Explained: दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ठरेल अधिक घातक, वाचा महत्त्वाच्या 10 प्रश्नांची उत्तरं

Explained: दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ठरेल अधिक घातक, वाचा महत्त्वाच्या 10 प्रश्नांची उत्तरं

एकदा कोरोना संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती आहे, याचा वेध घेण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (ICMR) जगभरातल्या आणखीही काही संस्थांनी संशोधन केलं आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: एकदा कोविड-19 मधून (Covid-19) बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा (Corona) संसर्ग होण्याची भीती नाही, असं तुम्हाला वाटतंय का? तसं असेल तर सावध राहा! केम्ब्रिज विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की कोविड-19 झालेल्या 1300 पैकी 58 व्यक्तींना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला. एकदा कोरोना संसर्ग झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती आहे, याचा वेध घेण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (ICMR) जगभरातल्या आणखीही काही संस्थांनी संशोधन केलं आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका अजिबात नव्हता. दुसऱ्या लाटेत मात्र हा धोका असल्याचं टाळता येत नाही.

या संदर्भातल्या शंकांची उत्तरं जाणून घेऊ या.

प्रश्न- पुन्हा संसर्गाचा धोका कोणाला असतो?

उत्तर- ज्यांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असते आणि ज्यांचं शरीर कोरोनाविरोधात तगडी प्रतिकारशक्ती विकसित करू शकत नाही, अशा व्यक्तींना पुन्हा संसर्गाचा धोका असतो.

प्रश्न- दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका असलेल्या गटासंदर्भात कोणतं संशोधन झालं?

उत्तर- इंटर्नल मेडिसीन विशेषज्ञ डॉ. स्वप्नील पारीख (Dr Swapnil Parikh) यांनी कोरोना विषाणूसंदर्भातल्या फॅक्ट्सवर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कोणाला आहे, याबद्दल त्यात भाष्य करण्यात आलं आहे. लॅन्सेट (Lancet) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात लिहिलं आहे, की 65 वर्षांवरच्या व्यक्तींना हा धोका जास्त असू शकतो.

हे वाचा-कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरतोय म्युकरमायकोसीस; साताऱ्यात मृत्यूदर सातपट

प्रश्न- दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची शक्यता किती?

उत्तर- वयस्कर व्यक्ती, तसंच थॅलेसेमियासारख्या विकारांशी लढत असलेल्या व्यक्तींना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो. दुसऱ्यांदा संसर्ग होणं खूप दुर्मीळ असल्याचं या जागतिक महामारीच्या सुरुवातीच्या काळात मानलं गेलं होतं; मात्र सातत्याने होत असलेल्या संशोधनातून हे दिसून आलं आहे, की कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत आहे.

प्रश्न- दुसऱ्यांदा संसर्ग होतो कसा?

उत्तर- एकदा कोरोना संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरात त्यासाठी अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होतात. त्यामुळे विषाणूचा पुन्हा हल्ला झाल्यास त्या विषाणूला निष्प्रभ केलं जातं. काही जणांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने सक्षम अँटीबॉडीज विकसित होत नाहीत. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो. दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होऊ शकतो, याची पुष्टी ऑगस्ट 2020मध्ये झाली होती.

प्रश्न- दुसऱ्यांदा संसर्ग होणं ही किती गंभीर गोष्ट आहे?

उत्तर- भारतात सध्या एका बाजूला लसीकरण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला नव्या रुग्णांचं आणि नव्या व्हॅरिएंट्सचं प्रमाणही वाढत आहे. बरे झालेल्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. पुन्हा होणारा संसर्ग गंभीर असू शकतो. या संदर्भात जगात झालेल्या पहिल्या अभ्यासात सहभागी असलेले डॉ. स्वप्नील पारीख म्हणतात, की दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये आजाराचं स्वरूप गंभीर नव्हतं; मात्र पहिल्या संसर्गाच्या वेळी लक्षणं नसलेल्या गटातल्या थोड्या लोकांना पुन्हा संसर्ग झाला तेव्हा त्यांना गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसली.

हे वाचा-कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये 'ही' लस; मृत्यूदरातही घट

प्रश्न- या धोक्याबद्दल विज्ञान काय सांगतं?

उत्तर- ICMRच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की पहिल्या संसर्गापेक्षा दुसऱ्यांदा संसर्ग (Reinfection) झाल्यास अधिक बिकट परिस्थिती उद्भवते. पहिल्यांदा संसर्ग झालेला असताना लक्षणं दिसली नसली, तर शरीर अँटीबॉडी पूर्ण तऱ्हेने लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे कोरोनाचा दुसऱ्यांदा हल्ला झाला, तर शरीर जोरदार प्रतिकार करू शकत नाही.

प्रश्न- लसीमुळे किती मदत होते?

उत्तर- संसर्ग रोखण्यासाठी, तसंच संसर्गाची तीव्रता कमी होण्यासाठी लशीचा (Vaccination) उपयोग होतो. लस किती काळापर्यंत संरक्षण देऊ शकते, याचा डेटा अद्याप नाही; मात्र फायझर-बायोएनटेक या लस कंपन्यांच्या दावा आहे, की त्यांच्या कंपनीची लस घेतल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत कोरोना संसर्ग होणार नाही. अर्थात लस घेतल्यानंतरही शरीर किती काळ संसर्गापासून बचावू शकतं, हे प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवरच अवलंबून असतं. लस घेतलेल्या व्यक्तीला दोनदा संसर्ग झालाच, तरी तो गंभीर स्वरूपाचा असणार नाही, असं डॉ. पारीख म्हणतात.

प्रश्न- नव्या व्हॅरिएंट्समुळे संसर्गाचा धोका वेगळा आहे का?

उत्तर- यूके व्हॅरिएंट (B 1.1.7) आणि साउथ आफ्रिकन व्हॅरिएंट (B.1.351) हे दोन प्रकार वेगाने फैलावणारे आहेत. व्हॅरिएंटमध्ये अँटीजेनिक बदल झाला, तर दुसऱ्यांदा संसर्ग होऊ शकतो, असं डॉ. पारीख म्हणतात.

प्रश्न- दुसऱ्यांदा संसर्ग होणं कसं टाळता येईल?

उत्तर- तरुण असाल, वृद्ध असाल, लस घेतलेली असेल किंवा नसेल, पण मास्क (Mask), स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) या गोष्टी पाळण्याला पर्याय नाही. त्यामुळेच दुसऱ्यांदा संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 15, 2021, 3:41 PM IST

ताज्या बातम्या