देशी महाराजांचे विदेशी प्रेम; जेव्हा बेल्जियमच्या सुंदरीवर जडला होता जिंदच्या महाराजांचा जीव, वाचा अनोखी Love Story

देशी महाराजांचे विदेशी प्रेम; जेव्हा बेल्जियमच्या सुंदरीवर जडला होता जिंदच्या महाराजांचा जीव, वाचा अनोखी Love Story

Valentine Week 2021 : भारतात असे अनेक सम्राट झाले आहेत, ज्यांचे हृदय परदेशी मुलींवर आले होते. मग त्यांनी कसा त्या प्रेमाचा पाठपुरावा केला आणि ते प्रेम लग्नापर्यंत घेऊन गेले याची कहाणी खूपच रंजक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : स्वातंत्र्यापूर्वी भारतात अनेक संस्थानं होती. ज्यांची सत्ता राजे-महाराजांकडे असे. अतिशय विलासी, राजेशाही जीवन जगणाऱ्या या राजे-महाराजांचे अनेक किस्से, कहाण्या प्रसिद्ध आहेत. अशीच एक प्रेमकहाणी आहे हरयाणातील एका राजाची आणि त्याच्या परदेशी पत्नीची.

ही गोष्ट आहे जिंद संस्थानचे (Jind ) महाराज रणबीरसिंह (Maharaja Ranbirsinh) आणि त्यांची तिसरी पत्नी बेल्जियन सुंदरी (Belgian Girl) ऑलिव्ह मोनोलेस्कू (Olive Monolesku) यांची. ऑस्ट्रेलियन लेखिका कार्लाइट यंगर यांनी ‘विकेड वूमन ऑफ राज’ (Wicked Women Of Raj) या पुस्तकात या प्रेमकहाणीविषयी सविस्तर लिहिलं आहे.

हे ही वाचा-फ्लोरिडात कम्प्युटर यंत्रणा हॅक करून पाणीपुरवठ्यात रसायन मिसळण्याचा प्रयत्न

जिंद हे हरियाणातील (Haryana) सर्वांत जुनं संस्थान होतं. जे पूर्वी तिथं असलेल्या जयंती देवीच्या (Jayanti Devi) पुरातन मंदिरामुळं जयंतपुरा म्हणूनही ओळखलं जात असे. हे मंदिर भगवान विष्णूचा पुत्र जयंत यानं बनवलं असं मानलं जातं. समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडल्यानंतर जयंत ते घेऊन सुरक्षित ठिकाणी गेला. जिंद हे ठिकाण त्याला सर्वांत सुरक्षित वाटलं. अशा या संस्थानाची स्थापना राजा गजपतसिंह (Raja Gajpatsinh)यांनी 1763 मध्ये केली. महाराजा रणबीरसिंह हे या संस्थानाचे सहावे राजे (King) होते. या संस्थानाची राजधानी पूर्वी जिंद होती, नंतर ती संगरुर झाली. 1887 मध्ये वयाच्या आठव्या वर्षी महाराजा रणबीरसिंह या संस्थानाच्या गादीवर बसले.

महाराजा रणबीरसिंह त्यांच्या चित्र-विचित्र सवयींमुळेही प्रसिद्ध होते. ते दररोज सकाळी खूप उशिरा उठत; पण ते जेव्हा झोपेतून उठतील आणि डोळे उघडतील तेव्हा त्यांच्या महाराण्या त्यांचे पाय दाबत बसलेल्या दिसल्या पाहिजेत अशी त्यांची अट होती. ते अतिशय अंधश्रद्धाळू होते. ज्योतिषी करणचंद नेहमी त्यांच्यासोबत असत. बिलीयर्ड्स(Billiards) आणि जुगार खेळण्याचा त्यांना नाद होता. जुगारात ते प्रचंड पैसा हरत;पण तरीही त्यांनी कधीही जुगार खेळणं थांबवलं नाही. एखाद्या परदेशी महिलेला आपली राणी बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. ते ऑलिव्ह मोनोलेस्कूमुळं पूर्ण झालं. तिच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांची दोन लग्नं झालेली होती. डेल्मा आणि गुरचरण कौर अशा त्यांच्या दोन शीख राण्या होत्या. त्यांनी ऑलिव्ह मोनोलेस्कूशी तिसरं लग्न केलं.

मूळच्या बेल्जियमच्या असलेल्या ऑलिव्ह मोनोलेस्कू हिच्या वडिलांनी मुंबईत एक मोठं सलून (Saloon) उघडलं होतं. त्यामुळं ती मुंबईत वास्तव्यास होती. ऑलिव्ह आणि महाराज रणबीरसिंह यांची पहिली भेट मसुरीत एका पार्टीत झाली. बघताक्षणी त्यांना ती आवडली होती. वारंवार ते तिला भेटू लागले. ते नेहमी तिला महागड्या भेटवस्तू देत असत. ऑलिव्हही त्यांच्या प्रेमात पडली. त्यांना तिच्याशी विवाह करायचा होता; पण तिची आई लिज्जी त्यासाठी तयार नव्हती. आईने परवानगी दिली तरच लग्न करेन असं ऑलिव्हनं सांगितलं होतं. अखेर तिच्या आईनं ऑलिव्हशी लग्न करण्यासाठी महाराज रणबीरसिंह यांच्याकडं 50 हजार रुपयांची मागणी केली. महाराज रणबीरसिंह यांनी ते दिलेही. त्याकाळी 50 हजार रुपये ही खूप मोठी रक्कम होती. संगरुर या जिंद संस्थानाच्या राजधानीत एका खासगी सोहळ्यात महाराज रणबीरसिंह आणि ऑलिव्ह यांचं लग्न झालं. ऑलिव्हला यासाठी आपला धर्म बदलावा लागला. तिचं नावही बदलून जसवंत कौर करण्यात आलं.

हे देखील वाचा - याठिकाणी खराब झालेल्या भाजीपाल्यापासून होते वीजनिर्मिती, पंतप्रधानांनीही केलं कौतुक

लॉर्ड कर्झन यांची आडकाठी :

त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन (Lord Curzon) होते. त्यांनी या लग्नावर नाराजी व्यक्त केली, मात्र महाराज रणबीरसिंह यांनी हा आपला खासगी प्रश्न असल्याचं सांगितलं. त्यामुळं नाराज झालेल्या लॉर्ड कर्झन यांनी महाराज रणबीरसिंह हे ऑलिव्हला आपली महाराणी बनवू शकत नाहीत असा फतवा काढला. त्यामुळं महाराज कोणत्याही सरकारी किंवा राजे-महाराजांच्या समारंभात ऑलिव्हला महाराणी म्हणून नेऊ शकत नव्हते.

महाराज आणि ऑलिव्ह यांच्यात बेबनाव :

कालांतरानं महाराज रणबीरसिंह यांचा ऑलिव्हमधील रस कमी झाला. तीही त्यांच्या विचित्र सवयींनी त्रस्त झाली होती. कोणत्याही समारंभात तिला महाराणी म्हणून मिरवता येत नसे , कुठेही मान मिळत नसे याचे तिला वाईट वाटत असे. यावरून तिच्यात आणि महाराज रणबीरसिंह यांच्यात वाद होत असे. शेवटी तिनं 1928 मध्ये महाराज रणबीरसिंह यांना घटस्फोट (Divorce) दिला आणि ती लंडनला निघून गेली. महाराज रणबीरसिंह आणि ऑलिव्ह यांना एक मुलगी होती तिचं नाव होती डोरोथी होतं. ऑलिव्ह 80 च्या दशकापर्यंत लंडनमध्ये जीवित होती.

Published by: news18 desk
First published: February 10, 2021, 12:02 PM IST

ताज्या बातम्या