श्रीनंगर, 3 जून : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir Updates) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गेल्या 27 दिवसांत दहशतवाद्यांनी 10 जणांची हत्या केली आहे. परिणामी पुन्हा एकदा काश्मिरी पंडित राज्य सोडताना पाहायला मिळत आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनाची जखम 30 वर्षांनंतरही भरलेली नाही. जानेवारी 1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले. काश्मिरी पंडित काफिर आहेत आणि पुरुषांना काश्मीर सोडावे लागेल, अशी घोषणा मशिदींमधून करण्यात आली. जर त्यांनी राज्य सोडलं नाही तर त्यांना इस्लाम स्वीकारावा लागेल अन्यथा त्यांना मारले जाईल. ज्यांनी बळजबरीने काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला त्यांना त्यांच्या घरातील महिलांना तेथे सोडण्यास सांगण्यात आले. 1990 मधील कोणत्या घटनांनी काश्मिरी पंडितांना स्थलांतर करण्यास भाग पाडले हे क्रमाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
संशोधन थिंक-टँक सेंटर फॉर इंटिग्रेटेड अँड होलिस्टिक स्टडीज (CIHS) ने 1989 ते 2003 दरम्यान खोऱ्यातील समुदायाविरुद्ध हत्या, बलात्कार आणि हिंसाचाराच्या निवडक दस्तऐवजीकरण प्रकरणांवर 'सेव्हन एक्सोडस अँड द एथनिक क्लीनिंग ऑफ काश्मिरी हिंदू' ही ग्राफिक लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 1990 मध्ये झालेल्या पलायनाची सुरुवात 1989 मध्येच सुरू झाली होती.
14 मार्च 1989 - बडगाम जिल्ह्यातील नवगरी येथील प्रभावती चदूरा यांची जम्मू आणि काश्मीरमधील हरी सिंग हाय स्ट्रीट, श्रीनगर येथे हत्या करण्यात आली.
14 सप्टेंबर 1989 - सुप्रसिद्ध काश्मिरी पंडित समाजसेवक आणि वकील पंडित टिकलाल टपलू यांची जम्मू आणि काश्मीरमधील हब्बा कडल, श्रीनगर येथे त्यांच्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
31 ऑक्टोबर 1989 - दल्हासनयार येथील 47 वर्षीय शीला कौल टिकू यांच्या छातीत आणि डोक्यात गोळी घालण्यात आली.
4 नोव्हेंबर 1989 - न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांची श्रीनगरमधील उच्च न्यायालयाजवळील हरिसिंह स्ट्रीट मार्केटमध्ये जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
1 डिसेंबर 1989 - श्रीनगरच्या महाराजगंज येथील रहिवासी अजय कपूर यांची दहशतवाद्यांनी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या केली.
27 डिसेंबर 1989 - अनंतनाग येथील 57 वर्षीय वकील प्रेमनाथ भट्ट यांची सार्वजनिकरित्या हत्या करण्यात आली.
15 जानेवारी 1990 श्रीनगरमधील खोनमोह येथील सरकारी कर्मचारी एमएल भान यांची हत्या करण्यात आली. त्याच दिवशी, बलदेव राज दत्ता या ऑपरेटरचे श्रीनगरमधील लाल चौकातून अपहरण करण्यात आले आणि चार दिवसांनी 19 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरच्या नई सडक येथे त्याचा छळ केलेला मृतदेह सापडला.
25 जानेवारी 1990 : स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना आणि त्यांचे सहकारी रावळपुरा बसस्थानकावर भारतीय हवाई दलाच्या बसची त्यांना विमानतळावर नेण्यासाठी वाट पाहत होते, तेव्हा एक मारुती जिप्सी आणि आणखी एक चार ते पाच जेकेएलएफ दहशतवाद्यांना घेऊन दुचाकीने घेरले आणि गोळीबार केला. खन्ना आणि अन्य 13 हवाई दलाचे जवान जमिनीवर पडले. खन्ना यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. यासीन मलिकने टीम सेबॅस्टियनला दिलेल्या मुलाखतीत या हत्येची कबुली दिली आहे. तो जेकेएलएफचा एरिया कमांडर होता. जो कमांडर इन चीफ इश्फाक वानी यांच्या हाताखाली काम करत होता.
1 फेब्रुवारी 1990 - केंद्र सरकारचे कर्मचारी कृष्ण गोपाल बैरवा आणि त्रेहगाम, कुपवाडा येथील राज्य सरकारी कर्मचारी रोमेश कुमार थुसू यांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या.
2 फेब्रुवारी 1990 - सतीश कुमार टिक्कू या तरुण काश्मिरी हिंदू (पंडित) यांची फारुख अहमद दार (उर्फ बिट्टा कराटे) यांच्या नेतृत्वाखालील गटाने गोळ्या झाडून हत्या केली.
13 फेब्रुवारी 1990 - दूरदर्शनचे संचालक लस्सा कौल यांच्या एका सहकार्याने त्यांच्या चळवळीची माहिती लीक केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्याच दिवशी मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिस (एमईएस) या नागरी संस्थेत काम करणाऱ्या रावलपोरा येथील रतन लाल यांचाही मृत्यू झाला.
16 फेब्रुवारी 1990 - चौतीस काश्मिरी पंडितांच्या हत्येला जबाबदार असलेल्या फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे याने अनिल भानची हत्या केली.
23 फेब्रुवारी 1990 - अशोक काझी यांचा छळ करून गुडघ्यात गोळी मारण्यात आली.
27 फेब्रुवारी 1990 - नवीन सप्रू यांना श्रीनगर, जम्मू-काश्मीरमधील हब्बा कादल पुलाजवळ गोळ्या घालण्यात आल्या.
1 मार्च 1990 - माहिती विभागाचे पीएन हांडू मारले गेले आणि बडगामच्या तेज किशनला इस्लामिक दहशतवाद्यांनी फाशी दिली.
18 मार्च 1990 - राज्यपालांचे स्वीय सहाय्यक आरएन हांडू यांची नरसिंगगड, श्रीनगर येथील त्यांच्या घराच्या बाहेर हत्या करण्यात आली.
20 मार्च 1990 - अन्न आणि पुरवठा उपसंचालक ए के रैना यांची श्रीनगरमधील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या अधीनस्थांसमोर हत्या करण्यात आली.
10 एप्रिल 1990 - हिंदुस्थान मशीन टूल्स (HMT) चे महाव्यवस्थापक एचएल खेरा यांची दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली.
19 एप्रिल 1990 - सरला भटवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली.
पलायन..
काश्मीरी मुस्लिमांना पंडितांची घरे ओळखण्याची सूचना देण्यात आली होती. जेणेकरून त्यांचे धर्मांतर करता येईल किंवा त्यांना धमकावता येईल. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार आणि 1990 च्या दशकात दहशतवादाच्या वाढीसह खोऱ्यातून त्यांचे जबरदस्तीने पलायन हा देशभरातील दैनंदिन संभाषणाचा भाग आहे. कधी राजकारणी तर कधी अभिनेते हा विषय चर्चेत ठेवतात. पण, पुन्हा एकदा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण होत असल्याची भिती निर्माण होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir