इंदौर, 26 जानेवारी : आज सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. शाळा, कॉलेजमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा झाला. अशीच एक विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनाची तयारी करत होती पण तिला अचानक मृत्यूने गाठलं. कोणताही आजार नसलेल्या या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
इंदौरच्या सुदामा नगरमधील छत्रपती शिवाजी स्कूलमधील ही धक्कादायक घटना. अकरावीची विद्यार्थीनी वृंदा त्रिपाठी आपल्या वर्गातून बाहेर पडत होती. तेव्हा अचानक ती खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिच्या मैत्रिणींनी शिक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे वाचा - ना अनुभव, ना ट्रेनिंग; 2 महिन्यांपूर्वी बातमी पाहून IAS अधिकाऱ्याने वाचवला नागरिकाचा जीव
वृंदा बेशुद्ध झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेईपर्यंत 10 मिनिटंच लागली. पण या वेळेतच तिने जीव सोडला. हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण तपासणीनंतरच समजेल असं डॉक्टरांनी सांहितलं. पण हार्ट अटॅक असू शकतो,अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तिच्या कुटुंबाने सांगितलं की तिला कोणताही आजार नव्हता. ती पूर्णपणे फिट होती. शाळा प्रशासनानेही तिला कोणतीच समस्या नसल्याचं सांगितलं. ती प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची तयारी करत होती. त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण समजण्यासाठी पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहोत, असं ते म्हणाले.
हार्ट अटॅकची लक्षणे
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना तीव्र वेदना जाणवतात तर काही लोकांना कमी प्रमाणात वेदना होतात. तर काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. लक्षणांची तीव्रता जितकी अधिक असते तितका हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अनेक लोकांना अचानक हृदय विकाराचा झटका येतो. मात्र काही रुग्णांमध्ये झटका येण्यापूर्वी काही तास, काही दिवस किंवा काही आठवडे लक्षणं दिसून येतात.
हे वाचा - तिशीनंतरही हृदय राहील पूर्वीसारखे तरुण, फक्त दैनंदिन आयुष्यात करा हे छोटे बदल
छातीत दुखणं आणि अस्वस्थ वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला काही वेळापुरते दुखू लागते. त्यामुळे अस्वस्थता जाणवू लागतं. हे लक्षण काही वेळेपुरतं दिसतं.
अशक्त वाटणं, डोकं हलकं वाटणं : हृदय विकाराचा झटका आल्यास अशक्त वाटू लागतं. डोकं हलकं वाटतं तसेच शरीर थंड पडल्यासारखं वाटू लागतं.
अन्य अवयवांमध्ये वेदना : हृदय विकाराचा झटका आल्यास जबडा, मान आणि पाठीत वेदना जाणवू लागतात आणि अस्वस्थता वाटू लागते. तसेच एक किंवा दोन्ही हात आणि खांदे दुखू लागतात.
श्वास घेण्यास त्रास होणं : हृदय विकाराचा झटका आल्यास छातीत वेदना होऊ लागतात. तसेच छातीत अस्वस्थ वाटू लागतं. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा चक्कर देखील येते.
मळमळ किंवा उलटी होणं : काही रुग्णांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर मळमळ जाणवू लागते. उलटी देखील होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Heart Attack, Lifestyle