युरोपचे दरवाजे भारतीयांसाठी बंदच, Covishield लाही मान्यता नाही; काय आहे प्रकरण?

युरोपचे दरवाजे भारतीयांसाठी बंदच, Covishield लाही मान्यता नाही; काय आहे प्रकरण?

भारतात तयार होणाऱ्या Covishield जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्यता दिली असली, तरी अद्याप युरोपियन युनियननं ती दिलेली नाही. त्यामुळे भारतीयांसाठी युरोपचे दरवाजे सध्या तरी बंदच आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) ओसरत असताना अनेक भारतीय युरोपला (Europe) जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र युरोपचे दरवाजे सध्या तरी भारतीयांसाठी बंदच आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोव्हिशिल्ड (Covishield) लशीला मान्यता दिली असली, तरी अद्याप युरोपियन युनियननं (EU) मान्यता दिलेल्या लशींच्या यादीत मात्र कोव्हिशिल्डचा अद्याप समावेश झालेला नाही.

भारतीय ‘ग्रीन पास’पासून वंचित राहणार

युरोपियन युनियननं ‘ग्रीन पास’ (Green Pass) या नावानं नवी योजना सुरू केली आहे. युरोपियन युनियननं मान्यता दिलेल्या लसी घेतलेल्या नागरिकांना हा पास जारी करण्यात येणार आहे. हा पास ज्यांच्याकडे असेल ते नागरिक युरोपातील वेगवेगळ्या देशांमध्ये विना अडथळा फिरू शकणार आहेत. मुख्यतः युरोपियन नागरिकांसाठी ही योजना असून 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. युरोपातील 27 देशांमध्ये फिरणाऱ्यासाठीचा हा एकत्रित पास असणार आहे.

युरोपात चारच लसींना मान्यता

युरोपात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही हाच पास दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी युरोपियन युनियननं मान्यता दिलेल्या लसी टोचून घेणं बंधनकारक आहे. युरोपात सध्या फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉर्डना, वॅक्सजेरविया या चारच लसींना मान्यता आहे. यातील वॅक्सजेरविया आणि भारतात तयार होणारी कोव्हिशिल्ड या दोन्ही लसी एस्ट्राझेनका-ऑक्सफर्डच्याच आहेत. मात्र भारतात तयार झालेल्या कोव्हिशिल्डला मात्र युरोपनं मान्यता दिलेली नाही.

हे वाचा - मुंबईकरांनो; आजपासून असे असतील नियम, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा

नावात काय आहे?

वॅक्सजेरविया आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लशी एकाच कंपनीने तयार केलेल्या असल्यामुळे त्यांचा फॉर्म्युलादेखील सारखाच आहे. केवळ वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावं असल्याच्या कारणावरून एकाला मान्यता देणं आणि दुसऱ्याला ती न मिळणं, ही बाब अतार्किक आणि एक प्रकारे हास्यास्पद असल्याच्या प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वॅक्सजेरवियाच्या सर्व चाचण्या पार पडून त्याला मान्यता मिळाली असेल, तर कोव्हिशिल्डला पुन्हा या प्रक्रियेतून जाण्याची गरजच नसल्याचं सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी अनेक प्रकारचे कागदी घोडे नाचवावे लागू शकतात, असंही सांगण्यात येत आहे.

पूनावालांची डिप्लोमसी

कोव्हिशिल्ड लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली असल्यामुळे युरोपियन युनियनची मान्यता मिळण्यात विशेष अडचणी येणार नसल्याचा विश्वास सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

त्यासाठी युरोपियन युनियनसोबत बोलणी सुरू असून लवकरच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. अनेक भारतीयांना सध्या युरोपात प्रवास करण्यावर मर्यादा येत असून हा विषय आपण प्राधान्यानं मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं ट्विट केलं आहे.

Published by: desk news
First published: June 28, 2021, 3:41 PM IST

ताज्या बातम्या