मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : नावात काय आहे? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं...

Explainer : नावात काय आहे? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं...

लग्न झाल्यानंतर अचानक एके दिवशी नाव, आडनाव वगैरे सगळं बदलून नवी ओळख स्वीकारणं नक्कीच अवघड असतं. त्यामुळेच यावर काही वेळा वादही होतात

लग्न झाल्यानंतर अचानक एके दिवशी नाव, आडनाव वगैरे सगळं बदलून नवी ओळख स्वीकारणं नक्कीच अवघड असतं. त्यामुळेच यावर काही वेळा वादही होतात

लग्न झाल्यानंतर अचानक एके दिवशी नाव, आडनाव वगैरे सगळं बदलून नवी ओळख स्वीकारणं नक्कीच अवघड असतं. त्यामुळेच यावर काही वेळा वादही होतात

    मुंबई, 14 ऑगस्ट- लग्नानंतर मुलीचं नाव (Name) आणि आडनाव (Surname) बदलण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. त्याला कायद्याचा आधार मात्र नाही. लग्नानंतर मुलीला आपलं नाव किंवा आडनाव बदलणं बंधनकारक नाही, असं कायदा सांगतो. आतापर्यंत चालत आलेल्या या पद्धतीत नव्या काळानुसार बदल दिसतो आहे. अनेक मुली लग्नानंतरही (Change of Name after marriage) आपलं आधीचंच नाव कायम ठेवत आहेत. कारण नाव ही प्रत्येकाची जन्मापासून मिळालेली ओळख असते. लग्न झाल्यानंतर अचानक एके दिवशी नाव, आडनाव वगैरे सगळं बदलून नवी ओळख स्वीकारणं नक्कीच अवघड असतं. त्यामुळेच यावर काही वेळा वादही होतात. त्यापुढची गोष्ट म्हणजे मुलांना आईचं आडनाव द्यायचं की वडिलांचं, हाही वादाचा मुद्दा ठरू शकतो. वडिलांचं (Father's Surname) आडनावच मुलांना मिळतं, ही चालत आलेली रीत झाली; मात्र मुलांना आईचं आडनाव लावायचाही हक्क आहे, असं कोर्टाने नुकतंच एका प्रकरणात सांगितलं.

    एका अल्पवयीन बालिकेचे आई-वडील विभक्त झाले होते. त्या बालिकेचं आडनाव बदलून तिच्या आईने तिला तिचं आडनाव दिलं होतं. हा मुद्दा त्या बालिकेच्या वडिलांनी दिल्ली हायकोर्टात नेला. मुलीच्या नावापुढे आईचं आडनाव लावलं गेलं आहे, ते बदलून वडिलांचं आडनाव लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्या मुलीच्या नावाने घेतलेल्या पॉलिसीचा क्लेम करताना अडचण येईल. कारण पॉलिसी घेताना तिच्या नावापुढे वडिलांचं आडनाव होतं, असं त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. कोर्टाने मात्र ही याचिका फेटाळून लावली. वडील मुलीवर त्यांचं आडनाव लावण्याची सक्ती करू शकत नाहीत, असं कोर्टाने सांगितलं. तसंच, प्रत्येक मुलाला/मुलीला त्याची/तिची स्वतःची इच्छा असेल तर त्याच्या/तिच्या आईचं आडनाव लावण्याचा अधिकार आहे, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर, नावं आणि आडनावं यांबद्दल सविस्तर चर्चा करणारं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं आहे.

    भारतीय घटनेमध्ये (Indian Constitution) नाव आणि आडनाव यांबद्दल कोणत्याच प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाहीये; मात्र या विषयातल्या वेगवेगळ्या याचिका वेळोवेळी कोर्टात दाखल झाल्या आहेत. त्या वेळी कोर्टांनी दिलेले निर्णय या संदर्भात ग्राह्य धरले जातात. 2016 साली अहमदाबाद पश्चिम मतदारसंघातले भाजप खासदार किरीट सोळंकी यांनी एक खासगी विधेयक संसदेत मांडलं होतं. वैयक्तिक, कायदेशीर किंवा ऑफिशियल अशा कोणत्याही कामात आडनावाचा वापर केला जाऊ नये, अशी मागणी या विधेयकात केली गेली होती; मात्र हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही.

    (हे वाचा: ‘ही’ चिन्ह शरीरावर असतील तर, ती मुलगी असेत Lucky; तुम्ही आहात का भाग्यवान?)

    2012मध्ये मुंबई हायकोर्टाने एका खटल्यात निकाल देताना सांगितलं, की महिलेने लग्नानंतरही आपलं पहिलंच नाव कायम राखणं पूर्णतः वैध आहे. तसंच, पतीचं आडनाव लावायचं की नाही, याचा निर्णयही ती स्वतः घेऊ शकते.

    जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतही नावांच्या संदर्भात वेगवेगळे नियम आहेत. नेदरलँडमध्ये (Netherlands) दाम्पत्याला पहिलं मूल झालं, की पती किंवा पत्नी यांपैकी कोणाचंही आडनाव लावता येतं; मात्र त्यानंतर त्या दाम्पत्याला जी मुलं होतील, त्यांना मात्र पहिल्या मुलाला जे आडनाव लावलं आहे तेच लावावं लागतं. तसंच, लग्न न झालेल्या दाम्पत्याला मूल झालं आणि त्या दाम्पत्याने मुलाला काय आडनाव लावायचं हे ठरवलं नाही, तर त्याला त्याच्या आईचं आडनाव मिळतं.

    जपानच्या (Japan) सुप्रीम कोर्टाने याच वर्षी जूनमध्ये दिलेल्या एका खटल्याच्या निकालावेळी स्पष्ट केलं, की लग्न झालेल्या दाम्पत्याचं आडनाव एकसारखंच असावं. अर्थात, पत्नीनेच पतीचं आडनाव लावावं असं यात सांगितलेलं नाही. कोणीही कोणाचंही आडनाव लावलं तरी चालेल; मात्र पती आणि पत्नी या दोघांचंही आडनाव एकच हवं. अर्थात, असं असलं तरीही जपानमध्ये 96 टक्के महिलाच लग्नानंतर आपलं आडनाव बदलून पतीचं आडनाव लावतात. दक्षिण कोरियातही काहीसा असाच नियम आहे.

    (हे वाचा:डावखुऱ्या व्यक्तींचा मेंदू असतो आपल्यापेक्षा तल्लख? वाचा तज्ज्ञ काय सांगतात)

    भारतात नाव/आडनाव ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आडनावांवरून जात, पेशा, शिक्षण, उपाधी, गोत्र, पंथ, गाव, शहर आदी गोष्टी कळू शकतात. कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे दोन मुख्य भाग असतात. एक म्हणजे त्याचं स्वतःचं नाव आणि कुटुंबाचं नाव म्हणजेच आडनाव. महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांमध्ये स्वतःचं नाव आणि आडनाव यांमध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव लावण्याची पद्धत आहे. बिहारमध्ये जातिवाचक आडनावांऐवजी कुमार, प्रसाद अशी आडनावं लावण्याचीही एक पद्धत आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातीवरून होणारा भेदभाव टाळण्याच्या हेतूने अशा प्रकारची नावं लावण्यास सुरुवात झाली. अर्थात, आता त्याला 50 वर्षं झाली तरी जातीवरून होणारे भेदभाव संपलेले नाहीत. बिहारमध्ये राय, सिन्हा, सिंह आदी आडनावं एकापेक्षा जास्त जातींचे नागरिक वापरतात.

    देशात, तसंच जगभरात अशीही पद्धत काही ठिकाणी आहे, ज्यात आपल्या गावाच्या किंवा प्रदेशाच्या नावाचा उल्लेख असतो. उदा. पूनावाला, पॅरिस हिल्टन, इत्यादी. काही आडनावं संबंधित कुटुंबाच्या पारंपरिक पेशाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, मार्क बुचर, मार्क टेलर इत्यादी.

    लग्नानंतर मुलींचं नाव बदलण्याची पद्धत आपल्याकडे रूढ असली, तरी अलीकडच्या काळात त्यात बदल होऊ लागला आहे. सेलेब्रिटी महिलांसह अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या अनेक महिलाही अलीकडे लग्नानंतरही आपलं नाव-आडनाव बदलत नाहीत. काही महिला यात सुवर्णमध्य साधतात आणि माहेर आणि सासर अशा दोन्हींकडचं नाव लावतात. उदा. प्रियांका गांधी-वद्रा.

    (हे वाचा:हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य  )

    दक्षिण भारतात (South India) महिला पहिल्या नावाच्या जागी वडिलांच्या नावाचं आद्याक्षर वापरतात. उदाहरणार्थ जे. जयललिता. यात जे. हे त्यांच्या वडिलांच्या जयराम या नावाचं आद्याक्षर आहे. अशा प्रकारे नाव लावणाऱ्या काही महिला लग्नानंतर वडिलांच्या नावाच्या आद्याक्षराऐवजी पतीच्या नावाचं आद्याक्षरही वापरतात. काही महिला लग्नानंतर स्वतःचं नाव कायम ठेवतात; पण संपूर्ण नाव लिहिताना पतीचं नाव आणि आडनावही लिहितात. उदाहरणार्थ, स्मृती मल्होत्रा यांनी लग्नानंतर स्मृती झुबेन इराणी असं नाव लावायला सुरुवात केली.

    नावात काय आहे, असं शेक्सपीअरने म्हटलेलं असलं, तरी नावातच सर्व काही आहे, हे आपल्याला माहिती आहे. कारण नाव हीच आपली ओळख असते. आजच्या तंत्रज्ञान युगात तर ती अधिकच महत्त्वाची आहे. स्वतःचं नाव, आडनाव कशा पद्धतीने लिहायचं, याचा अधिकार पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा आहे; मात्र पासपोर्ट, व्हिसा किंवा कोणत्याही सरकारी कागदपत्रावर नाव लिहिताना नाव आणि आडनाव या दोन्ही गोष्टी लिहायला हव्यात. तसंच सर्वच सरकारी कागदपत्रांवर नाव एकाच पद्धतीने लिहायला हवं. नाही तर ओळख पटवताना समस्या निर्माण होऊ शकते. तसंच, कम्प्युटराइज्ड सिस्टीम असल्यामुळे नाव नीट न लिहिल्यास काही समस्याही निर्माण होऊ शकतात.

    First published:

    Tags: Lifestyle