मुंबई, 24 ऑगस्ट: शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांना अनेकदा आयपीओमध्ये अर्थात Initial Public Offer (IPO) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच बातम्यामधूनही आयपीओबाबत सतत कानावर काहीतरी पडत असते. सध्याच्या काळात तर भारतीय शेअर बाजारात आयपीओचा पाऊस पडत आहे. गेल्या सात महिन्यांत 40 आयपीओ आले असून, आणखी अनेक आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. वर्ष 2020 मध्ये 33 आणि 2019 मध्ये 49 आयपीओ आले होते. त्या तुलनेत यंदाच्या आयपीओंची संख्या खूपच अधिक आहे. या वर्षी देशात आयपीओची संख्या विक्रमी असेल, असा अंदाज आहे. आतापर्यंतच्या आयपीओंनी शेअर बाजारात चांगली कामगिरी केल्यानं अनेक गुंतवणूकदारांना यातून चांगला लाभ झाला आहे, त्यामुळे आयपीओ गुंतवणुकीबाबत जोरदार चर्चा होत आहे, मात्र आजही अनेकांना याबाबत सखोल माहिती नसते. आपण गुंतवणूक करत असलेल्या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे.
हे वाचा-...अन् केंद्र सरकारची होणार तब्बल 6 लाख कोटी रुपयांची कमाई
आयपीओ म्हणजे नेमके काय?
आयपीओ म्हणजे एखाद्या कंपनीनं पहिल्यांदा जनतेला आपल्या शेअर्सची म्हणजेच समभागांची विक्री करणे. आयपीओपूर्वी, कंपनीचे शेअर्स ठराविक भागधारकांकडेच (Stake Holders) असतात. आयपीओनंतर, सर्वसामान्य लोक आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. त्यामुळे शेअर्सची संख्या अनेक पटीने वाढते आणि या प्रारंभिक ऑफरसह, कंपनी स्टॉक एक्सचेंज अर्थात शेअर बाजारात सूचीबद्ध होते. त्यामुळे तिच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री सोपी होते. नवीन व्यवसायात जोखीम घेणाऱ्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आणि कंपनीच्या मालकांना ऑफर फॉर सेलद्वारे (Offer for Sale) बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीची त्यांना भरपाई मिळते.
आयपीओसाठी अर्ज कसा करावा?
किरकोळ गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही तुमच्या बँकेद्वारे किंवा ब्रोकरद्वारे (Broker) आयपीओसाठी अर्ज करू शकता. यासाठीचे पैसे जमा करण्याकरता बँकांकडे अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट म्हणजेच ‘एएसबीए’ (ASBA) ही सुविधा आहे. काही ब्रोकर युपीआयद्वारे पैसे भरण्याची सुविधाही देतात. तुम्हाला शेअरचे वाटप होईपर्यंत अर्जाचे पैसे ठेवले जातात. तुमचा अर्ज नाकारला गेल्यास सर्व पैसे परत केले जातात. शेअर्स एकतर अंडर सबस्क्राइब किंवा ओव्हर सबस्क्राइब होऊ शकतात. जेव्हा उपलब्ध शेअर्सपेक्षा जास्त शेअर्सची मागणी होते म्हणजे ते ओव्हर सबस्क्राइब होतात तेव्हा शेअर्सच्या वाटपाची हमी दिली जात नाही आणि वाटप न झाल्यास, अर्जाचे पैसे परत केले जातात.
आयपीओ गुंतवणुकीतील धोके काय आहेत?
कोविड-19 साथीमुळे व्यवसायावर आणि शेअर बाजारावरही परिणाम झाल्यानं अनेक कंपन्यांनी 2020च्या शेवटी आयपीओ आणण्याला प्राधान्य दिलं. आयपीओनां मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि शेअर बाजाराची असामान्य कामगिरी यामुळे अनेक कंपन्या आयपीओ आणत आहेत. बाजारात आलेल्या आयपीओच्या लिस्टिंगला मिळालेला फायदा दाखवून सोशल मीडियावर आयपीओ गुंतवणूक फायद्याची असल्याचा गवगवा केला जात आहे. यामुळे माहिती न घेताच गुंतवणूकदार कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त होत आहेत, मात्र हे धोकादायक ठरू शकते.
हे वाचा-Gold Silver Price: स्वस्त झालं सोनं-चांदी, किंमतीत मोठी घरसण; इथे तपासा आजचा भाव
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेअर बाजारातील लिस्टिंगच्या दिवशी शेअर्सची विक्री करून जलदगतीने भरपूर नफा मिळण्याची आशा गुंतवणूकदारांना असते. कारण शेअर्स इश्यू किंमतीपेक्षा (Issue Price) खूप जास्त किंमतीवर लिस्ट (List) होतील,असा त्यांचा समज असतो. त्यामुळे सुमारे 60 टक्के गुंतवणूकदार लिस्टिंगच्या दिवशी मिळणारा फायदा घेण्याच्या दृष्टीने आयपीओमध्ये गुंतवणूक करतात, केवळ 40 टक्के लोक आयपीओमधील शेअर्स राखून ठेवतात. गेल्या दशकातील सुमारे 70 टक्के आयपीओनी लिस्टिंगवेळी फायदा दिला नाही किंवा नंतरही त्यात वाढ झाली नाही. हे लक्षात घेऊन गुंतवणूकदरांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असा सल्ला विश्लेषकांनी (Analyst) दिला आहे. गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे.
आयपीओचे विश्लेषण कसं करावं?
कंपनीच्या इतिहासावरून कंपनीचे विश्लेषण करणे आव्हानात्मक असते. एखादी खासगी कंपनी शेअर बाजारात येते तेव्हा ही बाब आणखीनच कठीण असते. अशावेळी कंपन्यांविषयीच्या माहितीचा एकमेव स्त्रोत असतो तो म्हणजे त्यांचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी-RHP). यामध्ये कंपनीच्या प्रवर्तकांच्या नावांपासून, त्यांना किती रक्कम उभी करायची आहे, नवीन इश्यूबाबत सर्व तपशील आणि विक्रीसाठीच्या ऑफरची सर्व माहिती असते. कंपनी आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर कर्जफेडीसाठी की विस्तारासाठी करणार आहे, ते यातून स्पष्ट होते. का हा फक्त प्रवर्तकांची त्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आहे, आहे. हे समजते. त्यानंतर, कंपनीचा व्यवसाय, पार्श्वभूमी, बाजारपेठेतील हिस्सा, संभाव्य वाढ, नियामक जोखीम आणि गेल्या तीन वर्षांपासून उपलब्ध असलेल्या आर्थिक बाबींची माहिती मिळते. त्याचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे असते. याव्यतिरिक्त, कंपनीवरील खटले, भांडवली रचना आणि मूल्यमापन याचीही माहिती घेऊ शकता.
हे वाचा-करदात्यांना दिलासा! वाढू शकते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तारीख
या सगळ्यानंतर, तुमच्या गुंतवणूकीची उद्दिष्टे आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन त्यात त्या कंपनीचे प्रोफाइल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बसते का हे बघितले पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी अशाप्रकारे सखोल संशोधन करणे महत्त्वाचे आहे. तरच आयपीओमधील तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments