नवजात बाळाचा पापा घेताय? जरा थांबा, कारण जाणून घेतल्यावर चुकूनही करणार नाही ही गोष्ट

नवजात बाळाचा पापा घेताय? जरा थांबा, कारण जाणून घेतल्यावर चुकूनही करणार नाही ही गोष्ट

लहान मुलांची (Babies) रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशामध्ये आपला एक किस (Kiss) त्यांचे आरोग्य धोक्यात आणू शकतो.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : लहान मुलं (Babies) दिसायला जेवढी गोंडस असतात तितकीच ती नाजूकदेखील असतात. लहान बाळांना पाहून आपलं मन प्रफुल्लित होतं. एवढंच नाही तर त्यांना हातामध्ये घेऊन त्यांना घट्ट मिठी मारावी त्यांच्या गालाचा पापा घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशामध्ये आपला एक किस त्यांचे आरोग्य धोक्यात आणू शकतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं.

आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही किंवा इतर कोणालाही आपल्या मुलाचा पापा घेऊ देऊ नका, हेच बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. लहान मुलं खूपच मोहक असतात. त्यांना पाहून प्रत्येकजण आकर्षित होतोच. त्यांचे इवले इवलेसे हात-पाय, गोंडस हास्य, गुबगुबीत गाल पाहून आपल्याला त्यांना जवळ घेऊन त्याला घट्ट मिठी किंवा पापा घ्यावासा वाटतो. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण बाळाचा पापा घेतो. पण तुम्ही जर नवजात बाळाचे (newborn) पालक असाल तर तुम्ही किंवा इतरांना आपल्या बाळाला किस करुन देऊ नका हाच सल्ला दिला जाऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटने लहान बाळांची काळजी कशी घ्यावी याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

आपल्या बाळाला किस करु नका असे कोणाला सांगणे कदाचित वेड्यासारखे वाटेल. पण हेच सांगणे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य ठरेल. फक्त बाहेरील लोकच नाही तर आपण किंवा आपल्या जोडीदारानेही आपल्या लहान मुलाच्या सुरक्षिततेसाठी हे करू नये. नवजात बाळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती (immune system) विकसित होत असते त्यामुळे सुरुवातीचे काही आठवडे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कोणत्याही प्रकारच्या विषाणू (virus) आणि जीवाणूंच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.

लहान मुलांना हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत कारण आपल्या हातांवर मोठ्याप्रमाणावर जंतू असतात, असे नेहमी सांगितले जाते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर देखील हजारो सूक्ष्मजीव असतात. आपण जेव्हा बाळाला किस करतो तेव्हा हे विषाणू किंवा जंतू बाळाच्या त्वचेवर जातात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्य होईल तितकी आपली आणि बाळाची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.

नवजात बाळ विशेषत: एचएसव्ही -1 (HSV-1) म्हणजे हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसमुळे (Herpes Simplex Virus) असुरक्षित असतात. प्रौढांमध्ये या व्हायरसमुळे तोंडाच्या आणि ओठांच्या सभोवताली फोड येतात. हे विषाणू कधीकधी प्रौढांमधील विशिष्ट लक्षणंदेखील दर्शवत नाहीत परंतु ते नवजात बाळासाठी प्राणघातक ठरू शकतात. या विषाणूमुळे काही लोकांच्या ओठांवर फोड येऊ शकतात. अशामध्ये त्यांनी लहान मुलांना किस केला असता त्यांच्यामध्ये व्हायरसचे संक्रमण होऊ शकते.

असा अंदाज आहे की 40 वर्ष वयोगटातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झालेली असते. या व्यक्तींना बाळाला किस घेतल्यामुळे याची लागण बाळाला होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीस व्हायरसची लागण झालेली असेल तर त्याने बाळाच्या हाताला स्पर्श केला असेल आणि नंतर बाळ स्वत:च्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करत असेल, तर हा व्हायरस बाळाच्या श्लेष्मल त्वचेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे, व्हायरस वेगाने वाढतो. ज्यामुळे बाळाचा मेंदू आणि पाठीच्या मणक्यांना त्रास होतो.

सुरुवातीचे काही दिवस बाळांसाठी खूपच नाजूक असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या बाळाची खूप काळजी घेणे गरजेचे असते. जी व्यक्ती आजारी आहे त्याने बाळापासून दूर राहावे. जर एखाद्याला बाळाला स्पर्श करायचा असेल किंवा त्याला हातामध्ये घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीने सर्वात आधी आपले हात स्वच्छ धुवावे हाच योग्य पर्याय आहे. सुरुवातीलाचे काही महिने आपल्या बाळाला गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा आणि आपल्या घरात जास्त पाहुण्यांना बोलावू नका. अशाप्रकारची काळजी घेतली तर आपले बाळ सुरक्षित राहिल आणि त्याला कसलाही त्रास होणार नाही.

एकदा बाळ मोठं झालं की त्याची प्रतिकारशक्ती चांगली बळकट होते आणि मग ते प्रतिकार करू शकते. त्यानंतर त्याला आजार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तोपर्यंत अत्यंत काळजी घेणं ही त्याच्या आईवडिलांची मुख्य जबाबदारी आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 23, 2021, 8:28 AM IST

ताज्या बातम्या