Home /News /explainer /

Toilet Flush ला दोन बटणं का असतात? मोठ्याचा वापर करण्याआधी व्हा सावध!

Toilet Flush ला दोन बटणं का असतात? मोठ्याचा वापर करण्याआधी व्हा सावध!

भारतासारख्या देशात एके काळी शौचालयांची वानवा होती, तिथे आता घरोघरी आधुनिक शौचालयं (Modern Toilets) दिसू लागली आहेत. शौचालयं, त्यांची स्वच्छता (Cleanliness) गरजेची असल्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.

मुंबई, 20 मे : भारतासारख्या देशात एके काळी शौचालयांची वानवा होती, तिथे आता घरोघरी आधुनिक शौचालयं (Modern Toilets) दिसू लागली आहेत. शौचालयं, त्यांची स्वच्छता (Cleanliness) गरजेची असल्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. एकंदरीतच स्वच्छतेकडे समाज अधिक सजगतेनं पाहू लागला आहे. आता आधुनिक शौचालयांमध्ये होणाऱ्या पाणी वापराकडे तितक्याच सजगतेनं पाहण्याची गरज आहे. त्यावर उपाय म्हणून शौचालयांमध्ये ड्युएल फ्लश (Dual Flush) लावला जातो. आधुनिक शौचालयातल्या या ड्युएल फ्लशला दोन बटणं असतात. या दोन बटणांमागचं कारण काय आहे, याचा विचार केला आहे का? त्याबद्दल जाणून घेऊ या. आधुनिक शौचालयांमुळे पाण्याचा अतिरिक्त वापर होतो अशी ओरड ऐकू येते. फ्लशमधून येणाऱ्या बेसुमार पाण्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाण्याची नासाडी होते. याच कारणासाठी दोन बटणं असलेला म्हणजेच ड्युएल फ्लश अनेक ठिकाणी लावलेला आढळतो. या दोन बटणांमागे पाण्याची बचत करणं (Save Water) हाच महत्त्वाचा उद्देश आहे. एकाच कामासाठी दोन बटणांचं काय काम असंही अनेकांना वाटू शकतं; पण त्या दोन्ही बटणांचं कार्य वेगवेगळं असतं. अशा पद्धतीच्या फ्लशला ड्युएल फ्लश म्हणतात. ड्युएल फ्लशच्या दोन्ही बटणांचं काम कसं असतं, हे जाणून घेऊया. अनेक लिटर पाण्याची बचत ड्युएल फ्लशमधली दोन्ही बटणं एक्झिट व्हॉल्व्हला जोडलेली असतात. त्यापैकी मोठ्या बटणाच्या वापरानं 6 ते 9 लिटर पाणी शौचालयात सोडलं जातं, तर छोट्या बटणाच्या वापरानं 3 ते साडेचार लिटर पाणी खर्च होतं. यामुळे पाण्याची बचत होते. आपल्या गरजेनुसार छोट्या किंवा मोठ्या बटणाचा वापर करता येतो. त्यामुळ दिवसभरात अनेक लिटर पाण्याची बचत साध्य होते. सिंगल फ्लशच्या तुलनेत ड्युएल फ्लश निश्चितच फायदेशीर आहे. याची किंमत सिंगल फ्लशपेक्षा थोडी जास्त असते; पण दूरदृष्टीनं विचार केला, तर ड्युएल फ्लशच अधिक उपयोगी आहे. अमेरिकन इंडस्ट्रियल डिझायनर व्हिक्टर पपनेक यांना ड्युएल फ्लशची कल्पना पहिल्यांदा सुचली. अशा प्रकारचा फ्लश तयार करण्यामागे अर्थातच पाण्याची कमतरता हेच प्रमुख कारण होतं. ऑस्ट्रेलियात असा फ्लश वापरून पहिल्यांदा शौचालय तयार करण्यात आलं. आज जगभरातल्या अनेक शौचालयांमध्ये ड्युएल फ्लश लावलेला असतो. आजवर ड्युएल फ्लशमधल्या दोन बटणांचं कार्य माहीत नसणाऱ्यांनी पाण्याचा भरपूर वापर केला असेल. आता ही माहिती जाणून घेतल्यावर कोणीही गरजेपेक्षा जास्त पाणी वाया घालवणार नाही. सिंगल फ्लशमुळे पाण्याची नासाडी होते, तेच ड्युएल फ्लश लावला तर काही प्रमाणात का असेना, पण पाण्याची बचत होते. एखादी वस्तू, उपकरण केवळ आधुनिक सोयींनी युक्त असून चालत नाही, तर भविष्यात टिकून राहण्यासाठी त्यात काय बदल करता येईल, हे पाहावं लागतं. आता पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेतली, तर त्या दृष्टीनंही कंपन्यांना एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे.
First published:

पुढील बातम्या