Explainer : धूम्रपान न करणाऱ्यांना होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचं कारण काय?

Explainer : धूम्रपान न करणाऱ्यांना होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचं कारण काय?

पॅसिव्ह स्मोकिंगमुळे प्रत्यक्ष धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना फुप्फुसांच्या कॅन्सरचा धोका नेमका किती आहे, हे शोधण्यासाठी अधिक व्यापक प्रमाणावर आणि अधिक सखोल संशोधन करण्याची गरज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : जगभरात कर्करोगानं (Cancer) होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer) हे महत्त्वाचं कारण असून, कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 19 टक्के आहे. या कर्करोगाचं मुख्य कारण आहे धूम्रपान (Smoking). सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना (Smokers) फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची किंवा त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत 15 ते 30 पट जास्त असते. दिवसातून काहीच सिगारेट्स (Cigarettes) ओढल्या किंवा अधूनमधून ओढल्या तरीही हा कर्करोग होऊ शकतो; मात्र दीर्घ काळ आणि मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला अधिक धोका असतो.

फुप्फुसाच्या कर्करोगाची ही कारणमीमांसा शास्त्रज्ञांनी संशोधनातून उलगडली आहे; मात्र आयुष्यात एकदाही विडी किंवा सिगारेट न ओढलेल्या (Non Smokers) अनेक व्यक्तींनाही फुप्फुसांचा कर्करोग होतो, ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण नेमकं काय असावं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ निरंतरपणे करत आहेत. अमेरिकेतल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ'अंतर्गत (National Institutes of Health) कार्यरत असलेल्या 'यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'मधल्या (US National Cancer Institute) शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका टीमने या संदर्भात केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष 'नेचर जेनेटिक्स' या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहेत. 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या संशोधनात शास्त्रज्ञांनी धूम्रपान करणाऱ्या, परंतु तरीही फुप्फुसांचा कर्करोग झालेल्या व्यक्तींच्या शरीरातल्या ट्यूमर्सचं (Tumours) जनुकीय विश्लेषण अर्थात जीनॉमिक अॅनालिसिस (Genomic Analysis) केलं. धूम्रपान न केलेल्या (Non Smokers) व्यक्तींना होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाच्या तीन रेण्वीय उपप्रकारांचं (Molecular Subtypes) वर्णन शास्त्रज्ञांनी यात केलं आहे. ट्यूमरच्या ऊतीमध्ये (Tumour Tissue) होणाऱ्या जनुकीय बदलांचे (Mutation) गुणधर्म नेमकेपणाने ओळखण्यासाठी शास्त्रज्ञांनी व्होल जीनोम सिक्वेन्सिंगचा (Whole Genome Sequencing) वापर केला. कधीही धूम्रपान न केलेल्या, तरीही नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (Non-small cell mung cancer) झाला आहे आणि ज्यांच्यावर अद्याप उपचार सुरू झालेले नाहीत, अशा व्यक्तींच्या सर्वसाधारण ऊतींसोबत त्या ट्यूमरच्या जीनोम सिक्वेन्सिंगची पडताळणी करण्यात आली.

Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध

त्यात शास्त्रज्ञांना असं आढळलं, की या व्यक्तींच्या शरीरात घडणाऱ्या काही नैसर्गिक प्रक्रियांमुळे (Endogenous) काही म्युटेशन्स अर्थात जनुकीय बदल घडून येतात. त्यामुळे या ट्यूमर्सची निर्मिती होते आणि फुप्फुसांचा कॅन्सर होतो.

धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना फुप्फुसांचा कर्करोग कसा होतो, हे गूढ उकलण्यास या संशोधनामुळे हातभार लागणार आहे. तसंच, अशा रुग्णांवर अधिक काटेकोर क्लिनिकल ट्रीटमेंट्स (Precise Clinical Treatments) विकसित करण्यासही मदत होणार आहे, असं 'नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ'ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भविष्यात या सब-टाइप्सनुसार उपचार पद्धती विकसित करता येणं शक्य होणार आहे.

जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुप्फुसांचा कॅन्सर हे सर्वांत मुख्य कारण आहे. दर वर्षी जगभरात किमान 20 लाख व्यक्तींना फुप्फुसांच्या कॅन्सरचं निदान होतं. या रुग्णांमध्ये बहुतांश जण धूम्रपान करणारे असतात; मात्र फुप्फुसांचा कॅन्सर झालेले 10 ते 20 टक्के रुग्ण असे असतात, की ज्यांनी आयुष्यात कधीच धूम्रपान केलेलं नसतं. नॉन-स्मोकर्सना फुप्फुसांचा कर्करोग होण्याचं प्रमाण महिलांमध्ये अधिक आढळतं. तसंच, धूम्रपान केल्यामुळे ज्यांना फुप्फुसांचा कॅन्सर होतो, त्यांच्यापेक्षा कमी वयात नॉन-स्मोकर्सना फुप्फुसांचा कॅन्सर होतो, असंही निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.

पंजशीरमध्ये तालिबान्यांना मोठा दणका, पण नेमका कुणी केला हा हवाई हल्ला?

नॉन-स्मोकर्सना फुप्फुसांचा कॅन्सर होण्यासाठी पॅसिव्ह स्मोकिंग, वायू प्रदूषण, अॅस्बेस्टॉस (Asbestos) किंवा फुप्फुसांचा अन्य कोणता तरी आजार होऊन गेलेला असणं आदी गोष्टी कारणीभूत असाव्यात, असं आतापर्यंत आपल्याला माहिती आहे. तरीही नॉन-स्मोकर्सना होणाऱ्या फुप्फुसांच्या कर्करोगाचं महत्त्वाचं कारण अद्याप शास्त्रज्ञांना उमगलेलं नाही म्हणूनच शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं होतं.

कधीही धूम्रपान न केलेल्या, तरीही नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर झाला आहे आणि ज्यांच्यावर अद्याप उपचार सुरू झालेले नाहीत, अशा 232 जणांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. यातल्या बहुतांश व्यक्ती युरोपीय वंशाच्या (European Descent) होत्या. 189 ट्यूमर्स अॅडेनोकार्सिनोमस (Adenocarcinomas) प्रकारचे होते. हा फुप्फुसांच्या कॅन्सरचा सर्वांत कॉमन प्रकार आहे. 36 ट्यूमर्स कार्सिनॉइड्स (Carcinoids) प्रकारचे, तर 7 ट्यूमर्स अन्य प्रकारचे होते.

सेकंडहँड टोबॅको स्मोकिंग (SecondHand Tobacco Smoking) म्हणजेच घरातली किंवा सहवासातली दुसरी व्यक्ती धूम्रपान करत असेल, तर बाकीच्या व्यक्तींच्याही शरीरात तो धूर जातो. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष धूम्रपान केलं नाही, तरी त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. अशा धूम्रपानाला पॅसिव्ह स्मोकिंग (Passive Smoking) किंवा सेकंडहँड टोबॅको स्मोकिंग असं म्हणतात. अशा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे प्रत्यक्ष धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना फुप्फुसांच्या कॅन्सरचा धोका नेमका किती आहे, हे शोधण्यासाठी अधिक व्यापक प्रमाणावर आणि अधिक सखोल संशोधन करण्याची गरज हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

First published: September 7, 2021, 5:07 PM IST
Tags: cancer

ताज्या बातम्या