मुंबई, 18 मार्च : भारताच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांना देशाचे राष्ट्रपिता मानले जाते. इतिहासात असे अनेक प्रसंग आले जेव्हा गांधीजींनी आपले कणखर चारित्र्य सिद्ध केलं. आजपासून शंभर वर्षांपूर्वी गांधीजींसाठी असाच कसोटीचा दिवस होता. त्यांनी असहकार आंदोलन बंद केलं होतं. देशातील तरुणाई त्यांच्यावर नाराज होती. जनतेत संताप आणि निराशा होती. त्यामुळे इंग्रजांमध्येही त्यांची भीती कमी झाली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा (Treason) खटला चालवण्यात आला. 18 मार्च 1922 या दिवशी त्यांना 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती.
रौलेट कायद्याच्या विरोधात आंदोलन
1919 मध्ये रौलेट कायद्याच्या विरोधात देशातील लोक ब्रिटिशांच्या विरोधात एकजूट होऊ लागले. 19 एप्रिल रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाने या निषेधाच्या आगीत आणखीच भर पडली. संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले. हे लक्षात घेऊन गांधीजी आणि काँग्रेसने देशात असहकार आंदोलन सुरू केले, ज्याला संपूर्ण देशातील प्रत्येक घटकाचे सहकार्य मिळाले.
असहकारासाठी अभूतपूर्व सहकार्य
अशा आंदोलनाची आजच्या काळात केवळ कल्पनाच करता येईल. ज्या काळात सोशल मीडिया सोडा, टेलिफोनही आवाक्याबाहेर होता. गांधीजींच्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला. विद्यार्थी, गरीब, मजूर, शेतकरी, अगदी सरकारी कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले होते. अशा स्थितीत ब्रिटिश राजवटीला मोठा धक्का बसला.
एका घटनेने सर्व काही बदलले
फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे निदर्शनादरम्यान शेतकऱ्यांच्या एका गटाने पोलिस स्टेशन जाळले. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी मारले गेले. या घटनेने गांधीजी खूप निराश झाले आणि त्यांनी आंदोलन संपवण्याची घोषणाही केली. कोणत्याही आंदोलनाच्या यशाचा पाया हिंसेवर घातला जाऊ शकत नाही, असे मत त्यांनी मांडले. हा खूप मोठा पण कठीण निर्णय होता.
अंतराळावर नेमकं कोणाचं वर्चस्व? रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख्या जगावर संकट?
एक धोकादायक निर्णय
असहकार आंदोलन संपल्याने देशातील अनेकांची निराशा झाली. याची जाणीव असतानाही गांधीजींनी एवढा मोठा निर्णय घेतला. ज्याची आजच्या युगात कल्पनाही करता येणार नाही. एक प्रकारे गांधींची राजकीय कारकीर्दच पणाला लागली होती. तरुणांमध्ये नाराजी पसरली होती. अनेक लोक हिंसक क्रांतिकारी मार्गाकडे वळले. काँग्रेसमध्येही अनेक नेते गांधीजींबद्दल निराश झाले होते. उघडपणे त्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस कोणी केले नाही, पण नंतर ते स्वतःचा वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
इंग्रजांनाही संधी मिळाली
गांधीजींना असहकार आंदोलनात मिळालेल्या यशाने इंग्रजही घाबरले होते. त्यांच्यावर कोणतेतरी आरोप करून त्यांला अटक केली तर भारत त्यांना गमवावा लागू शकतो, अशी भिती त्यांना होती. मात्र, चळवळ रद्द झाल्यानंतर, गांधींबद्दल लोकांची निराशा वाढली आणि 10 मार्च 1922 रोजी गांधींना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
सहा वर्षे तुरुंगवास
यंग इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या तीन लेखांचा आधार घेऊन इंग्रजांनी गांधींवर देशद्रोहाचा आरोप लावला होता. 18 मार्च 1922 रोजी, न्यायाधीश ब्रूम फील्ड, जे त्यांच्या खटल्याची सुनावणी करत होते, त्यांनी गांधींना देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गांधीजींना पूर्ण जाणीव होती की आपल्यासोबत असे होऊ शकते, मग त्यांनी आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयाला नेहमीच समर्थन दिले आणि अहिंसेच्या आपल्या युक्तिवादावर ठाम राहिले.
दोन वर्षे तुरुंगात राहिल्याने गांधीजींची तब्येत बिघडू लागली आणि इंग्रजांना त्यांची सुटका करावी लागली. या काळात गांधीजींनी जो संयम आणि दूरदृष्टी दाखवली त्यामुळे त्यांच्या तत्त्वांना चिकटून राहण्याची त्यांची क्षमता दिसून आली. ते आजच्या युगात दिसत नाही. अर्थात, त्या वेळी लोकांमध्ये गांधींविरोधात निराशा आणि चीड देखील होती. परंतु, हे सर्व लवकरच नाहीसे झाले आणि गांधीजींनी काही वर्षांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, ज्यामुळे इंग्रजांना दोन पावलं माघार घ्यावी लागली. जे त्यावेळी देशासाठी पुरेसे नव्हते, पण भारतीय स्वातंत्र्य चळवळ आकार घेऊ लागली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mahatma gandhi