तुम्हाला कॅन्सर आहे की नाही? Electronic nose अवघ्या काही सेकंदातच ओळखणार

तुम्हाला कॅन्सर आहे की नाही? Electronic nose अवघ्या काही सेकंदातच ओळखणार

अगदी प्राथमिक टप्प्यात ज्यावेळी कॅन्सरची लक्षणं दिसत नाहीत त्याचवेळी Electronic nose मार्फत कॅन्सरचे निदान होऊ शकतं.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोगाचं वेळेत निदान होणं ही त्याच्या यशस्वी उपचारातील पहिली पायरी असते. मात्र काही कॅन्सर असे असतात ज्याचं निदान अगदी तो शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर होतं. अनेकदा यामागे लोकांची दुर्लक्ष करण्याची वृत्तीही कारणीभूत असते. काही वेळा अगदी गंभीर प्रकारच्या कॅन्सरची लक्षणं उशीरा लक्षात येतात. अशा वेळी उपचार केले तरी बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे  कॅन्सरचं पहिल्या टप्प्यातच निदान होण्यावर डॉक्टर्स भर देतात. याबाबत सतत संशोधन सुरू असते. अशाच एका संशोधना तशास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रॉनिक नाक (Electronic Nose) विकसित केलं आहे. ज्याद्वारे अन्ननलिकेच्या कॅन्सरचं (Oesophageal Cancer) अवघ्या काही सेकंदात निदान होणं शक्य झालं आहे.

ब्रेथ अॅनालाइझर (Breath Analyser) सारखं हे यंत्र असून, ते सेन्सरच्या सहाय्याने श्वासातील काही विशिष्ट रसायनांचा वेध घेऊन कर्करोगाचे अचूक निदान करते. यामुळे अगदी प्राथमिक टप्प्यात अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान होऊ शकतं. परिणामी जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचवणं शक्य होणार आहे.

अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या प्राथमिक टप्प्यात पचनासाठी आवश्यक आम्लांचे प्रमाण कमी होण्याचा धोका उद्भवतो आणि  पोटातील आम्लद्रव्यांच्या कमतरतेचा परिणाम अन्ननलिकेतील पेशींवर होतो, याला बॅरेटस अन्ननलिका (Barrett’s Oesophagus) परिणाम म्हणतात.

ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या कॅन्सर संशोधनानुसार, बॅरेटस अन्ननलिका या स्टेजला आलेल्या 13 टक्के लोकांमध्ये  अन्ननलिकेचा कॅन्सर विकसित झाल्याचं आढळून आलं आहे.

बॅरेट्स अन्ननलिका या स्टेजचं निदान एंडोस्कोपीद्वारे(Endoscopy) करता येते. एंडोस्कोपमध्ये  शेवटच्या बाजूला कॅमेरा असलेली एक लांब  पातळ लवचिक ट्यूब असते. पण अनेक रुग्णांना ही प्रक्रिया त्रासदायक तसंच महाग वाटते. त्यामुळं ते अशा पद्धतीनं तपासणी करून घ्यायचं टाळतात. अशा स्थितीत ही नवीन तपासणी पद्धत एक चांगला आणि सोपा पर्याय ठरू शकेल.

हे वाचा - अरे बापरे! व्यक्तीच्या पोटातून बाहेर आला अजगरापेक्षाही लांब जंत; डॉक्टरही शॉक

आपण ज्यावेळी श्वास बाहेर सोडतो त्यामध्ये 3 हजार सतत बदलणारी सेंद्रीय संयुगे (Volatile Organic Compounds) असतात. यापैकी काही घशातील जळजळीमुळे (Inflammation) तर काही चयापचय प्रक्रियेमुळे तयार होतात. ही संयुगं एकदा रक्तात मिसळल्यानंतर फुफ्फुसांपर्यंत जातात आणि श्वसनमार्गाद्वारे बाहेर जातात. वेगवेगळ्या रोगांनुसार या संयुगांचे प्रकार वेगळे असतात आणि असे वेगवेगळे प्रकार हे इलेक्ट्रॉनिक नाकरुपी यंत्र शोधू शकतं, असं संशोधकांनी सिद्ध केलं आहे. या यंत्राद्वारे चाचणी करताना  रुग्ण या यंत्राशी  जोडलेल्या एका ट्यूबमध्ये श्वास घेतो. मग यातील सेन्सर्स त्यातील विशिष्ट संयुगं शोधतो आणि अवघ्या काही मिनिटांतच याचा निकाल समोर येतो.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार नेदरलँड्सच्या रॅडबाँड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या हा अभ्यास गुट या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 400 लोकांनी पाच मिनिटांसाठी या उपकरणात श्वास घेतला. त्यामध्ये काहींना बॅरेट अन्ननलिका विकाराचे तर काहींना आम्ल कमतरतेचे निदान झाले. तर काही जणांची अन्ननलिका उत्तम असल्याचं स्पष्ट झालं. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये संयुगांमधील घटक वेगळे असल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं. या उपकरणाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दहापैकी नऊ वेळा बॅरेट अन्ननलिका परिणाम ओळखण्यात यश आलं. ज्यांच्यामध्ये अशी कोणतीही स्थिती नव्हती त्याचेदेखील या यंत्रानं अचूक निदान केलं. सध्या युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 500 रूग्णांवर या यंत्राची चाचणी सुरू असून, आधी त्यांची श्वास तपासणी केली जाते आणि निकाल पडताळणीसाठी एन्डोस्कोपी केली जाते. हे यंत्र अनेक वेगवेगळ्या प्रकारांचा शोध घेऊ शकत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - अरे बापरे! व्यक्तीच्या पोटातून बाहेर आला अजगरापेक्षाही लांब जंत; डॉक्टरही शॉक

गेल्या वर्षी माद्रिदमधील युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटीच्या कॉंग्रेसमध्ये सादर केलेल्या अभ्यासात असं नमूद करण्यात आलं होतं की, श्वासातील संयुगांच्या मदतीनं  फुफ्फुसाच्या कॅन्सरचं 96 टक्के अचूक निदान करता येते. आतड्याचा कॅन्सर,  टीबी, प्रोस्टेट कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर, रिजनल पेन सिंड्रोम, पोटाचा कॅन्सर आणि एपिलेप्सी अशा आजारांचे निदान करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

शेफील्ड युनिव्हर्सिटीतील ओटोलॉजी आणि न्यूरोटोलॉजीचे प्राध्यापक तसंच शेफील्ड टीचिंग हॉस्पिटलमधील कान, नाक आणि घसा विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर जयदीप रे म्हणाले, अनेक प्रकारच्या कॅन्सर्सच्या जलद निदानासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त असून, यामुळे कॅन्सरचं लवकर निदान आणू उपचार करणं शक्य होईल. अतिशय सुलभ अशी ही चाचणी असल्यानं भविष्यात अगदी सहजपणे ती सर्वत्र वापरली जाऊ शकेल.

Published by: Priya Lad
First published: March 26, 2021, 9:41 AM IST

ताज्या बातम्या