नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारतीय लष्कराचे (Indian Army) जवान आणि अधिकारी देशाच्या रक्षणाकरिता सीमांवर (Borders) तैनात असतात. देशाचं रक्षण करताना प्रसंगी ते प्राणांची आहुतीही देतात. जवान किंवा अधिकारी देशासाठी हुतात्मा (Martyr) झाले, तर त्यांच्यावर एका विशिष्ट पद्धतीने आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. तमिळनाडूमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Ravat) यांचा मृत्यू झाला. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत या दोघांचं पार्थिव आज (10 डिसेंबर) त्यांच्या घरी आणण्यात आलं. त्या वेळी नागरिकांनी आणि मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते, याबाबतची माहिती घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
जवान किंवा अधिकारी हुतात्मा होतात, तेव्हा त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. सर्वप्रथम शहीद जवानाचं पार्थिव त्यांच्या स्थानिक निवासस्थानी पाठवलं जातं. त्या वेळी लष्कराचे जवान त्यासोबत असतात. अंत्यसंस्कार करताना त्यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटलं जातं. भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, राष्ट्रध्वजाचा (National Flag) वापर फक्त जवानांच्या शवाभोवती लपेटण्यासाठी करता येतो. अन्य कोणत्याही मृत व्यक्तीच्या पार्थिवावर ध्वज कधीच लपेटला जात नाही. या वेळी ध्वज शवपेटीवर ठेवला जातो आणि ध्वजाचा केशरी रंग शवपेटीच्या पुढील बाजूस असतो. याचाच अर्थ ध्वज हा सरळ ठेवला जातो आणि तो चादरीप्रमाणे ठेवला जात नाही.
हे ही वाचा-जीवन मरणाशी संघर्ष करणाऱ्या ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांचं हे पत्र होतंय VIRAL
राज्य, लष्कर आणि केंद्रीय निमलष्कर दलांकडून केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कार विधीव्यतिरिक्त अन्य कोठेही ध्वजाचा वापर पार्थिव लपेटण्यासाठी केला जात नाही. कोणतीही ट्रेन, ट्रेन किंवा बोटीचं हूड, टोकाचा भाग किंवा मागील बाजूला ध्वज लपेटता येत नाही. तसंच ध्वजाचा वापर काहीही देण्यासाठी, घेण्यासाठी, धरण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी आधार म्हणून केला जात नाही.
ध्वज कधीही कबरीमध्ये दफन केला जात नाही किंवा चितेत दहनदेखील केला जात नाही. अंत्यसंस्कारावेळी शहीद जवानाच्या कुटुंबीयांकडे ध्वज दिला जातो. या ध्वजाची घडी घालण्याचीदेखील एक खास पद्धत असते. त्यात ध्वजावरचं अशोक चक्र सर्वांत वर येईल, अशा पद्धतीने घडी केली जाते. शहीद जवानावर अंत्यसंस्कार करतेवेळी लष्कराच्या बँड पथकाकडून शोक संगीत वाजवलं जातं. त्यानंतर बंदुकांची सलामी दिली जाते. बंदुकीनं सलामी देण्याचीदेखील एक विशेष पद्धत असते. यात बंदूक विशिष्ट पद्धतीने झुकवली आणि उंचावली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Indian army