असे पदार्थ टाळले पाहिजे. त्याऐवजी आहारात अ‍ॅंटीऑक्सिडंट्स (Antioxidant) मुबलक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. त्या अन्नपदार्थांमधली पोषक तत्त्वं त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी सामना करतात. तसंच मेलॅटोनिन हॉर्मोनची निर्मिती वाढवण्यास आणि पेशींच्या क्रियांना गती देतात. त्यामुळे त्वचेवरचे काळे डाग कमी होतात, असं केसेनिया सोबचक यांनी सांगितलं. चेहऱ्यावर काळे डाग येऊ नयेत यासाठी व्हिटॅमिन ए, सी, ओमेगा-3 फॅट्स, कॅरोटिन, अ‍ॅंटीऑक्सिडंट्स, झिंक, कॅल्शियम आदी घटकांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, अ‍ॅव्होकॅडो, चरबीयुक्त मासे, शेंगदाणे, गाजर, कडधान्य, भोपळा आदी पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास हायपरपिग्मेंटेशनचा धोका कमी होऊ शकतो, असं सोबचक यांनी स्पष्ट केलं. हे पदार्थ खाणं टाळा सोयाचा समावेश असलेले पदार्थ काही अंशी चांगले असले तरी त्यांचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास त्वचेसाठी तो हानिकारक ठरू शकतो. कारण, त्यात फायटोएस्ट्रोजेन (Phytoestrogens) नावाचं संयुग असतं. त्यामुळे शरीरातल्या हॉर्मोन्सच्या सामान्य कार्यात बदल होऊ शकतो. कारण ते इस्ट्रोजन रसायनाप्रमाणे कार्य करतं. हॉर्मोनच्या कार्यप्रणालीत बदल झाल्यास त्वचेवर गडद डाग येऊ शकतात, असं सोबचक यांनी सांगितलं. आहारात चरबीयुक्त तळलेले पदार्थ टाळण्यामागे अनेक कारणं आहेत. या पदार्थांमुळे वजन वाढू शकतं, तसंच हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. या पदार्थांच्या सेवनामुळे काळे डागदेखील येऊ शकतात. फ्रेंच फ्राइजसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे त्वचेची जळजळ होणं, कोलॅजनच्या निर्मितीमध्ये व्यत्यय येणं आणि अकाली वृद्धत्व येण्याची क्रिया वाढून हायपरपिग्मेंटेशन होण्याची शक्यता असते, असं सोबचक म्हणाल्या. साखरयुक्त किंवा गोड पदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश केल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम होतो. काळ्या डागांची समस्या उद्भवू नये, यासाठी साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला सोबचक देतात. साखर किंवा गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्वचेची जळजळ होणं, कोलॅजनचं उत्पादन रोखलं जाणं, काळे डाग आणि अकाली वृद्धत्व येणं या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यासाठी चॉकलेट, कॅंडी आणि सोडा या गोष्टी वर्ज्य कराव्यात. रोज साखरेचं सेवन मर्यादित ठेवल्यास त्वचेच्या आणि आरोग्यविषयक समस्या टाळता येऊ शकतात, असं सोबचक यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या