Home /News /explainer /

मतदान ते मतमोजणी.. कशी होते विधान परिषदेची निवडणूक? काय आहे नियमावली?

मतदान ते मतमोजणी.. कशी होते विधान परिषदेची निवडणूक? काय आहे नियमावली?

राज्यात उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे (Vidhan Parishad Election) उभ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

    मुंबई, 19 जून : विधान परिषदेची (Vidhan Parishad Election) सोमवारी (20 जून) होत असलेल्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे (Rajya Sabha Election) विधान परीषद निवडणूकही बिनविरोध न होता अटीतटीच्या लढतीने होत आहे. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेप्रमाणे मतदान प्रक्रिया होत नाही. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघीडीसोबतच (Maha Vikas Aghadi) विरोधी पक्ष भाजपनेही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलंय. अशावेळी विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला असेल. विधानपरिषदेच्या निवडणुकीची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम विधान परिषदेची रचना जाणून घेणे आवश्यक आहे. विधानसभेच्या विपरीत, विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. एखाद्या राज्याच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या विधानसभेच्या सदस्यांच्या एक तृतीयांश आणि किमान 40 इतकी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच राज्य विधानसभेच्या सदस्यसंख्येशी त्याचा थेट संबंध आहे. विधानसभेतील बहुमत कोणत्याही किंमतीत राखले जावे, यासाठी असे करण्यात आले आहे. राज्यघटनेत विधान परिषदेच्या सदस्यांची कमाल आणि किमान सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या संसदेद्वारेच ठरवली जाते. असे सदस्य निवडले जातात विधान परिषदेचे सदस्य पाच प्रकारे निवडले जातात. सर्वप्रथम, विधानपरिषदेच्या सदस्यांच्या संख्येपैकी 1/3 सदस्य हे नगर पंचायत, नगरपालिका आणि जिल्हा मंडळ इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. या सदस्यांच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधीच मतदार असू शकतात. याद्वारे विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीत्व सुनिश्चित करण्यात आले आहे. विधान परिषदेचे 1/12 सदस्य त्या राज्यात राहणाऱ्या पदवीधरांकडून निवडले जातात. 3 वर्षांच्या पदवीनंतर, एखादी व्यक्ती पदवीधर मतदारसंघात मतदार होण्यास पात्र ठरते. विधान परिषदेच्या निवडणुकीचा 'असा' आहे नंबर गेम, भाजप पुन्हा चमत्कार घडवणार? त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे 1/12 सदस्य हे 3 वर्षे शिक्षकी पेशात काम करणाऱ्या लोकांकडून निवडले जातात. मात्र, हे शिक्षक माध्यमिक शाळांखालील शाळांतील नसतात. याशिवाय, विधानपरिषदेचे 1/3 सदस्य हे विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात. तर उर्वरित सदस्यांना साहित्य, ज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींमधून राज्यपाल नामनिर्देशित करतात. अशा प्रकारे विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 5/6 सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जातात. तर 1/6 हे राज्यपाल स्वतःच्या इच्छेने नामनिर्देशित करतात. तसेच, हे सर्व सदस्य एकल हस्तांतरणीय मताद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे निवडले जातात. राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांच्या नामनिर्देशनाला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात आव्हान देता येत नाही. विधानपरिषद स्थापनेची ही प्रक्रिया घटनेत निश्चितच दिलेली आहे, पण ती कायमस्वरूपी नाही आणि अंतिमही नाही. संसद त्यात आवश्यक त्या सर्व सुधारणा करू शकते. मात्र, विधानपरिषदांच्या स्थापनेबाबत संसदेने अद्याप कोणतीही नवीन तरतूद केलेली नाही. 'मविआ'चे संख्याबळ महाविकास आघाडीकडे एकूण 152 आमदार आहेत. त्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसकडे 44 जण आहेत. विजयासाठी प्रत्येकाला 27 मते लागतील. त्यामुळे 6 उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज असेल. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार उभे केलेत. हा दुसरा गडी जिंकण्यासाठी पक्षाला अजून 10 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट करा, आणि.... : सुधीर मुनगंटीवार भाजपचे आकड्याचे गणित भाजपच्या पारड्यात 106 आमदार आहेत. अपक्षांची मदत घेतली, तर हे संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्याच्या जोरावर 4 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, 5 वा उमेदवार जिंकण्यासाठी भाजपला अजून 22 आमदारांची मते मिळवावी लागतील. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. त्यात 12 अपक्षांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ आपण भाजपच्या पारड्यात धरले तरीही अजून 12 मतांची सोय पक्षाला करावी लागेल. गुप्त मतदान पद्धती विधानसभेच्या 288 सदस्यांमधून विधान परिषदेचे 10 सदस्य निवडून द्यायचेत. त्यासाठी मतदान गुप्त होते. पक्ष व्हीप काढतात, मात्र ते पक्षाच्या एजंटांना दाखवायचे नसते. त्यामुळे इथे राज्यसभेसारखे उघड नव्हे, तर गुप्त मतदान पद्धती आहे. आता या 10 उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रत्येकी 27 मते हवीत. प्रत्येक मताचे मूल्य 100 असते. म्हणजे 2800 मते मिळणारा उमेदवार विजयी होतो. मात्र, मतदान कमी झाले, तर कोटा कमी होऊ शकतो. आमदारांना मते देताना 1, 2, 3, 4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात. यात 1 नंतर 2 पसंती क्रमांक दिला नाही, तर त्याने दिलेले पुढचे पसंती क्रमांक बाद होतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: BJP, Vidhan parishad maharashtra

    पुढील बातम्या