ब्रिटन, 08 फेब्रुवारी : खेळता खेळता लहान मुलांनी एखादं नाणं किंवा छोटी वस्तू गिळल्याच्या घटना आपण अनेक पाहिल्या आहेत. या मुलांना आपण काय करतोय ते समजतही नसतं. खेळताना अशा काही वस्तू ते तोंडात घालतात. पण सध्या अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये 12 वर्षांच्या मुलानं प्रयोग करण्यासाठी मुद्दामहून Magnet Balls गिळले. त्याचं ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरही शॉक झाले.
यूकेच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये राहणारा 12 वर्षांचा रिले मॉरिसन (Rhiley Morrison) यानं आपल्या आईला आपण मॅगनेट गिळल्याचं सांगितलं. तसं त्याला कोणता त्रास होत नव्हता. पण त्याच्या आईला त्यानं असं सांगताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी एक्स-रे काढले तेव्हा जवळपास 25- 30 मॅग्नेट बॉल असतील असा अंदाज त्यांनी बांधला.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार त्यानं एकदा नव्हे तर दोनदा हा प्रयोग केला आणि काही दिवस मॅग्नेट शौचातून बाहेर पडण्याची वाटही पाहिली. पोटाच्या आत मॅग्नेट गेल्यावर पोटावर मेटल चिकटतं का हे त्याला पाहायचं होतं. इतकंच नव्हे तर ते शौचातून बाहेर पडताना नेमकं काय होतं हे पाहण्याची उत्सुकताही त्याला होती. पण चार दिवस झाले तरी शौचातून मॅग्नेट बाहरे पडले नाहीत. तेव्हा त्यानं आपल्या आईला याबाबत सांगितलं.
हे वाचा - इंग्रज घेणार पुणेरी कोरोना लस? भारतातील Covisheild यूकेमध्ये जाण्याची शक्यता
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. तेव्हा ते मॅग्नेट बॉल त्याच्या पोटात आणि आतड्यांमध्ये असल्याचं दिसलं. पण यामुळे महत्त्वाच्या अवयव किंवा टिश्यू बर्न होण्याची भीती डॉक्टरांना होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
सर्जरीनंतर तब्बल 54 मॅग्नेट बॉल्स त्याच्या शरारीतून निघाले. रिलेची आई पायजे म्हणाली, डॉक्टरांना एक्स-रे पाहून वाटलं 25- 30 मॅग्नेट बॉल असतील पण, सर्जरीनंतर त्यांना 54 बॉल्स सापडले. त्यानं इतके बॉल कसे काय गिळले ते मला समजत नव्हतं. अखेर रिलेनं खरं काय ते सांगितलं. रिलेला ऑटिझम आहे पण तो काय करतो आहे, याची पुरेपूर कल्पना त्याला होती.
रिलेला सुरुवातीला सॅलफोर्ड रॉयल रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून रॉयल मॅनचेस्टर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथं त्याच्यावर कीहोल सर्जरी करण्यात आली. त्याला खातापिता येत नव्हतं आणि शौचालाही जाता येत नव्हतं. अखेर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटीबायोटिक्स देण्यात आले.
हे वाचा - बोंबला! मजा म्हणून चिंपाझीच्या हातात दिली बंदूक आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO
दरम्यान रिलेनं यातून चांगलाच धडा घेतला आहे. त्यानं आपल्याजवळील सर्व मॅग्नेट टॉय फेकून दिले आहेत. तो आता अजिबात त्यांच्यासोबत खेळत नाही.
रिलेच्या आईनंदेखील इतर पालकांना मुलांना मॅग्नेट टॉय देऊ नका, असं आवाहन केलं आहे. ती म्हणाल, माझ्या मुलाला काही वेदना होत नव्हत्या. पण सुदैवानं त्यानं मला सांगितलं. जर माझ्या मुलानं सांगितलं नसतं तर त्याचा मृत्यूही झाला असता असं डॉक्टर म्हणाले. मी ज्या परिस्थितीतून गेले त्यातून इतरांना जाऊ नये,, त्यामुळे मी सर्वांना विनंतही करते आपल्या मुलांना मॅग्नेट टॉय वापरू देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.