मुंबई 9 जुलै: काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांचा मे महिन्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना सायटोमेगॅलो विषाणूची (Cytomegalo Virus) लागण झाली होती. तत्पूर्वी त्यांना एप्रिल महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona) झाला होता. त्यातून ते बरे झाले होते; मात्र त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. त्यातच या सायटोमेगॅलो विषाणूचा (CMV) संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती अधिक बिघडली. सातव यांचा मृत्यू झाल्यानंतर या विषाणूचं नाव एकदम चर्चेत आलं; मात्र हा विषाणू नवा नाही. भारतातल्या 80 ते 90 टक्के लोकसंख्येमध्ये हा विषाणू अस्तित्वात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असल्यास किंवा कोणत्याही विकारानंतर ती कमी झाल्यास या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास शरीर आधीच नाजूक झालेलं असतं. त्यामुळे म्युकरमायकॉसिससारखं (Mucormycosis) फंगल इन्फेक्शनही (Fungal Infection) त्या रुग्णांना होऊ शकतं. त्याप्रमाणेच सायटोमेगॅलो विषाणूही हल्ला करू शकतो.
'दैनिक भास्कर'ने वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टर्सशी बोलून सायटोमेगॅलो विषाणू संसर्गाबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्या तज्ज्ञांमध्ये मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधल्या संसर्गजन्य विभागातले कन्सल्टंट डॉ. माला कानेरिया, अहमदाबादच्या नारायणा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागातले तज्ज्ञ डॉ. विवेक दवे आणि जयपूरच्या फोर्टिस एस्कॉर्टस् हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले ज्येष्ठ सल्लागार डॉ. पंकज आनंद यांचा समावेश आहे.
लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार? Zydus Cadila लशीबाबत प्रमुखांनी दिली माहिती
दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सायटोमेगॅलो विषाणू संसर्ग झालेले पाच रुग्ण एप्रिल-मे महिन्यात दाखल झाले होते. त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता, तसंच गुदमार्गाने रक्तस्रावही होत होता. ही लक्षणं त्यांना कोविडच्या निदानानंतर 20-30 दिवसांनी दिसली. गंभीर कोविड संसर्ग आणि अतिरक्तस्राव यांमुळे त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती सर गंगाराम हॉस्पिटलचे प्रा. अनिल अरोरा यांनी दिली.
या पाच रुग्णांचं वय 30 ते 70 वर्षांमधलं होतं. त्यापैकी तीन रुग्णांना अँटीव्हायरल थेरपीने बरं वाटलं. एका रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागली.
कोरोनानंतर Bone death चा धोका; नेमका काय आहे हा आजार?
कोविडच्या गंभीर रुग्णांना सायटोमेगॅलो न्यूमोनिया आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोविड झालेल्या रुग्णांना गुदमार्गाने रक्तस्रावाचं (Rectal Bleeding) लक्षण दिसल्याची नोंद करण्यात आली आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, कोविडसारख्या विकारामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या, तसंच स्टेरॉइड्स किंवा अँटीइन्फ्लेमेटरी औषधं दिलेल्या रुग्णांमध्ये सायटोमेगॅलो विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सायटोमेगॅलो विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं
- ताप, घशात खवखव, अंगदुखी, थकवा, त्वचेवर रॅशेस (Rashes) ही या संसर्गाची सर्वसाधारण लक्षणं आहेत.
- प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर ही लक्षणं कोणत्याही उपचारांविना, दोन-तीन आठवड्यांत कमी होऊन जातात.
- संसर्ग जास्त प्रमाणात झाला, तर शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होतो.
- रुग्णाचं वजन कमी होतं, डायरिया होतो आणि काही रुग्णांना गुदमार्गे रक्तस्रावही होतो. अशा स्थितीत हा संसर्ग प्राणघातकही ठरू शकतो.
संसर्गाचं निदान आणि उपचार
- CMV व्हायरल लोड (क्वांटिटेटिव्ह) किंवा PCR (मॉलिक्युलर टेस्ट) यांतून या संसर्गाचं निदान होतं. या व्यतिरिक्त टिश्यू बायोप्सी आणि DNA PCR टेस्टद्वारेही निदान करता येतं.
- ऑक्सिजन देऊन, तसंच इंट्राव्हेनस अँटीव्हायरल गॅन्सिक्लोव्हिर देऊन या संसर्गाच्या रुग्णांवर उपचार करता येतात. या रुग्णांमध्ये जिवाणूसंसर्गही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या दृष्टीनेही लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
सायटोमेगॅलो विषाणूविषयी...
- सायटोमेगॅलो हा डबल स्ट्रँडेड डीएनए व्हायरस असून, तो ह्यूमन हर्पीस व्हायरस (Human Herpes Virus Family) फॅमिलीतला आहे.
- चिकनपॉक्स आणि इन्फेक्शियस मोनोन्यूक्लिऑसिस होण्यासाठीही हा विषाणू कारणीभूत ठरू शकतो. हे विकार कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतात.
- हेल्दी व्यक्तींची प्रतिकारशक्ती सायटोमेगॅलो विषाणूच्या संसर्गाला प्रतिकार करू शकते. 50 ते 80 टक्के लोकांना वयाच्या चाळिशीपूर्वीच हा संसर्ग होऊ शकतो. लक्षणं न दिसणाऱ्या स्वरूपात किंवा फ्लूसारख्या लक्षणांच्या रूपात हा संसर्ग दिसू शकतो. हा विषाणू शरीरात आला, तर तो आयुष्यभर शरीरात राहतो.
- कोविड-19सारखे प्रतिकारशक्ती कमी करणारे विकार झाले, तर या विषाणूचा धोका वाढतो. स्टेरॉइड्स (Steroids) वगैरेंमुळेही प्रतिकारशक्ती घटू शकते.
- हा विषाणू संसर्गित व्यक्तीचं रक्त, लघवी, लाळ आदींमधून पसरू शकतो. तसंच, मेंदू, हृदय, फुप्फुसं, आतडी, मूत्रपिंडं अशा महत्त्वाच्या अवयवांसह शरीराच्या सर्वच भागांचं नुकसान करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccine, Health