पेशावर, 31 जानेवारी : पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या एका मशिदीत सोमवारी (30 जानेवारी 2023) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत 90 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 200हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उमर खालिद खुरासानीच्या मृत्यूचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं टीटीपीने स्पष्ट केलं आहे. टीटीपी ही दहशतवादी संघटना नेमकी कशी आहे, उमर खालिद खुरासानी कोण होता, त्याच्या मृत्यूचा बदला अशा पद्धतीनं का घेतला गेला, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊ या.
पाकिस्तानमधल्या पेशावरातल्या हाय सिक्युरिटी झोनमधल्या एका मशिदीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तहरीक-ए- तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला उमर खालिद खुरासानीच्या मृत्यूचा बदला म्हणून केल्याचं टीटीपीने म्हटलं आहे.
बदला घेण्याच्या उद्देशाने पेशावरच्या मशिदीवर हल्ला केला गेला. खुरासानीच्या मृत्यूचा हा बदला होता. खुरासानीचा जन्म पाकिस्तानमधल्या मोहम्मद एजन्सीत झाला. उमर खालिद खुरासानीचं खरं नाव अब्दुल वली मोहम्मद असं होतं. त्याचं प्राथमिक शिक्षण त्याच्या साफो या गावात झालं. त्यानंतर त्याने कराचीतल्या अनेक मदरशांमध्ये शिक्षण घेतलं. तो अत्यंत कमी वयात दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. सुरुवातीच्या काळात तो पाकिस्तानमधल्या हरकत -उल-मुजाहिदीन या इस्लामिक जिहादी संघटनेशी संबंधित होता. ही संघटना प्रामुख्याने काश्मीरमध्ये सक्रिय होती. त्यामुळे तो काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी जिहादमध्ये सामील झाला; मात्र तरुणपणात तो तहरीक-ए-तालिबानमध्ये सामील झाला.
वाचा - जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावर दहशतवाद्यांचा हल्ला, गोळीबारात 8 ठार
तहरीक-ए - तालिबान पाकिस्तानची स्थापना 2007मध्ये झाली. सर्व दहशतवादी गटांनी एकत्र येऊन टीटीपीची स्थापना केली. टीटीपीला पाकिस्तान तालिबान असंही म्हणतात. पाकिस्तानात इस्लामी सत्ता प्रस्थापित करणं हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. ऑगस्ट 2008मध्ये पाकिस्तानी सरकारने टीटीपीवर बंदी घातली. 2002मध्येच टीटीपीची मुळं घट्ट होऊ लागली होती. ऑक्टोबर 2001मध्ये अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानमधली तालिबानची सत्ता उलथून टाकल्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पलायन केलं आणि ते पाकिस्तानमध्ये आश्रयाला गेले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू केलं.
डिसेंबर 2007मध्ये बैतुल्लाह महसूदने टीटीपीची घोषणा केली. 5 ऑगस्ट 2009मध्ये महसूद मारला गेला. त्यानंतर हकिम उल्लाह महसूद टीटीपीचा नेता बनला. 1 नोव्हेंबर 2013 रोजी त्याचा मृत्यू झाला. हकिमउल्लाहच्या मृत्यूनंतर मुल्ला फजलुल्लाहाला नवा नेता म्हणून घोषित करण्यात आलं. 22 जून 2018 रोजी अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तोदेखील मारला गेला. सध्या नूरवली महसूद टीटीपीचं नेतृत्व करत आहे.
पाकिस्तान तालिबान अफगाणिस्तानमधल्या तालिबानपेक्षा वेगळी आहे; मात्र या दोन्हींचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे निवडून आलेलं सरकार उलथवून टाकणं, कट्टर इस्लामी कायदा लागू करणं. टीटीपीचा उद्देश पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध दहशतवादी मोहीम सुरू करणं आणि सत्तापालट करणं हा असल्याचं अमेरिकी सरकारच्या अहवालात म्हटलं आहे. आमचं उद्दिष्ट संपूर्ण पाकिस्तानमध्ये इस्लामिक खिलाफत आणण्यासाठी पाकिस्तानी सरकार उलथून टाकणं हे आहे, असं टीटीपीचे नेते उघडपणे सांगतात.
2009पासून आतापर्यंत पाकिस्तान तालिबानने अनेक धोकादायक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. यात 2008मध्ये इस्लामाबादमधलं मॅरिएट हॉटेल आणि 2009मध्ये लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे. 2012मध्ये टीटीपीने मलाला युसुफझाईवरही हल्ला केला होता. टीटीपीने मलालावर गोळ्या झाडल्या होत्या. मलाला ही वेस्टर्न माइंडेड मुलगी असल्याचं त्या वेळी टीटीपीने म्हटलं होतं. 2014मध्ये टीटीपीने पेशावरमधल्या एका सैनिकी शाळेवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात किमान 150 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 131 विद्यार्थ्यांचा समावेश होता. मागच्या वर्षी टीटीपीने पाकिस्तान सरकारशी झालेल्या युद्धविराम कराराचंही उल्लंघन केलं होतं. टीटीपीने आपल्या सैनिकांना सुरक्षा यंत्रणांशी संबंधित व्यक्तींना ठार मारण्याचे आदेश दिले होते. खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या लक्की मारवत जिल्ह्यातल्या वरगारा पोलीस ठाण्यावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारली नसली तरी यामागे टीटीपीचा हात असल्याची चर्चा आहे.
वाचा - मशिदीसमोर भीक मागायची महिला, चौकशी केल्यावर पोलिसही हादरले
दरम्यान, टीटीपीमध्ये सामील झालेला उमर खालिद खुरासानी हा काश्मीरमध्ये बराच काळ सक्रिय होता. टीटीपीमध्ये सहभागी होण्यापूर्वी तो पत्रकार आणि कवी होता. तो टीटीपीमध्ये कधी सामील झाला याबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही, परंतु, ऑगस्ट 2014मध्ये त्याने टीटीपीपासून फारकत घेतली आणि जमात-उल-अहरारची स्थापना केली. ही टीटीपीशी निगडित एक दहशतवादी संघटना होती. जमात-उल-अहरार ही सामान्य नागरिक, अल्पसंख्याक आणि लष्करी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत होती. खुरासानी अफगाणिस्तानमधल्या नांगरहार आणि कुनार प्रांतातून दहशतवादी कारवाया करत होता. जमात-उल-अहरार पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातली सर्वांत सक्रिय संघटना होती. या संघटनेनं अनेक दहशतवादी हल्ले केले. यात मार्च 2016मध्ये गुलशन-ए-इक्बाल अॅम्युजमेंट पार्कवरचा हल्ला सर्वांत भयानक होता. याशिवाय इस्टरच्या निमित्ताने लाहोरमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 70हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी कारवायांमुळे खुरासानी अमेरिकेच्या नजरेत आला आणि मार्च 2018मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्याच्यावर 30 लाख डॉलर्सचं इनाम घोषित केलं. जमात उल-अहरार ही खरं तर टीटीपीशी जोडली गेली होती; पण ती आपल्या पद्धतीने हल्ले करत असे. मार्च 2015 मध्ये ही संघटना टीटीपीत विलीन झाली.
खुरासानी हा जमात-उल-अहरारशी संबंधित असल्याने आणि तो त्याच्या पद्धतीने दहशतवादी कारवाया करत असल्याने अमेरिका त्याच्यावर लक्ष ठेवून होती. अफगाणिस्तानात बसून तो काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचं काम करत होता. काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्यासाठी तो सातत्याने आपलं नेटवर्क मजबूत करत होता. हाच तो काळ होता, जेव्हा जमात-उल-अहरारने पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले. त्यामुळे अमेरिकेने त्याच्यावर 30 लाख डॉलर्सचं बक्षीस ठेवलं होतं. खुरासानी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातल्या कोणत्याही प्रकारच्या चर्चेचं समर्थन करत नव्हता.
ऑगस्ट 2022मध्ये अफगाणिस्तानमधल्या पाकटीक भागात उमर खालिद खुरासानीच्या वाहनाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्या वेळी खुरासानीसोबत टीटीपीचे आणखी दोन कमांडर होते. बॉम्बस्फोटात या तिघांचा मृत्यू झाला. तथापि, त्यापूर्वी पाकिस्तान सैन्याच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो बचावला होता. खुरासानी तीन वेळा ड्रोन हल्ल्यातून बचावला होता. डिसेंबर 2021 आणि फेब्रुवारी 2022मध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये थोडक्यात बचावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Terrorist attack