Explainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय

Explainer : शेळी रोखू शकते जंगलातले वणवे; मेंढपाळ महिलेनं शोधला रामबाण उपाय

'अनेक जण माझ्याशी जमिनीवर उगवलेलं गवत कापण्यासाठी आणि माती नीटनेटकी करण्यासाठी संपर्क साधतात'

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर :  जंगलात लागणारे वणवे (Wildfire) ही पर्यावरणीयदृष्ट्या एक गंभीर समस्या आहे. वणव्यामुळे वन्य जीव, अनेक प्रकारच्या वनस्पती आणि मातीचं मोठं नुकसान होतं. यामुळे अनेकदा आपत्कालीन स्थितीही निर्माण होते. काही घटनांमध्ये माणसांनाही आपला जीव गमवावा लागतो. आज जगातल्या काही देशांमध्ये वणवा ही एक मोठी समस्या ठरली आहे. जंगलामध्ये वणवा लागू नये, तसंच वणवा लागल्यास तो पसरू नये यासाठी काही मूलभूत उपाययोजना केल्या जातात. परंतु, त्यातून फारसं काही साध्य होताना दिसत नाही. परिणामी नुकसान होऊन सर्वच घटकांना याचा फटका बसतो; मात्र या समस्येवर आता एक आश्वासक उत्तर मिळताना दिसत आहे. एक शेळी (Goat) जंगलातल्या वणव्यावर प्रभावी उपाय ठरू शकते, असा दावा पश्चिमी अमेरिकेतल्या मेंढपाळ महिलेनं केला आहे.

अमेरिकेतलं कॅलिफोर्निया (California) हे राज्य सध्या वणव्याच्या वाढत्या घटनांमुळे चिंताग्रस्त आहे. कॅलिफोर्निया नॅशनल पार्कमध्ये (National Park) लागलेली आग झपाट्याने संपूर्ण पार्क लपेटून घेण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या भागात वणवा लागणं हे काही नवं नाही. अशा घटना येथे कायम घडतात. संशोधकांनी आता असं एक नवं तंत्र शोधलं आहे की, त्याविषयी ऐकल्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. पश्चिम अमेरिकेतल्या एका मेंढपाळ महिलेनं हे तंत्र शोधलं असून, भविष्यकाळात वणवा रोखण्यात ते प्रभावी ठरेल असा दावा करण्यात येत आहे.याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

64 वर्षांच्या लॅनी मॅल्मबर्ग या पश्चिम अमेरिकेतल्या (West America) जंगलांमध्ये भ्रमंती करत असतात. वास्तविक लॅनी या मेंढपाळ आहेत. एक शेळी जंगलातला भयानक वणवा आटोक्यात आणण्यात कशी सहायक ठरू शकते, याविषयी त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी याविषयीचं तंत्र ग्रॅज्युएट स्कूलमध्ये विकसित केलं होतं. ज्यांनी हे तंत्र विकसित केलं आहे, त्यांच्यापैकीच लॅनी या एक आहेत. लॅनी मॅल्मबर्ग यांनी कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीतून तण विज्ञान (Weed Science) या विषयात पदवी मिळवली आहे. मागच्या वर्षी ब्युरो ऑफ लँड मॅनेजमेंटनं मॅल्मबर्ग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडच्या शेळ्यांचा वापर वणवा रोखण्यासाठी करण्यात आला.

2020 मध्ये लॅनी मॅल्मबर्ग यांनी गोटापेली फाउंडेशनची स्थापना केली. यातील स्वयंसेवक वणवे रोखण्यासाठी शेळीचा वापर करण्यासंबंधीचं प्रशिक्षण देतात. यातून रोजगार निर्मिती शक्य असून, हा व्यवसाय माउथ पब्लिसिटीतून (Mouth Publicity) विस्तारणारा आहे. तसंच यात स्थानिक सरकार आणि जमीन मालकांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. आतापर्यंत 200 हून अधिक जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. या स्टार्टअपची (Start Up)एकूण किंमत 3,60,000 डॉलर आहे.

लॅनी म्हणतात, 'अनेक जण माझ्याशी जमिनीवर उगवलेलं गवत कापण्यासाठी आणि माती नीटनेटकी करण्यासाठी संपर्क साधतात. हे काम मी भाडेतत्त्वावर करते. यासाठी मला माझा मुलगा डॉनी बेंज आणि त्याची पत्नी कॅती सिंग्ले हे मदत करतात. आमची टीम दिवसभर हेच काम करते आणि रात्री केवळ जेवणापुरती घर परतते.'

असं आहे तंत्र

मॅल्मबर्ग यांच्या शेळ्या दिवसभर चारा खाल्ल्यानंतर जमिनीतच मलविसर्जन करतात. त्यांची विष्ठा खूपच उपयुक्त असते. यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. शेळीसारखा प्राणी गवत, तसेच उंच झाडांवरची पानंही खातो. गाय किंवा जनावरं उंच झाडांवरची पानं खाऊ शकत नाहीत. अशी वाळलेली पानं आणि फांद्यांमुळे जंगलात आग पसरण्याचा धोका असतो. शेळीने ती पानं खाऊन टाकल्यामुळे आग पसरण्याचा धोका कमी होतो.

जेव्हा जंगलांमध्ये वणवा पसरतो, तेव्हा हेलिकॉप्टर्स येतात आणि आगीवर पाणी ओतून ती विझवतात. परंतु, मातीविषयी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. मातीतले रासायनिक घटक 1 टक्क्याने वाढवले तर ती प्रतिएकर 16,500 गॅलन अतिरिक्त पाणी रोखून धरू शकते, असं लॅनी मॅल्मबर्ग यांनी सांगितलं. लॅनी मॅल्मबर्ग आणि त्यांच्या टीमने शोधलेलं हे तंत्र आगामी काळात वणवा रोखण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकतं.

First published: September 21, 2021, 11:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या