नवी दिल्ली, 6 एप्रिल : 'वंदे भारत मिशन'अंतर्गत (Vande Bharat Mission) परदेशातून भारतात परतलेल्या भारतीयांच्या कौशल्यांचा आढावा घेण्यासाठी जून 2020 मध्ये केंद्र सरकारने स्किल्ड वर्कर्स अरायव्हल डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट (स्वदेस - SWADES) ही योजना सुरू केली. मायदेशी परतलेल्या भारतीयांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांना साजेसे रोजगार मिळण्यासाठी त्यांना कार्ड देणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्यांनी दिलेली माहिती कौशल्य विकार आणि उद्योजकता मंत्रालयाकडे दिली जाते. त्यामुळे कोणती कौशल्यं असलेल्या व्यक्ती उपलब्ध आहेत, हे समजणं सोपं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हजार 700 व्यक्तींनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अशा तीन मंत्रालयांनी संयुक्तरीत्या हा उपक्रम राबवला आहे.
स्वदेस स्किल कार्डस् (SWADES Skill Cards) असलेल्या व्यक्तींना आगामी रोजगार मेळाव्यांमध्ये नोंदणी करण्यासाठी, सहयोगी देशांमध्ये जाण्यासाठी, तसंच 'स्किल इंडिया' योजनेअंतर्गत रोजगारांसाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकारांमधून रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणं हा या योजनेचा पुढचा टप्पा आहे.
स्वदेस मोहीम म्हणजे काय?
वंदे भारत मोहिमेअंतर्गत देशात परतणाऱ्या नागरिकांच्या कौशल्यांची नोंद या स्वदेस योजनेतून घेतली जाते. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे (Pandemic) परदेशातली नोकरी गेली आणि ज्यांना भारतात परतावं लागलं, त्यांच्या कौशल्यांची (Skills) नोंदणी यामार्फत केली जाते.
अशा व्यक्तींकडे कोणती कौशल्यं आहेत, त्यांचा संबंधित क्षेत्रातला अनुभव (Experience) किती वर्षांचा आहे, अशा माहितीचा डेटाबेस 'स्वदेस'अंतर्गत तयार केला जातो. सगळी माहिती भरल्यानंतर संबंधित व्यक्तीला स्वदेस स्किल कार्ड दिलं जातं.
Explained: ऑस्ट्रेलियात एकाएकी वाढतेय उंदरांची दहशत, लाखोंच्या नुकसानाबरोबरच पँडेमिकची भीती
या योजनेअंतर्गत झालेल्या नोंदणीपैकी 80 टक्के म्हणजे 24 हजार 500 नागरिक आखाती देशांतून म्हणजेच संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया (Saudi Arabia), ओमान (Oman), कतार (Quatar), कुवेत (Kuwait) आणि बहारीन (Baharin) या देशांतून परतलेले आहेत.
कोविड-19ने (COVID-19 Pandemic) माजवलेल्या हाहाकारामुळे एकट्या 'यूएई'मध्ये बांधकाम, अर्थ आणि हॉस्पिटॅलिटी आदी क्षेत्रांमधल्या सुमारे लाखभर भारतीयांना आपली नोकरी गमवावी लागली असल्याचा अंदाज आहे. आशियाचा विचार केला, तर यूएई हा भारतीयांना देशाबाहेर सर्वाधिक रोजगार मिळवून देणारा देश आहे.
'स्किल इंडिया'अंतर्गत असीम अर्थात आत्मनिर्भर स्किल्ड एम्प्लॉयी एम्प्लॉयर मॅपिंग (ASEEM) हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. स्वदेस कार्डधारकांची माहिती या 'असीम' पोर्टलशीही जोडली जात आहे.
असीम ही कुशल मनुष्यबळाची सरकारने केलेली डिरेक्टरी आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा केला जावा आणि उपजीविकेची चांगली साधनं उपलब्ध व्हावीत, हा यामागचा उद्देश आहे.
आतापर्यंत असीम पोर्टलवर 810 कंपन्या/संस्थांनी नोंदणी केली असून, त्यांनी एकत्रितरीत्या देशभरात 5 लाख 10 हजार रोजगारांची उपलब्धता जाहीर केली आहे.
बेरोजगारांना कसा उपयोग होतो?
एकदा स्वदेस कार्ड व्यक्तीला मिळालं, की त्या व्यक्तीची माहिती भारतीय आणि परदेशी कंपन्यांशी शेअर केली जाते. संबंधित व्यक्तीचा अनुभव आणि त्याचं क्षेत्र या गोष्टींनुसार रोजगाराच्या उपलब्ध संधींबद्दलची माहिती संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर आणि ई-मेल अॅड्रेसवर पाठवली जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे पाच हजार भारतीयांना या योजनेचा लाभ झाला असून, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात त्यांना रोजगार मिळाला आहे.
कोविड-19मुळे लागू करण्यात आलेलं लॉकडाउन (Lockdown) आणि अन्य संबंधित कारणांमुळे भारतात 2020मध्ये सुमारे 70 लाख व्यक्तींना बेरोजगार व्हावं लागलं, असा एक अंदाज आहे.
आखाती देशांतल्या कंपन्यांसाठी मनुष्यबळ शोधून देणाऱ्या हायरग्लोबल एचआर सोल्युशन्सचे सीईओ समर शाह यांनी मनीकंट्रोलला सांगितलं, की आखाती देशातली बेरोजगारी वाढली आहे.
'गेल्या 12 महिन्यांत दुबईसारख्या शहरात केवळ वैद्यकीय किंवा तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातच उच्चकौशल्यविभूषित भारतीय नोकरी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. अर्धकुशल प्रकारचे रोजगारही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वदेस स्किल कार्डसारख्या योजना त्यांना उपयोगी ठरू शकतात,' असं समर शाह यांनी सांगितलं.
शाह यांनी असंही सांगितलं, की आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना भारतीय उद्योगांतर्फे प्राधान्य दिलं जातं. त्यांच्या दृष्टीने ते मौल्यवान रिसोर्सेस असतात.
आखाती देशांत सुमारे 90 लाख भारतीय काम करतात. त्यातले बहुतांश भारतीय हॉस्पिटॅलिटी, बांधकाम आणि ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jobs