Explainer: इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान कर्जबाजारी

Explainer: इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान कर्जबाजारी

क्रिकेटपटू असताना आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या इम्रान खान यांच्या तोंडचं पाणी पळण्याची स्थिती सध्या आली आहे. पाकिस्तानवर सध्या बरंच कर्ज झालं असून, त्यातलं 46 टक्के कर्ज इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळातलं आहे.

  • Share this:

इस्लमाबाद, 14 मार्च: क्रिकेटपटू असताना आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोंडचं पाणी पळण्याची स्थिती सध्या आली आहे. पाकिस्तानवर (Pakistan) सध्या बरंच कर्ज (Debt) झालं असून, त्यातलं 46 टक्के कर्ज इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळातलं आहे. सध्या पाकिस्तानला एका देशाचं कर्ज चुकवण्यासाठी दुसऱ्या देशाचं कर्ज घ्यावं लागत आहे.

संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) (UAE) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचं कर्ज दिलं होतं. ते तातडीने फेडण्याची मागणी यूएईने (UAE) केली आहे. त्याआधी सौदी अरेबियानेही (Saudi Arabia) पाकिस्तानकडे आपले पैसे परत करण्याची मागणी केली होती. त्या वेळी चीनने पाकिस्तानला मदत केली होती. आता पाकिस्तान कोणापुढे हात पसरणार, हे पाहावं लागेल.

प्रत्येकावर किती कर्ज?

31 डिसेंबर 2019पर्यंत पाकिस्तानवर 40.94 ट्रिलियन रुपयांचं कर्ज झालं होतं. ते वाढून आता 45 ट्रिलियन रुपये झालं आहे. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने (Central Bank of Pakistan) दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालं आहे. तसंच पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयाच्या अहवालातूनही याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच संसदेतही पाकिस्तान सरकारने देशावरच्या कर्जाची माहिती दिली. पाकिस्तानची लोकसंख्या 21.66 कोटी आहे. या लोकसंख्येवर कर्जाच्या रकमेचं दायित्व समान वाटायचं झालं, तर प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर सध्या सरासरी एक लाख 75 हजार रुपयांचं कर्ज आहे.

इम्रान सरकारच्या काळात किती कर्ज?

दी एक्स्प्रेस ट्रिब्यून या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पाकिस्तानवर सध्या असलेल्या एकूण कर्जापैकी 46 टक्के कर्ज इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालं आहे. त्यापूर्वीही पाकिस्तानची स्थिती फारशी चांगली नव्हती; मात्र अलीकडच्या काळात ती फारच बिघडली. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) हेही त्यामागचं एक कारण मानलं जात आहे. पाकिस्तानात गरिबी असल्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत फार कमी कालावधीसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला होता; मात्र तरीही त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.

राजकोशाची जबाबदारी आणि कर्जाची सीमा ठरवणारा अधिनियम पाकिस्तानात 2005मध्ये पारित करण्यात आला होता. त्याचं उल्लंघन सरकारने केल्याचं पाकिस्तानच्याच वित्त मंत्रालयानं कबूल केलं आहे. या अधिनियमानुसार राजकोशातली तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) चार टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये; मात्र इम्रान सरकारच्या काळात ती तूट जीडीपीच्या 8.6 टक्क्यांपर्यंत झाली आहे.

देशाने नवं कर्ज घेतलं, तर त्याची माहिती नागरिकांनाही दिली पाहिजे, जेणेकरून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते आपापल्या परीने प्रयत्न करतील, असं पाकिस्तानचं राजकोशाबद्दलचं धोरण सांगतं; मात्र विद्यमान सरकारने तेही टाळलं आणि खूपच संक्षिप्त अहवाल संसदेत सादर केला. कर्ज का घेण्यात आलं आणि ते वेळच्या वेळी फेडलं का गेलं नाही, अशी अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती त्यात नव्हतीच, असं दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात म्हटलं आहे.

2018च्या मध्यात पाकिस्तानवर एकूण 24.9 ट्रिलियन रुपयांचं कर्ज होतं. म्हणजेच प्रत्येक नागरिकावर तेव्हा सरासरी एक लाख 20 हजार रुपये कर्ज (Loan) होतं. आता ते वाढून प्रति नागरिकावर सुमारे एक लाख 75 हजार रुपयांचं कर्ज आहे.

अनेक देश पाकिस्तानकडे कर्जफेडीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे एकाचं कर्ज फेडण्यासाठी सरकार दुसऱ्या देशापुढे हात पसरत आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या परदेशात असलेल्या मालमत्तेच्या लिलावापर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या.

(हे वाचा:कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममता बॅनर्जी बंधक होण्यास तयार होत्या'   )

पाकिस्तानने आपल्या देशातल्या सोन्याच्या खाणींमध्ये खननासाठी दुसऱ्या देशातल्या कंपन्यांसोबत करार केला होता. नंतर पाकिस्तानने निर्णय बदलला आणि मुदतीआधीच करार रद्द केला. त्या कंपन्यांनी कोर्टात केस दाखल केली आणि तो खटला पाकिस्तान सरकार हरलं आहे. कोर्टाने पाकिस्तानला कंपन्यांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. तो मामला 8.5 अब्ज डॉलरचा आहे. ही फेड पाकिस्तान करू शकला नाही, तर परदेशात असलेली पाकिस्तानची आलिशान हॉटेल्स किंवा अन्य मालमत्तेचा लिलाव करावा लागेल. लिलाव थांबवण्यासाठी पाकिस्तान सरकारला खूप जोर लावावा लागेल किंवा दंडाची रक्कम भरावी लागेल. ही दंडाची रक्कम पाकिस्तानच्या जीडीपीच्या सुमारे दोन टक्के एवढी आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे.

First published: March 14, 2021, 11:41 PM IST

ताज्या बातम्या