मराठी बातम्या /बातम्या /explainer /

ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; नेमका काय आहे हा प्रकार?

ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; नेमका काय आहे हा प्रकार?

ब्रिटनमधील केंटमध्ये सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Strain of SARS CoV-2) हा आधीच्या विषाणूपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक घातक असल्याचं समोर आलं आहे.

ब्रिटनमधील केंटमध्ये सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Strain of SARS CoV-2) हा आधीच्या विषाणूपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक घातक असल्याचं समोर आलं आहे.

ब्रिटनमधील केंटमध्ये सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Strain of SARS CoV-2) हा आधीच्या विषाणूपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक घातक असल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 12 मार्च: गेल्या वर्षी ब्रिटनमधील केंटमध्ये सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Strain of SARS CoV-2) त्याच्या आधीच्या प्रकारांपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक घातक आहे. एका नव्या विश्लेषणातून हे समोर आलं आहे. 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सुरुवातीला केवळ ब्रिटनमध्येच आढळलेला कोरोनाचा नवा  प्रकार नंतर जगातल्या अनेक देशांमध्ये पसरला. एक्सेटर (Exeter University) आणि ब्रिस्टॉल विद्यापीठांतल्या (Bristol University) संसर्गरोगतज्ज्ञांनी कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे (B.1.1.7 Variant) मृत्यू होण्याच्या प्रमाणाचा तुलनात्मक अभ्यास केला. दोन्ही प्रकारच्या विषाणूंची लागण झालेल्या प्रत्येकी 54 हजार 906 रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास यासाठी करण्यात आला. जुन्या स्ट्रेनची लागण झालेल्या गटातील 141 जणांचा, तर नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या गटातील 227 जणांचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं.

युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरने या अभ्यासातील प्रमुख शास्त्रज्ञ रॉबर्ट चॅलेन यांचं याबाबतचं म्हणणं दिलं आहे. 'कोविड19मुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे; पण B.1.1.7 ही कोरोनाची नवी स्ट्रेन धोका वाढवते. तसंच, या स्ट्रेनची प्रसार होण्याची क्षमता अधिक वेगवान आहे. त्यामुळे या स्ट्रेनचा धोका गांभीर्याने घेतला पाहिजे,' असं त्यांनी सांगितलं.

केंटमध्ये (Kent) कोरोना विषाणूची ही नवी स्ट्रेन पहिल्यांदा सप्टेंबर 2020मध्ये आढळली होती. या स्ट्रेनचा प्रसार वेगाने आणि सहज होत असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे ब्रिटनमध्ये जानेवारी 2021पासून लॉकडाउनचे नवे निर्बंध लागू करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये (Spike Protein) अनेक जनुकीय बदल होऊन या नव्या स्ट्रेनची निर्मिती झाली आहे. नव्या अभ्यासात असंही आढळून आलं आहे, की या स्ट्रेनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे अगोदरच्या स्ट्रेनची लागण होण्याचा धोका कमी असलेल्या गटातल्या व्यक्तींनाही नव्या स्ट्रेनच्या लागणीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ लिऑन डॅनन यांनी सांगितलं, 'नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत आढळलेल्या रुग्णांच्या माहितीचं आम्ही विश्लेषण केलं. त्या कालावधीत जुन्या स्ट्रेनचे आणि नव्या स्ट्रेनचेही रुग्ण ब्रिटनमध्ये होते. त्यामुळे आम्हाला पडताळणी करणं शक्य झालं. पुढे केलेल्या आणखी विश्लेषणानंतर आमचे निष्कर्ष निश्चित झाले.'

हे वाचा -    'नवा व्हायरस नव्हे तुम्ही जबाबदार'; केंद्राने सांगितलं रुग्णवाढीचं कारण, महाराष्ट्रावर ओढले ताशेरे

'SARS-CoV-2 ही कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन स्वतःत वेगाने जनुकीय बदल (Mutation) घडवून आणते. हे काळजीचं कारण आहे. कारण लस विकसित (Development of Vaccine) करण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्या लशींना प्रतिकार करण्याची शक्ती घेऊन नव्या स्ट्रेन्स (New Strains) विकसित होऊ शकतात. त्यामुळे लस निष्प्रभ ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी नवनव्या स्ट्रेन्स तयार झाल्याचं लक्षात आल्याआल्या त्यांच्यावर लक्ष ठेवून, त्यांचा अभ्यास करून वैशिष्ट्यं शोधून काढणं आणि त्यानुसार त्यांच्याशी लढण्याच्या क्रिया ठरवणं महत्त्वाचं ठरणार आहे,' असंही लिऑन यांनी सांगितलं.

'ही सुदैवाची गोष्ट आहे, की आत्ता झालेली जनुकीय बदल विषाणूच्या जीनोमच्या (Genome) अशा भागात झाला, की ज्याची वेळोवेळी चाचणी घेतली जाते. भविष्यातले जनुकीय बदल कदाचित तपासले जाण्याआधीच, लक्षात येण्याआधीच पसरले जाऊ शकतात,' असं ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील एलेन ब्रूक्स-पोलॉक यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा हा नवा स्ट्रेन 100हून अधिक देशांत पसरल्याचं आढळलं आहे. या नव्या अभ्यासामुळे सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळाली आहे, असं एक्सेटर युनिव्हर्सिटीने म्हटलं आहे.

या नव्या अभ्यासाचा अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये 10 मार्च रोजी प्रसिद्ध झाला आहे. तो अहवाल वाचण्यासाठी सर्वांना खुला असून, त्यासाठी या लिंकवर क्लिक करावं.

First published:

Tags: Britain, Coronavirus, Covid19, International