मुंबई, 1 फेब्रुवारी : 1 कोटी शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी मदत केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उघडले जाणार आहेत. पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे? यातून त्यांना काय फायदा होणार आणि सरकार त्यावर एवढा भर का देत आहे. वास्तविक, ज्या शेतीमध्ये कोणतेही रसायन वापरले जात नाही, त्याला नैसर्गिक शेती म्हणतात. नैसर्गिक शेतीसाठी, सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीटकनाशकांसह इतर नैसर्गिक गोष्टींचाच वापर केला जातो.
नैसर्गिक शेतीमध्ये जमिनीचे नैसर्गिक स्वरूप राखले जाते. यामध्ये निसर्गात सहज सापडणारे जीवाणू आणि घटक वापरून शेती केली जाते. तसेच पर्यावरणाची हानी होत नाही. यासोबतच नैसर्गिक शेतीत शेतकऱ्यांचा खर्चही कमी होतो. यामध्ये केवळ नैसर्गिक खत, झाडे आणि वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले खत, शेणखत आणि सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो.
कोणत्या राज्यांमध्ये नैसर्गिक शेती केली जात आहे?
मातीची उत्पादन क्षमता वाढवणे तसेच पर्यावरण सुधारणे, हरितगृह वायूचे उत्सर्जन संपवणे किंवा कमी करणे यासारखे फायदे घेण्यासाठी रसायनमुक्त शेती म्हणजेच नैसर्गिक शेती सुरू करण्यात आली आहे. जगभरात, नैसर्गिक शेती ही पृथ्वी वाचवणारी कृषी पद्धत मानली जात आहे. भारतात या कृषी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि आता उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. केंद्रीय पुरस्कृत योजना परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली म्हणून याचा प्रचार केला जात आहे.
Union Budget 2023: सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं, राजू शेट्टींनी चुकांवर ठेवलं बोट
नैसर्गिक शेतीचे फायदे काय?
नैसर्गिक शेतीच्या पहिल्या वर्षी उत्पादनात कोणतीही घट येत नाही. त्याचबरोबर रसायने आणि खतांवर होणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचतो. एवढेच नव्हे तर रसायनमुक्त असल्याने नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला बाजारात लवकर आणि चढ्या भावाने विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. पिकांवर रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होत असल्याचे दिसून येते.
सेंद्रिय कीटकनाशकांच्या वापरामुळे कोणत्याही समस्या येत नाहीत. याशिवाय रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची खत क्षमता हळूहळू संपुष्टात येऊ लागते. याउलट सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मातीचे प्रदूषण वाढते. त्याचबरोबर सेंद्रिय कीटकनाशकांमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
नैसर्गिक शेती कुठून सुरू झाली?
जपानी शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी नैसर्गिक शेती सुरू केली. फुकुओका यांनी जपानी भाषेत लिहिलेल्या त्यांच्या 'सिजेन नोहो' या पुस्तकात या पद्धतीची संपूर्ण माहिती दिली आहे. म्हणूनच या कृषी पद्धतीला जगभरात 'फुकुओका पद्धत' असेही म्हणतात. या पद्धतीत 'काहीही करू नका' असा सल्ला दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे नांगरणी, तण किंवा खते किंवा कीटकनाशके वापरू नयेत, असे सांगण्यात आले आहे. भारतात या शेतीच्या पद्धतीला 'ऋषी शेती' असेही म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Farmer, Nirmala Sitharaman