मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?

Explainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?

काही जणांना पहिला डोसच (First Jab) अजून मिळत नाहीये, तर काही जणांना पहिला डोस घेऊन ठरावीक मुदत उलटून गेली तरी अद्याप दुसरा डोस (Second Jab) मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात काही जणांना कोरोनाचा संसर्गही झाला. मग अशा वेळी लस नेमकी कधी घ्यावी, वाचा सविस्तर

काही जणांना पहिला डोसच (First Jab) अजून मिळत नाहीये, तर काही जणांना पहिला डोस घेऊन ठरावीक मुदत उलटून गेली तरी अद्याप दुसरा डोस (Second Jab) मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात काही जणांना कोरोनाचा संसर्गही झाला. मग अशा वेळी लस नेमकी कधी घ्यावी, वाचा सविस्तर

काही जणांना पहिला डोसच (First Jab) अजून मिळत नाहीये, तर काही जणांना पहिला डोस घेऊन ठरावीक मुदत उलटून गेली तरी अद्याप दुसरा डोस (Second Jab) मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात काही जणांना कोरोनाचा संसर्गही झाला. मग अशा वेळी लस नेमकी कधी घ्यावी, वाचा सविस्तर

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 मे : कोरोनाच्या (Corona) कहराने सर्वोच्च पातळी गाठलेली असताना लसीकरण (Vaccination)हाच त्यापासून वाचण्याचा एकमेव पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. लसीकरण कार्यक्रम एकेका टप्प्यानंतर आता 18 वर्षांवरच्या सर्वांसाठी खुला झाला आहे. मात्र लशीच्या तुटवड्यामुळे सगळीकडे लसीकरण सुरळीतपणे सुरू नाही. काही जणांना पहिला डोसच (First Jab) अजून मिळत नाहीये, तर काही जणांना पहिला डोस घेऊन ठरावीक मुदत उलटून गेली तरी अद्याप दुसरा डोस (Second Jab) मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात काही जणांना कोरोनाचा संसर्गही झाला. मग अशा वेळी लस नेमकी कधी घ्यावी, यासह अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याविषयी अधिक माहिती देणारं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे.

ब्रिटनमधलं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी यांनी विकसित केलेली आणि भारतात सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड (Covishield), तसंच पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेली हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) अशा दोन प्रकारच्या लशी भारतात सध्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत 17.7 कोटी लोकांनी यांपैकी कोणतीतरी एक लस घेतली असून, त्यापैकी 3.9 कोटी जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने घालून दिलेल्या पहिल्या नियमानुसार, कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचं, तर कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असणं गरजेचं आहे. कोविशिल्डच्या डोसमधलं अंतर चार ते आठ आठवड्यांचं, तर कोव्हॅक्सिनच्या डोसमधलं अंतर चार ते सहा आठवडे असावं, असं काही दिवसांनी जाहीर करण्यात आलं. एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या नव्या नियमानुसार, कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये सहा ते आठ आठवड्यांचं अंतर असावं.

- लशीचा एकही डोस घेतलेला नसेल आणि कोरोनाचा संसर्ग झाला, तर पहिला डोस कधी घ्यायचा?

लशीचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्या दिवसापासून 90 दिवसांपर्यंत तरी लशीचा पहिला डोस घेऊ नये. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँडप्रिव्हेंशन (CDC) या संस्थेने ही शिफारस केली आहे.

पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) या संस्थेतल्या इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनिता बाळ यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तर त्यातून तयार झालेल्या अँटीबॉडीज काही महिने टिकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोनातून बरं झाल्यानंतर किमान सहा ते आठ आठवड्यांनंतरच लस घ्यावी.

लसशास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं, 'कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात 80 टक्के प्रतिकारशक्ती तयार होते, असं ब्रिटनमधल्या अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर सहा महिने लस घेतली नाही तरी चालू शकेल.'

जागतिक आरोग्यसंघटनेनेही हेच सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असेल, तर नैसर्गिकरीत्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज सहा महिने तरी शरीरात राहतात. त्यामुळे लसीकरण तोपर्यंत लांबवलं तरी काही हरकत नाही.

- लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला, तर दुसरा डोस कधी घ्यायचा?

लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला, तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून किमान आठ आठवडे तरी लशीचा दुसरा डोस घेऊ नये. कर्नाटकातले तज्ज्ञ डॉ. व्ही. रवी यांनी हा सल्ला दिला आहे. संसर्ग झाल्यानंतर शरीर आपोआप अँटीबॉडीज तयार करायला लागतं. त्यामुळे दुसरा डोस किमान आठ आठवड्यांपर्यंत घेऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.

पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये दिसणारी लक्षणं सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची असतात. लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग नेमक्या कोणत्या कालावधीत झाला, त्यावर आजाराची तीव्रता अवलंबून आहे. पहिला डोस घेतल्यानंतर एक ते तीन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला, तर लसीकरणाचा फारसा उपयोग होणार नाही, मात्र पहिला डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी संसर्ग झाला, तर अशा व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं सौम्य असण्याचं प्रमाण जास्त आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

कोरोनाचा नैसर्गिक संसर्ग झाल्यावर शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती आणि लसीकरण झाल्यावर तयार होणारी प्रतिकारशक्ती यांचा अद्याप अभ्यास केला जात आहे. लसीकरण झाल्यानंतर प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात, असं सीडीसी सांगते. त्यामुळे या काळात संसर्ग होणं शक्य आहे.

- कोरोनाचा संसर्ग झाला नसेल आणि पहिला डोस घेतला, त्यानंतरही संसर्ग झाला नाही, पण दुसरा डोस मात्र अनुपलब्धते मुळे मिळाला नाही, तर काळजीचं कारण आहे का?

महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, की दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी काळजीचं कारण नाही; मात्र तो डोस घेणं टाळू नये किंवा खूप मोठ्या काळासाठी पुढे ढकलू नये. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 45 दिवसांनी, तर कोविशिल्डचा दुसरा डोस तीन महिन्यांनी घेतला तरी चालू शकेल, असं त्यांनी सांगितलं.

या दोन्ही लशी खूप लवकर तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावरचा अभ्यास अद्याप सुरू आहे. 'लॅन्सेट'ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे, की कोविशिल्डच्या दोन डोसेसमध्ये 12 आठवड्यांचं अंतर ठेवलं त्या लशीचा प्रभाव 81.3 टक्के दिसतो. तसंच, या लशीचे दोन डोसेस सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर ठेवून घेतले, तर त्याचा प्रभाव 55.1 टक्केच राहतो.

'दोन डोसेसमध्ये जितकं अंतर जास्त असेल, तितकं चांगलं, असं त्यामागचं तत्त्व आहे; पण तरीही खूप जास्त अंतर ठेवण्याची शिफारस केली जात नाही. कारण अंतर खूपच जास्त असलं, तर त्या काळात व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दुसरा डोस विसरला जाण्याची शक्यता असते,' असं डॉ. रवी यांनी सांगितलं.

डॉ. कांग म्हणतात, की कोव्हॅक्सिनसारख्या इनॅक्टिव्हेटेड लशींच्या एका डोसमधून पुरेसं संरक्षण मिळत नाही. म्हणून दुसरा डोस घेणं आवश्यक असतं. त्यातून 80 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं. थोडे दिवस इकडेतिकडे झाले तरी काही बिघडत नाही; पण दुसरा डोस घेणं टाळू नये. तसंच, पुन्हा पहिला डोस घेण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

DGCI ने अलीकडेच भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनच्या (Covaxin) तिसऱ्या डोसच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्याची परवानगी दिली आहे.

- कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला असेल आणि दुसऱ्या डोसवेळी तो उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी कोविशिल्ड लशीचा डोस घेतला तर चालतं का?

डॉ. बाळ सांगतात, 'सर्व लशी स्वतंत्रपणे विकसित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या लशींचे डोस चालू शकतात का, याबद्दल ठोस सांगण्यासारखा अभ्यास झालेला नाही. तसंच, जेव्हा लशी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील तेव्हा याबद्दलची समस्या वाढत जाऊ शकेल. लशींची अनुपलब्धता ही शास्त्रीय समस्या नाही, तर प्रशासकीय समस्या आहे.'

ज्या लशीचा पहिला डोस घेतला, त्याच लशीचा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ. अमेरिकेतील सीडीसीनेही तशीच शिफारस केली आहे. एक वेळ तीच लस उपलब्ध नसेल, तर जास्त वेळ थांबायलाही हरकत नाही, पण दुसरा डोस त्याच लशीचा घ्यावा, असं त्या संस्थेने म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus