देशात पहिल्या मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची चाचणी; कोरोनाविरोधी लढ्यात काय होणार फायदा?

देशात पहिल्या मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची चाचणी; कोरोनाविरोधी लढ्यात काय होणार फायदा?

पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या 30 ते 45 दिवस घेतल्या जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून : देशातल्या पहिल्या मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची (Medical Dronew Delivery) चाचणी आजपासून (18 जून) होणार आहे. बेंगळुरूपासून 80 किलोमीटरवर असलेल्या गौरीबिदनूर (Gauribidnur) इथं होणार असलेली ही चाचणी बंगळुरूच्या थ्रॉटल एअरोस्पेसेस सिस्टीम्सच्या (Throttle Aerospace Systems) नेतृत्वाखाली होणार आहे. 'डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'कडून (DGCA) या प्रकारच्या ऑब्जेक्ट डिलिव्हरीच्या प्रयोगांसाठी संस्थेला मार्च 2020 मध्येच परवानगी मिळाली होती. मात्र कोरोना महासाथीच्या काळात अन्य काही परवानग्या मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे चाचणी लांबणीवर पडली. पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या 30 ते 45 दिवस घेतल्या जाणार आहेत.

बंगळुरू इथल्या थ्रॉटल एअरोस्पेस सिस्टीम्स या कंपनीच्या नेतृत्वाखाली या क्षेत्रातल्या काही कंपन्यांनी कन्सॉर्शियमची स्थापना केली आहे. बीयाँड दी व्हिज्युअल लाइन ऑफ साइट (BVLOS) या प्रकारच्या मेडिकल ड्रोनच्या साह्याने आजपासून चाचण्या घेतल्या जाणार आहेत. मानवी दृष्टीच्या कक्षेत येऊ न शकणाऱ्या अंतरापर्यंत डिलिव्हरीचं काम करणाऱ्या ड्रोन्सना BVLOS ड्रोन्स असं म्हटलं जातं. या चाचण्यांतर्गत 30 ते 45 दिवस ड्रोनच्या साह्याने गौरीबिदनूर तालुक्यात औषधांची डिलिव्हरी केली जाणार आहे. यासाठी कंपनी मेडकॉप्टर ड्रोन्सच्या दोन प्रकारांचा वापर करणार आहे. छोट्या मेडकॉप्टर ड्रोनमध्ये एक किलोपर्यंतच्या वजनाची वस्तू 15 किलोमीटरपर्यंच्या क्षेत्रात वाहून नेली जाऊ शकते. दुसऱ्या ड्रोनच्या साह्याने दोन किलोपर्यंतच्या वजनाची वस्तू 12 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात वाहून नेली जाऊ शकते. रँडिंट (RANDINT) नावाच्या डिलिव्हरी सॉफ्टवेअरद्वारे हे ड्रोन्स संचालित केले जाणार आहेत.

हे वाचा - 48 तासांत काळे पडले; 42 दिवसांत Black fungus मुळे चिमुकल्यांनी गमावले डोळे

डीजीसीए ही यासाठीची नियामक यंत्रणा असून, कन्सॉर्शियमकडून किमान 100 तास उड्डाण झालं पाहिजे, असा नियम ठेवण्यात आला आहे. थ्रॉटल एअरोस्पेस सिस्टीम्स (TAS) या कंपनीने चाचणी काळात 125 तास उड्डाणाचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

आतापर्यंत भारतात ड्रोन अर्थात मानवरहित उडत्या वाहनांच्या वापरावर निर्बंध आहेत; मात्र आता हळूहळू हे निर्बंध शिथिल केले जात आहेत. वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी त्यांचा वापर करता येण्याच्या दृष्टीने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. भारतात सध्या ड्रोनचा वापर चालकाच्या नजरेच्या टप्प्यातच करण्याची परवानगी आहे. ड्रोनच्या नजरेच्या टप्प्यापलीकडच्या (BVLOS) उड्डाणासाठी प्रयोग करण्याकरिता केंद्र सरकारने मे महिन्यात 20 संस्थांना परवानगी दिली.

थ्रॉटल एअरोस्पेस सिस्टीम्सचे सीईओ नागेंद्रव कंदासामी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला याबद्दल माहिती दिली. 'BVLOS प्रयोगासाठी आणखी दोन कन्सॉर्शियमना परवानगी मिळाली आहे; पण आमची संस्था पहिला कायदेशीर मेडिकल ड्रोन डिलिव्हरी एक्स्परिमेंट करत आहे. 2016पासून आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत. बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला यासाठीच्या समितीकडून चाचण्यांसाठी परवानगी मिळाली. लवकरच आम्ही भारतात व्यावसायिक ड्रोन डिलिव्हरीला सुरुवात करू,' असं ते म्हणाले.

हे वाचा - सावधान! 29 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, WHO नं व्यक्त केली भीती

दुर्गम भागात कोविड-19प्रतिबंधक लशी पोहोचवण्यासाठी ड्रोनद्वारे डिलिव्हरीचा पर्याय वापरता येईल का, याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे. कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने अभ्यास करून हा पर्याय राबवता येण्यासारखा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सरकारने यावर विचार सुरू केला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेच्या वतीने एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेड या संस्थेने दुर्गम भागात लशी आणि औषधांच्या ड्रोनद्वारे डिलिव्हरीसाठी इच्छुक कंपन्यांचे अर्ज मागवले आहेत. किमान 100 मीटर उंचीवर उडू शकतील आणि 35 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतील, अशा ड्रोन्सची मागणी ICMRतर्फे करण्यात आली आहे. यासाठी 22 जूनपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत.

तेलंगण राज्य सरकारने अलीकडेच वैद्यकीय साधनसामग्री ड्रोनद्वारे पाठवण्याची शक्यता तपासण्याचा अभ्यासप्रकल्प सुरू केला आहे. ड्रोन डिलिव्हरीच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार फ्लिपकार्ट आणि डुंझो यांच्यासह काम करत आहे. केंद्र सरकारने तेलंगण सरकारला BVLOSच्या निर्बंधांतून सूट दिली असून, कोविड लशींची डिलिव्हरी ड्रोनद्वारे करता येते का, ते अभ्यासलं जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: June 18, 2021, 4:26 PM IST

ताज्या बातम्या