मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : Corona vaccine चा Booster Dose घेण्याची गरज कुणाला?

Explainer : Corona vaccine चा Booster Dose घेण्याची गरज कुणाला?

Corona vaccine booster dose : कोरोना लशीच्या बुस्टर डोसबाबत देशातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

Corona vaccine booster dose : कोरोना लशीच्या बुस्टर डोसबाबत देशातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

Corona vaccine booster dose : कोरोना लशीच्या बुस्टर डोसबाबत देशातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

    नवी दिल्ली, 07 डिसेंबर : कोरोना प्रतिबंधक लशीच्या (Corona vaccine) बूस्टर डोसबद्दलची (Corona vaccine booster dose) चर्चा आता शास्त्रज्ञांच्या वर्तुळात, तसंच माध्यमांमध्येही रंगू लागली आहे. अनेक तज्ज्ञांनी वैयक्तिक पातळीवर अशी सूचना केली आहे, की लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणं आणि त्यानंतर 60 वर्षांवरच्या सर्वांना बूस्टर डोस देणं आवश्यक आहे. उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा विचार करता अनेक प्रश्नांची उत्तर मिळवणं गरजेचं आहे. बूस्टर डोससाठी कोणत्या व्यक्ती पात्र ठरतील? आधी लसीकरण झालेल्या सर्व प्रौढ नागरिकांना त्याची गरज आहे का? कोणत्या लशींना बूस्टर डोसची गरज आहे आणि आधीचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर किती काळाने त्या घ्यायला हव्यात? स्पाइक प्रोटीनमध्ये बरीच म्युटेशन्स झालेल्या नव्या व्हॅरिएंटविरोधात बूस्टर डोस प्रभावी ठरेल, याचा काही पुरावा आहे का?

    कोरोना विषाणूच्या जनुकीय संशोधनासाठी इंडियन सार्स सीओव्ही टू जिनॉमिक कन्सॉर्शियमची (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium - INSACOG) स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंट्सवर लक्ष ठेवणाऱ्या या 'इन्साकोग'ने जास्त जोखीम असलेल्या नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस (Booster Dose of Anti-Covid Vaccine) घेण्याची शिफारस केल्याचं वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केलं. 40 वर्षांवरच्या सर्वच नागरिकांना बूस्टर डोस आवश्यक असल्याचं 'इन्साकोग'चं म्हणणं असल्याचं माध्यमांनी प्रसिद्ध केलं; मात्र 'इन्साकोग'कडून नंतर असं स्पष्ट करण्यात आलं, की या विषयावर तज्ज्ञांची फक्त चर्चा झाली; पण कोणीही त्याबद्दलची शिफारस किंवा सूचना केलेली नाही. आणि अशी काही शिफारस 'इन्साकोग'ने केली असती, तर सरकारने त्यांना नेमून दिलेल्या कार्यकक्षेच्या ती बाहेर झाली असती.

    - बूस्टरमागचं विज्ञान (Science behind Booster)

    जेव्हा कोरोना प्रतिबंधक लशी नव्याने विकसित होऊन आल्या, तेव्हा त्यांची वाट पाहत असलेल्या साऱ्या जगाने त्यांचं स्वागत केलं; मात्र तेव्हा अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती, की लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारच नाही. प्रत्यक्षात मात्र या लशीचा डोस घेतल्यानंतरही संसर्ग होणारच नाही असं सांगता येत नाही; मात्र गंभीर आजारपण टळतं आणि बहुतांश केसेसमध्ये मृत्यूही टळतो. संसर्गातून लवकर बरं होण्यास लशीची मदत होते. संसर्गच होऊ नये असा प्रभाव अपेक्षित असेल, तर शरीरात सिक्रीटरी अँटीबॉडीज (Secretory Antibodies) असणं गरजेचं आहे. असा प्रभाव असलेली म्युकोझल व्हॅक्सिन्स (Mucosal Vaccines) अद्याप विकसित होत आहेत. त्यांच्या चाचण्याही होत आहेत; मात्र प्रभावी उत्पादनं अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. त्या प्रभावी असल्याचं सध्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये सिद्ध होईल की नाही, याची कल्पना नाही.

    हे वाचा - ओमिक्रॉन व्हेरियंटवर `या` लसीच्या बूस्टर डोस ठरू शकतो प्रभावी, तज्ञ म्हणतात..

    प्रभाव आणि सुरक्षितता या दोन्ही निकषांवर लशींच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात. सध्या वापरल्या जात असलेल्या प्रत्येक लशीने ते टप्पे पार केले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला जेव्हा लशी दिल्या जातील, तेव्हाच त्या लशींमुळे विकसित झालेल्या रोगप्रतिकार यंत्रणेच्या कालावधीचं मूल्यमापन करता येऊ शकेल. व्हॅरिएंट्स नंतर विकसित झाले, तर आधी मंजुरी मिळालेल्या लशींची त्यावर प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष लोकसंख्येवर अशा दोन्ही प्रकारे चाचणी घेतली जाते. पूर्वी लस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज नव्या व्हॅरिएंटला (New Variants) निष्प्रभ करण्यास सक्षम आहेत का, ही क्षमता प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ तपासतात. लोकसंख्येवर प्रयोग करताना ब्रेकथ्रू इन्फेक्शन्स (Breakthrough Infections) किती आहेत, हे पाहिलं जातं. म्हणजेच लस घेतलेल्या किती जणांना नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग झाला, हे पाहिलं जातं.

    सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींपैकी बहुतांश लशी विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या (Spike Proteins) विरोधात कार्य करतात. ही प्रोटीन्स विषाणूच्या शरीराच्या बाह्य पृष्ठभागावर असतात. मानवी पेशींतल्या एस टू रिसेप्टरला जोडून घेण्यासाठी विषाणूकडून त्या स्पाइक प्रोटीनचा वापर केला जातो. त्यानंतर त्याद्वारे मानवी पेशीत शिरल्यानंतर पेशीतल्या द्रव्याचा वापर करून विषाणू स्वतःच्या अनेक प्रती निर्माण करतो. एम-आरएनए प्रकारच्या लशी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरत असल्याचं क्लिनिकल ट्रायल्समध्ये आढळलं आहे; मात्र यातून तयार झालेल्या अँटीबॉडीजची पातळी काही महिन्यांत कमी होते, असंही आढळलं आहे. फायझर-बायोएनटेक (PFizer-BioNTech) कंपनीच्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पाचव्या महिन्यापासूनच अँटीबॉडीजची पातळी घसरत असल्याचं दिसून आलं आहे. मॉडर्ना (Moderna) कंपनीच्या लशीमध्ये अँटीजेनचा हायर डोस असून, या लशीचा प्रभाव जास्त काळ टिकतो; मात्र या लशीलाही सहा ते आठ महिन्यांनी बूस्टर डोसची गरज असल्याचं दिसून आलं आहे.

    हे वाचा - Omicron चा मुकाबला करण्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या - WHO

    त्याही पुढे जाऊन अल्फापासून डेल्टापर्यंतच्या (Delta Variant) प्रत्येक नव्या व्हॅरिएंटसोबत लशीचा प्रभाव कमी होत जातो. एमआरएनए प्रकारच्या लशींच्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या, तेव्हा नागरिकांना होत असलेला संसर्ग प्रामुख्याने वुहानमध्ये उगम पावलेल्या मूळ प्रकारच्या विषाणूचा होता. तेव्हा अल्फा व्हॅरिएंट नुकता उगम पावत होता. त्यामुळे मूळ विषाणूविरोधात तयार केलेल्या लशींचा प्रभाव अल्फा व्हॅरिएंटविरोधात कमी झाल्याचं दिसून आलं. डेल्टा व्हॅरिएंटच्या बाबतीत लशींचा प्रभाव कमी होण्याचं प्रमाण फारच जास्त होतं. स्पाइक प्रोटीनवरच्या म्युटेशन्सची संख्या आणि आकार यांमध्ये असलेल्या बदलामुळे हे झालं. कारण एमआरएनए लशींमध्ये (mRNA Vaccines) वापरलेलं स्पाइक प्रोटीन कॉन्फिगरेशन वेगळ्या प्रकारचं होतं.

    अॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेली लस व्हायरस व्हेक्टर (Virus Vector) प्रकारची होती. तीही स्पाइक प्रोटीनविरोधातच कार्य करत होती. तिचाही प्रभाव नव्या व्हॅरिएंट्सवर कमी पडत असल्याचं दिसून आलं. म्हणून या लशींच्या बूस्टर म्हणजेच अतिरिक्त डोसचा प्रस्ताव पुढे आला.

    व्हायरस व्हेक्टर प्रकारच्या लशींचा प्रभाव जास्त काळ टिकू शकतो, असं आढळलं असून, त्या लशी घेतलेल्यांना 10 ते 12 महिन्यांनी बूस्टर डोसची गरज भासू शकते. कोव्हॅक्सिनसारख्या इनअॅक्टिव्हेटेड व्हायरस (Inactivated Vaccine) प्रकारच्या लशींचा प्रभाव किती काळ टिकून राहू शकतो, याचं अद्याप मूल्यमापन करण्यात आलेलं नाही; मात्र उत्पादकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांनंतर बूस्टर डोसची गरज भासू शकते. या प्रकारच्या लशी केवळ स्पाइक-प्रोटीनविरोधात कार्य करणाऱ्या नसतात, तर शरीरातल्या प्रतिकार यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हायरल अँटीजेन्सचा वापर करतात. त्यामुळे यातून स्पाइक प्रोटीनमध्ये बदल होऊन नवे व्हॅरिएंट्स तयार होण्याची शक्यता कमी असते.

    हे वाचा - धक्कादायक! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा, हॉटेलमध्ये दोघांना अशी झाली लागण

    बूस्टर डोसेस होमोलॉगस (Homologous) किंवा हेटेरोलॉगस (Heterologous) अशा दोन प्रकारचे असू शकतात. होमोलॉगस म्हणजे आधी घेतलेल्या लशीचाच पुन्हा डोस घेणं आणि हेटेरोलॉगस म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या लशीचा डोस घेणं. प्राथमिक अभ्यासातून असं दिसून येत आहे, की हेटेरोलॉगस प्रकारचं बूस्टर व्हॅक्सिनेशन अधिक प्रभावी ठरत आहे. फक्त एक मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तो म्हणजे - स्पाइक प्रोटीन विरोधात कार्य करणाऱ्या लशींचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून आलेलं असताना त्याच लशींचा बूस्टर डोस स्पाइक प्रोटीनवरच्या नव्या म्युटेशनविरोधात प्रभावी ठरेल का? की आधीच्या प्रकारच्या विषाणूचे जे प्रकार अद्यापही पसरत आहेत, त्यांच्याविरोधात अँटीबॉडी कार्यरत झाल्यामुळे त्या व्हॅरिएंटलाच अधिक चालना मिळेल? याबद्दलची अधिक माहिती मिळण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

    लसनिर्मात्या कंपन्या एमआरएनए प्रकारच्या लशींमध्ये, तसंच व्हायरस व्हेक्टर प्रकारच्या लशींच्या प्रोटीन कोड्समध्ये बदल करून नव्या व्हॅरिएंट्सविरोधात त्या प्रभावी बनवण्याचा विचार करत आहेत. याची गरज किती आहे, हे अद्याप आपल्याला माहिती नाही. दरम्यान, इनअॅक्टिव्हेटेड व्हायरस प्रकारच्या लशी कोणताही बदल न करता बूस्टर डोससाठी वापरल्या जाऊ शकतात. कारण त्या केवळ स्पाइक प्रोटीनविरोधात काम करण्याच्या उद्देशाने बनवलेल्या नाहीत.

    - बूस्टर्सबद्दलचे जागतिक ट्रेंड्स

    ज्या ठिकाणी लशींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे देश लसीकरण झालेल्या सर्वांनाच 6-8 महिन्यांनंतर बूस्टर डोस देत आहेत. अन्य देश जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ वयस्कर व्यक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनाच बूस्टर डोस देत आहेत. वय किंवा सहव्याधी यांचा विचार न करता काही देशांमध्ये विषाणूच्या संपर्कात येण्याची जोखीम जास्त असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोससाठी प्राधान्य दिलं जात आहे. अशांमध्ये साहजिकच वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींचा समावेश आहे.

    डेल्टा व्हॅरिएंटचा भारतातला प्रभाव आटोक्यात आल्यासारखं वाटत आहे; मात्र लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा गर्दीतून एकत्र आल्या, तर त्या व्हॅरिएंटचा प्रसार पुन्हा होणं शक्य आहे. तातडीने भीती आहे, ती ओमिक्रॉन व्हॅरिएंटची (Omicron Variant), ज्यात वेगाने पसरण्याची क्षमता आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या प्राथमिक अनुभवांनुसार या व्हॅरिएंटमुळे होणाऱ्या आजाराचं स्वरूप आधीच्या व्हॅरिएंट्सच्या तुलनेत सौम्य आहे; मात्र प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या आणि वयोवृद्ध व्यक्तींवर त्याचा काय परिणाम होतो, हे अद्याप कळलेलं नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी जानेवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत म्हणजेच सर्वांत पहिल्यांदा लशींचे डोसेस घेतले होते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. कारण त्यांचा रुग्णांशी थेट आणि सततचा संपर्क येतो. सध्या तरी सरसकट सर्व प्रौढांना बूस्टर डोस देणं क्रमप्राप्त वाटत नाही.

    हे वाचा - Omicron संदर्भात राज्यात ठरणार नियमावली?, आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

    बूस्टर डोसेसची सुरुवात कधी करायची आणि ते देण्यासाठी कोणाला प्राधान्य द्यायचं या गोष्टी लशींचा किती साठा उपलब्ध आहे यावर अवलंबून आहेत. आधी मंजुरी मिळालेल्या लशींचं उत्पादन वाढेल आणि देशात तयार झालेल्या आणखी लशींना मंजुरी मिळेल, तेव्हा साठा वाढेल. त्यानंतर बूस्टर डोस लसीकरण अडचणीविना करता येऊ शकेल. तोपर्यंत देशातल्या सर्व पात्र प्रौढ नागरिकांना दोन्ही डोसेस देणं यालाच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल. लशींची निर्यातही व्यावसायिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक लस समानतेसाठी सुरू राहील. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं वाटत आहे, त्यामुळे लसविषयक धोरणात लवकरच काही बदल होतील, असं वाटत नाही; पण ओमिक्रॉनने जर आव्हान दिलं आणि त्याचा देशभर पसरण्याचा वेग वाढला, तर जास्त जोखमीच्या गटातल्या व्यक्तींना बूस्टर डोस देणं अत्यावश्यक ठरेल. येत्या काही आठवड्यांत कशी परिस्थिती असेल, त्यावर बूस्टरबाबतचा निर्णय ठरेल. ओमिक्रॉनच्या संभाव्य लाटेकडे भारत दक्षतेने लक्ष ठेवून आहे.

    - प्रा. के. श्रीनाथ रेड्डी

    (लेखक प्रा. के. श्रीनाथ रेड्डी हे हृदयरोगतज्ज्ञ आणि संसर्गरोगतज्ज्ञ असून, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. या लेखात व्यक्त केलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)

    First published:
    top videos

      Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus