सर्वात सुरक्षित Apple डिव्हाईसवर हल्ला करणारं Pegasus काय भानगड आहे?

सर्वात सुरक्षित Apple डिव्हाईसवर हल्ला करणारं Pegasus काय भानगड आहे?

Apple कंपनीच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डिव्हाईसवर हेरीगेरी झाल्याने कंपनीला मोठा धक्का बसला आहे. यांची गंभीर दखल घेत Pegasus Spyware विकसित केलेल्या इस्त्रायली एनएसओ ग्रुपविरुद्ध अॅपने खटला दाखल केला आहे. पण, हे पेगासस आहे तरी काय?

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर: कधीही हॅक होऊ न शकणारा सर्वात सुरक्षित फोन म्हणून बिरुदावली मिळवणाऱ्या आयफोनवर (iPhones) स्पायवेअरचा हल्ला झाल्याने अॅपल कंपनीला मोठा धक्का बसला आहे. अॅपलने आता स्पायवेअर बनवणाऱ्या एनएसओ ग्रुपविरुद्ध (NSO Group) कोर्टात केस दाखल केली आहे. अॅपलने ही केस आयफोन आणि त्याद्वारे तयार केलेल्या इतर उपकरणांना लक्ष्य करण्यासाठी केली आहे. पेगासस स्पायवेअर (Pegasus) घोटाळ्यासाठी इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपला जबाबदार धरण्यात यावे, असे अॅपलने म्हटले आहे. दरम्यान, हा पेगासस स्पायवेअर काय आहे? तो कसा काम करतो?

पेगासस काय आहे? What is Pegasus?

पेगासस हे गुप्तहेर सॉफ्टवेअरचे नाव आहे. गुप्तहेरीचे सॉफ्टवेअर असल्याने त्याला स्पायवेअर असेही म्हणतात. हे इस्रायली सॉफ्टवेअर कंपनी एनएसओ ग्रुपने विकसित केलं आहे. जागतिक स्तरावर याद्वारे 50,000 हून अधिक फोन्सना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये 300 भारतीयांही समावेश आहे.

कसे काम करते? How does it work?

पेगासस हे इस्रायली सायबर सुरक्षा कंपनी NSO Group Technologies ने विकसित केलेले स्पायवेअर आहे. हा एक असा प्रोग्राम आहे जो स्मार्टफोन फोनमध्ये टाकल्यास हॅकरला त्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्स्ट मेसेज, ईमेल आणि लोकेशनची माहिती मिळू शकते. याच्या मदतीने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींना टार्गेट करता येते. फोनमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होताच फोन सर्व्हिलन्स डिव्हाईस म्हणून काम करू लागतो.

सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या अहवालानुसार, पेगाससच्या मदतीने तुम्ही एन्क्रिप्टेड ऑडिओ आणि एनक्रिप्टेड संदेश देखील वाचू शकता. एन्क्रिप्टेड केलेले संदेश असे असतात जे केवळ संदेश पाठवणाऱ्या आणि प्राप्तकर्त्यालाच माहीत असतात. ज्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवला जात आहे ती कंपनी देखील पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही. पेगासस वापरून हॅकर त्या व्यक्तीच्या फोनशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतो.

2019 पर्यंत, हे फोनमध्ये WhatsApp मिसकॉलद्वारे देखील इंस्टॉल करता येत होते. आयफोनमध्ये, iMessage बगचा फायदा घेऊन ते इंस्टॉल केले जायचे. फोनच्या एखाद्या दोषाद्वारे तो फोनमध्ये समाविष्ट केला जातो, ज्याबद्दल फोन किंवा सॉफ्टवेअर कंपनीला माहिती नसते.

तुमचा फोन हॅक झाला आहे? या गोष्टींवरून लगेच लक्षात येईल

एका अहवालानुसार, हे टारगेटजवळ असलेल्या रेडिओ ट्रान्समीटर किंवा रिसीव्हरद्वारे देखील इंस्टॉल केले जाऊ शकते. इन्स्टॉलेशननंतर, हा स्पायवेअर मेसेज, कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, ईमेल, डिव्हाईसचा ब्राउझिंग हिस्ट्री यासह अनेक माहिती सर्व्हरवर पाठवत राहतो. हे फोनच्या कॅमेऱ्यातून वापरकर्त्याचे रेकॉर्डिंग देखील करू शकते.

2016 मध्ये जगाला माहिती

अहवालानुसार, पेगाससशी संबंधित माहिती पहिल्यांदा 2016 मध्ये यूएईचे मानवाधिकार कार्यकर्ते अहमद मन्सूर यांना मिळाली. त्यांना अनेक एसएमएस आले होते, जे त्याच्या मते संशयास्पद होते. त्यातील लिंक चुकीच्या उद्देशाने पाठवल्या गेल्याचा त्यांचा विश्वास होता. त्यांनी आपला फोन टोरंटो विद्यापीठाच्या सिटीझन लॅबमधील तज्ञांना दाखवला. त्यांनी आणखी एका सायबर सिक्युरिटी फर्म 'लुकआउट'ची ​​मदत घेतली. मन्सूर यांचा अंदाज बरोबर होता. त्यांनी लिंकवर क्लिक केले असते तर त्यांच्या आयफोनला मालवेअरची लागण झाली असती. या मालवेअरला पेगासस असे नाव देण्यात आले. यानंतर 2017 मध्ये न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेक्सिकन सरकारवर पेगाससच्या मदतीने मोबाइल हेरगिरीचे उपकरण बनवल्याचा आरोप करण्यात आला होता.

WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा

कंपनीने आरोप फेटाळले

हा प्रोग्रॅम केवळ मान्यताप्राप्त सरकारी संस्थांना विकला जात असून त्याचे उद्दिष्ट "दहशतवाद आणि गुन्हेगारीशी लढा" आहे. कंपनीने कॅलिफोर्निया न्यायालयात सांगितले की ते कधीही त्याचे स्पायवेअर वापरत नाही, फक्त सार्वभौम सरकारे याचा वापर करतात.

Published by: Rahul Punde
First published: November 24, 2021, 7:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या