पंजशीरमध्ये तालिबान्यांना मोठा दणका, पण नेमका कुणी केला हा हवाई हल्ला?

पंजशीरमध्ये तालिबान्यांना मोठा दणका, पण नेमका कुणी केला हा हवाई हल्ला?

आता पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानींनी केला आहे. मात्र, सोमवारी रात्री उशिरा पंजशीरमधील तालिबानींच्या ठिकाणांवर हवाई हल्ले (Air Strike) करण्यात आले आहेत. हे हवाई हल्ले नेमके कोणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • Share this:

काबूल, 07 सप्टेंबर: अमेरिकेनं (America) अफगाणिस्तानमधून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अराजक स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानींनी (Taliban) अफगाणिस्तानमधील जवळपास सर्वच प्रांतांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तालिबानींच्या या कृत्यामुळं अफगाण नागरिक अजूनही भयभीत आहेत. अफगाणिस्तानवर आधिपत्य मिळवत असताना पंजशीर (Panjshir) हा प्रांत मात्र तालिबानींना सहजासहजी हस्तगत करता येणार नाही, असे मत सर्वच स्तरातून व्यक्त होत होत. कारण पंजशीर हा असा प्रांत आहे की तेथील भौगोलिक स्थिती आणि विरोधकांची वज्रमूठ यामुळे या प्रांतावर तालिबानी सहज वर्चस्व प्रस्थापित करणं अवघड वाटत होतं. परंतु, आता पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानींनी केला आहे. मात्र, सोमवारी रात्री उशिरा पंजशीरमधील तालिबानींच्या ठिकाणांवर हवाई हल्ले (Air Strike) करण्यात आले आहेत. हे हवाई हल्ले नेमके कोणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मीडिया अहवालानुसार, पंजशीरवर हवाई हल्ले करत तालिबानींच्या ठिकाणांचं मोठं नुकसान करण्यात आलं आहे. मात्र हे हवाई हल्ले कोणी केले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तसेच या हल्ल्यात तालिबानींचं किती नुकसान झालं आहे, हे हल्ले नेमके कुठून करण्यात आले हे स्पष्ट झालेलं नाही. अफगाणिस्तानमधील स्थानिक मीडिया आणि पत्रकारांनी जी माहिती दिली आहे, त्यातून हल्ला झाला एवढंच स्पष्ट झालं आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा-पाकिस्तान असो वा इतर कुणी, अफगाणिस्तानमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको -तालिबान

पंजशीरमधील तालिबानींच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तानमधील स्थानिक मीडिया आणि पत्रकारांनी रात्री उशिरा दिली. अज्ञात लढाऊ विमानांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. अज्ञात विमानांनी तालिबानींच्या ठिकाणांवर हल्ला केला आणि ते रेजिमेंट फोर्सेसच्या भागात निघून गेले. हे हल्ले रशिया (Russia) किंवा ताजिकिस्तानने (Tajikistan) केले आहेत का, असं प्रश्नार्थक ट्वीट मुहम्मद अल्सुल्मानी यांनी केलं.

जर ताजिकिस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले असतील तर ते देश रशिया आणि इराण (Iran) हे आहेत. पाकिस्तानने नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांवर अलीकडेच जो हल्ला केला होता, त्याचा इराणने निषेध केला होता. तसेच दुसऱ्या देशाच्या व्यवहारात अशा प्रकारे हस्तक्षेप नको असं नमूद करत यास विरोध दर्शवला होता. या हल्ल्याचा बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून इराणने हा हल्ला केला असावा, असा कयास लावला जात आहे.

तथापि, तालिबाननं सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित देशांच्या यादीत इराणचं नाव समाविष्ट केलं असल्यानं असा दावा कमकुवत ठरतो. तीच स्थिती रशियाबाबत आहे. मागील काळातील घटना बघता तालिबानी आणि रशियाचे संबंध फारसे चांगले नाहीत. असं असतानाही तालिबानने रशियाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तान अगदी सहजपणे तालिबानींच्या हाती सोपवल्यानं रशियानं अमेरिकेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे तालिबानला धक्का देण्यासाठी रशियानं नॉदर्न अलायन्सला साथ दिली तर त्यात फारसं आश्चर्यकारक काही नसेल.

हे वाचा-तालिबान राज Begins : मुलींना बुरखा हवा, मुलामुलींमध्ये पडदा हवा; वाचा सविस्तर

पंजशीर आता आमच्या ताब्यात असून, अफगाणिस्तानमधील युध्द संपुष्टात आल्याचा दावा तालिबाननं केला आहे. परंतु, पंजशीरवर ताबा कायम ठेवण्यासाठी लढा देत असलेले नॉदर्न अलायन्सचे प्रमुख अहमूद मसूद यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देणार आहोत. असं असताना मग तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला कोणी केला, हा प्रश्न कायम राहतो.

अफगाणिस्तानमधील स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजनुसार, या प्रकरणी ताजिकिस्तानचं नाव सर्वप्रथम येतं. कारण मी सध्या ताजिकिस्तानमध्ये असल्याचा दावा अहमूद मसूदनं केला आहे. तसेच जेव्हा तालिबानींनी अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा अफगाणी सैनिक आणि लढाऊ विमानं अफगाणिस्तानमधून निघून ताजिकिस्तानमध्ये पोहचण्यात यशस्वी झाले होते. तसेच ताजिकिस्तान सातत्यानं तालिबानविरोधी नॉदर्न अलायन्सला (Northern Alliance) साथ देताना दिसत आहे. त्यामुळे तालिबानच्या ठिकाणांवर हल्ला कोणी केला, या प्रश्नात संशयाची सुई सर्वप्रथम ताजिकिस्तान कडे जाताना दिसते.

एकीकडं पंजशीरबाबत दररोज नवी माहिती समोर येत असताना, दुसरीकडं मात्र तालिबान सरकार स्थापनेत व्यस्त असल्याचं चित्र आहे. त्यातच झालेला हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

First published: September 7, 2021, 2:52 PM IST

ताज्या बातम्या