मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: करीना कपूर, मोहनलाल अशा सेलेब्रिटींसह पोलीस, राजकारण्यांनाही गंडवणारा मोनसन मावुंकल कोण आहे?

Explainer: करीना कपूर, मोहनलाल अशा सेलेब्रिटींसह पोलीस, राजकारण्यांनाही गंडवणारा मोनसन मावुंकल कोण आहे?

Monson Mavunkal या अँटिक डीलर म्हणवणाऱ्या माणसाने कित्येक लोकांना गंडवून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Monson Mavunkal या अँटिक डीलर म्हणवणाऱ्या माणसाने कित्येक लोकांना गंडवून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Monson Mavunkal या अँटिक डीलर म्हणवणाऱ्या माणसाने कित्येक लोकांना गंडवून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

     मुंबई, 30 सप्टेंबर: केरळमध्ये सध्या माध्यमांमध्ये कोरोनापेक्षाही जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे मोनसन मावुंकल. कित्येक लोकांना गंडवून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली हा अँटिक डीलर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला (Antique Dealer Monson Mavunkal) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मोनसनकडे एक लक्झरी कार मिळाली आहे. न्यूज 18 या वृत्तसंस्थेच्या पत्रकार शरण्या स्नेहजन यांनी या कारचे डॉक्युमेंट्स मिळवले असता, ती कार चक्क करीना कपूरच्या (Kareena Kapoor car in Kerala) नावावर असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये रणधीर कपूर यांचा उल्लेख वडील म्हणून करण्यात आला आहे. तसेच, त्यात दिलेला पत्ताही बांद्र्यात असणाऱ्या हिल रोडवरील करीनाच्या अपार्टमेंटचा आहे. करीनाच्या कारसोबतच अशा एकूण 20 कार पोलिसांनी या मोनसनकडून (Monson Mavunkal cars) जप्त केल्या आहेत. ही गाडी त्याचीच असल्याचं सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा वा कागदपत्रं नसताना, मोनसनने ही गाडी कशी मिळवली याचंच पोलिसांना आश्चर्य वाटत आहे; पण या मोनसनचे प्रताप एवढ्यावर थांबत नाहीत.

    एकापेक्षा एक कारनामे

    दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांनी मोनसन (Monson Mavunkal fraud) विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर 26 सप्टेंबरला, म्हणजेच रविवारी पोलिसांनी त्याला अळापुझामधील त्याच्या घरातून अटक केली. यानंतर केलेल्या चौकशीत स्वतःला अँटिक डीलर म्हणवणाऱ्या या मोनसनचे (Monson Mavunkal case) एकपेक्षा एक कारनामे बाहेर आले. हॉलिवूडपटातील एखाद्या कॉन मॅनलाही लाजवतील असे या मोनसनचे कारनामे आहेत. याची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा मोनसन आपलं चेरथला गाव सोडून कोचीला आला. या ठिकाणी आल्यानंतर त्याने एक घर भाड्याने घेऊन, त्याचं रूपांतर संग्रहालयात केलं. आपल्या या संग्रहात अतिशय दुर्मिळ अँटिक वस्तू असल्याचा दावा तो करत होता. दी न्यूज मिनिटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    मोनसनच्या या संग्रहालयात चक्क येशूला दगा देण्यासाठी जुडासला मिळालेली 30 नाणी, येशू वापरत असलेल्या कपड्याचा एक तुकडा, प्रेषित मोहम्मद वापरत असलेला एक पेला, टिपू सुलतानचं सिंहासन आणि अशाच अनेक दुर्मीळ गोष्टींचा समावेश (Monson Mavunkal museum) होता. या सर्व गोष्टींची सत्यता हा संशोधनाचा भाग असला, तरी या संग्रहालयाला – पर्यायाने मोनसनच्या घरी भेट देणाऱ्या व्यक्तींमध्ये बऱ्याच व्हीआयपींचा समावेश झाला होता. यामध्ये मग ‘दी कम्प्लीट अक्टर’ मोहनलाल, केरळचे माजी पोलीस महासंचालक लोकनाथ बेहेरा, सहाय्यक पोलीस महासंचालक मनोज अब्राहम, पोलीस महानिरीक्षक लक्ष्मण गुगुल्लोथ, माजी पोलीस उपमहानिरीक्षक एस. सुरेंद्रन यांचा समावेश आहे. एवढंच नव्हे, तर केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरण, सध्या सत्तेत असणारे रोशी ऑगस्टीन आणि अहमद देवरकोवील हे मंत्रीदेखील या म्युझियमला (Monson Mavunkal with VIPs) भेट देऊन आले आहेत. यांच्यासोबत इतर अनेक व्हीआयपींसोबत मोनसनचे फोटो आहेत. त्यांचा वापर करूनच तो लोकांना आपल्या भूलथापांना बळी पाडत होता.

    पैसा अडकला परदेशात

    केरळ क्राइम ब्रांचने केलेल्या तपासात असंही दिसून आलं, की मोनसनने सहा तक्रारदारांसमवेत इतरही कित्येकांना फसवलं होतं. अशा प्रकारे त्याने राज्यभरातून एकूण 24 कोटी रुपये गोळा केले होते. तक्रार दाखल करणाऱ्या विविध लोकांना त्याने आपण हिऱ्याचा व्यापारी आणि अँटिक डीलर असल्याचं सांगितलं होतं. विदेशात व्यापार करून कमावलेला पैसा हा केंद्र सरकारच्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यामुळे बाहेरच अडकला आहे. तो पैसा मिळवण्यासाठी आपण कायदेशीर कारवाई करत आहोत; मात्र त्यासाठी आपल्याला सध्या पैशांची गरज आहे, अशी टोपी तो या लोकांना घालत असे. यासाठी तो एचएसबीसी बँकेत त्याचं आणि त्याचा पार्टनर व्ही. जे. पटेल याचं जॉईंट अकाउंटही दाखवत असे. अर्थात, सर्वच जण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होते असं नाही. पण मग अशा लोकांना तो आपल्या घरी बोलावत असे. त्याचं मोठं घर, (Monson Mavunkal house) म्युझियम आणि थाटमाट पाहून या लोकांना त्याच्यावर विश्वास बसून जाई. याउपरही लोकांना विश्वास बसला नाही, तर मग व्हीआयपी, पोलीस अधिकारी आणि नेत्यांसोबतचे आपले फोटो तो या लोकांना दाखवे.

    पाऊस कधी थांबणार? मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल IMD ने दिली माहिती

    याबाबत एक किस्सा एका तक्रारदाराने सांगितला आहे. यात तक्रारदार म्हणतो, की “नोव्हेंबर 2018 मध्ये मी मोनसनच्या घरी होतो. तेव्हा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. सुधाकरन हेदेखील या ठिकाणी होते. मोनसनचे दिल्लीमधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण मदत करू, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच, त्यांच्यासमोरच मी मोनसनला 25 लाख रुपये दिले होते.” याबाबत सुधाकरन यांना विचारलं असता, त्यांनी आपण मोनसनला ओळखत असल्याचं म्हटलं आहे; मात्र पैशांच्या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतर काही तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनसनने त्यांना निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीलेखा, खासदार हिबी एडन, माजी मुख्य सचिव जिजी थॉम्पसन, केरळ काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष लाली विल्सन आणि माजी मंत्री मॉन्स जोसेफ या सर्वांसोबतचे फोटो दाखवले होते.

    8 लाखांची कार Loanवर घेतली तर भरावे लागतील 10.47लाख; समजून घ्या व्याज दराचं गणित

    मोनसनच्या अधिकृत वेबसाइटवर (Monson Mavunkal website) त्याने स्वतःचा उल्लेख जागतिक शांतता प्रवर्तक, फिलँथ्रॉपिस्ट, शिक्षणतज्ज्ञ आणि मोटिव्हेशनल स्पीकर असा केला आहे. या ठिकाणी त्याचे एखाद्या सिनेमामधल्या डॉनप्रमाणे बॉडीगार्ड्ससोबतचे फोटोही आहेत. मोनसनने कित्येकांना असंही सांगितलं होतं, की तो जागतिक शांतता मंचाचा सदस्य आहे. यासोबतच, आपण प्रवासी मल्याळी फेडरेशनचा कायमस्वरूपी सदस्य असल्याचंही त्याने कित्येकांना म्हटलं आहे. एवढंच काय, तर आपल्या विदेशात अडकलेल्या पैशासंबंधी चक्क मोदीजींशी बोलणं झाल्याचा दावाही त्याने केला होता. के. सुधाकरन यांच्यासारख्या कित्येक व्हीआयपींना त्याने आपण सौंदर्यप्रसाधन उत्पादक असून, आपल्याकडे आठ पोस्ट डॉक्टरेट डिग्री असल्याचं म्हटलं होतं.

    दुर्मीळ वस्तू

    येशू आणि प्रेषित मोहम्मदाच्या वस्तूंव्यतिरिक्त अन्य अनेक दुर्मीळ वस्तू मोनसनच्या संग्रहालयामध्ये दिसून आल्या. यामध्ये लिओनार्डो दा विंची आणि राजा रविवर्मा या महान चित्रकारांच्या पेंटिंग्ज, छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेली भगवद्गीतेची प्रत, बायबलच्या जुन्या करारामधली मोझेसची छडी, श्री नारायण गुरू यांची छडी, मैसूर पॅलेसचं नाव असलेला खरा विलेख, त्रावणकोर राजाचं सिंहासन, जगातला पहिला ग्रामोफोन, जगातलं पहिलं छापील बायबल, सद्दाम हुसेन यांच्याकडे असणारी कुराणाची प्रत, जुन्या आणि नव्या करारांचा मोठा संग्रह अशा अनेक गोष्टी या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

    या राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण?

    या सर्व वस्तूंच्या सत्यतेबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस आता या सर्व वस्तू तपासून पाहणार आहेत. या प्रकरणाबाबत बोलताना माजी मुख्य सचिव जिजी थॉम्पसन म्हणाले, की कोरोना महामारीपूर्वी ते सपत्निक हे संग्रहालय पाहण्यासाठी गेले होते. या वेळीच मोनसनने त्यांना आपण प्रवासी मल्याळी फेडरेशनचा सदस्य असल्याचं सांगितलं होतं. थॉम्पसन यांनाही या संग्रहालयातल्या वस्तूंच्या सत्यतेबाबत प्रश्न पडला होता. याबाबत मोनसनला विचारलं असता, त्याने त्यावर उत्तर देणं टाळून, “लोकनाथ बेहरा यांना तुम्ही ओळखता का?” असा प्रश्न थॉम्पसन यांना विचारला. त्यानंतर मग त्यांची बेहरांबाबत चर्चा झाली आणि या अँटिक्सचा विषय मागे पडला.

    एक प्रकरण बाहेर आले आणि लागली रांग

    एवढ्या मोठ्या व्यक्तींशी संबंध, आणि मोठ्या प्रमाणात झोलझाल करणारा मोनसन आजपर्यंत चर्चेत कसा नव्हता, याचं उत्तरही त्याच्या ओळखींमध्येच आहे. मोनसनशी ओळख असणाऱ्या व्हीआयपींमध्ये विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्याच्या एवढ्या ओळखी तरी नक्कीच होत्या, की आपल्याविरुद्ध कुठे काय सुरू आहे याची माहिती त्याला मिळेल. अशीच एक ऑडिओ क्लिपही आता बाहेर आली आहे, ज्यामध्ये एक उच्च पोलीस अधिकारी मोनसनला त्याच्या टीममध्ये एक व्हिसलब्लोअर असल्याची माहिती देत आहे.

    यासोबतच, मोनसनला अटक झाल्यानंतर दोनच दिवसांनी, कोचीच्या एका महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मोनसनच्या एका मित्राविरोधात या महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी मोनसन आपली छळवणूक करून, आपल्याला धमक्या देत होता असा आरोप या महिलेने केला आहे.

    एकंदरीत पैशांच्या घोटाळ्यासोबतच मोनसनचे आणखीही काळे कारनामे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कसं वळण घेतं आणि यात आणखी कोण कोणत्या बड्या व्हीआयपींची नावं समोर येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    First published:

    Tags: Kerala