मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explained: 1999मध्ये 10000 मृत्यू, 2021 मध्ये आकडा कित्येक पटींनी कमी; Cyclonesशी भारताचा असा लढा

Explained: 1999मध्ये 10000 मृत्यू, 2021 मध्ये आकडा कित्येक पटींनी कमी; Cyclonesशी भारताचा असा लढा

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी जीवितहानी होण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश येत असल्याचं आता दिसून आलं आहे

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी जीवितहानी होण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश येत असल्याचं आता दिसून आलं आहे

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी जीवितहानी होण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश येत असल्याचं आता दिसून आलं आहे

मुंबई, 29 मे: गेल्या 15 दिवसांत दोन चक्रीवादळं भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर धडकली. अरबी समुद्रात आलेलं तौक्ते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) गुजरातला धडकलं आणि तिथे जाईपर्यंत केरळपासून कोकण किनारपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी त्याने नुकसान केलं. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं यास चक्रीवादळ (Yaas Cyclone) बुधवारी (26 मे) ओडिशाला धडकलं. ओडिशासह (Odisha) पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) त्यामुळे मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं. या चक्रीवादळांचा वेग भयानक असल्यामुळे ती धडकल्यावर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणं साहजिक होतं; मात्र चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी जीवितहानी होण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश येत असल्याचं आता दिसून आलं आहे. 1999मध्ये ओडिशाला धडकलेल्या चक्रीवादळात तब्बल 10 हजार जणांचे प्राण गेले होते. दोन दिवसांपूर्वी धडकलेल्या यास चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 6-7 आहे. एकही मृत्यू होणं ही दुर्दैवीच गोष्ट आहे; मात्र अशा आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 20-22 वर्षांत 10 हजारांवरून 10च्या आत आणणं ही प्रगती निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. नैसर्गिक आपत्ती टाळता येणं शक्य नाही; मात्र त्यामुळे होणारी जीवितहानी टाळणं नक्की शक्य आहे, हे भारताने आपल्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. डिझास्टर रिस्क रिडक्शन (Disaster Risk Reduction - DRR) अर्थात आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे. हे वाचा-Explainer: 'झिंक'च्या जास्त सेवनामुळं ब्लॅक फंगस वाढतोय का? अरबी समुद्राच्या (Arabian Sea) तुलनेत बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) चक्रीवादळं निर्माण होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यात ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचं भौगोलिक स्थान असं आहे, की ज्यामुळे बहुतांश चक्रीवादळांचा फटका या दोन राज्यांना बसतोच. या पार्श्वभूमीवर, 1999च्या चक्रीवादळात 10 हजार जणांचा मृत्यू झाल्यानंतर ओडिशाने राज्यात केलेली सुविधांची निर्मिती, केंद्र सरकारने केलेलं अर्थसाह्य आणि नियोजन, तसंच, चक्रीवादळांचा मार्ग, त्यांचा वेग, दिशा आणि ते जमिनीवर कुठे आणि केव्हा धडकणार यांबद्दल अचूक अंदाज वर्तवण्याची भारतीय हवामान खात्याने विकसित केलेली यंत्रणा या एकत्रित प्रयत्नांतून हे साध्य झालं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, यास चक्रीवादळापूर्वी ओडिशातल्या सहा लाख आणि पश्चिम बंगालमधल्या आठ लाख अशा तब्बल 14 लाख लोकांना दोनच दिवसांत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी समन्वय साधून, वेळोवेळी आढावा घेऊन नियोजन केलं आणि त्याची नेमकी अंमलबजावणीही केली. गेल्या आठवड्यातल्या तौते चक्रीवादळाने 193 बळी घेतले. त्यात बार्ज दुर्घटनेतल्या 70 जणांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर, यास चक्रीवादळावेळी अधिकच दक्षता बाळगण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) 105 टीम्स, लष्कराचे (Army) 17 कॉलम्स आणि नौदलाच्या (Navy) चार युद्धनौका हेलिकॉप्टर्ससह आणि अन्य पाच नौकाही सज्ज होत्या. तटरक्षक दलाची पाच जहाजंही विमानांसह तैनात होती. हे वाचा-Explainer : भारतातल्या सोशल मीडियाला पाळावे लागणारे नियम काय आहेत? 'डिझास्टर रिस्क रिडक्शन'साठी (DRR) गेल्या दशकात पाच वर्षांसाठी सरासरी 3 ते 4 अब्ज डॉलर एवढ्या निधीची तरतूद केली जायची. गेल्या सलग दोन वर्षांत मात्र प्रति वर्षी 4 अब्ज डॉलर निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून हे साध्य झालं. त्यातून किनारपट्टीच्या राज्यांत आपत्कालीन निवारे (Shelters) उभारण्यात आले. अचूक हवामान अंदाजांसाठी नवे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. हवामान अंदाजांसाठी मॉडेल्स विकसित करण्यात आली. 'एनडीआरएफ'बरोबरच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातही (SDRF) प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवण्यात आलं. एनडीआरएफमध्ये तब्बल 14 हजार जवान असून, राज्यांच्या एसडीआरएफमध्येही जवळपास तेवढंच प्रशिक्षित मनुष्यबळ उपस्थित आहे. 29 ऑक्टोबर 1999 रोजी ओडिशाला धडकलेल्या सुपर सायक्लोनच्या (Super Cyclone) वेळी सरकारी यंत्रणेकडून त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं गेलं नाही. ते पारादीपला धडकलं. भुवनेश्वर आणि कटक या शहरांना त्याचा धोका असणार नाही, असं सरकारी अधिकाऱ्यांना वाटलं; मात्र ती गंभीर चूक ठरली. ताशी 260 किलोमीटर वेगाने आलेल्या वाऱ्यांनी 10 हजार जणांचे प्राण घेतले, साडेतीन लाख घरं उद्ध्वस्त झाली, दोन लाखांहून अधिक जनावरं मृत्युमुखी पडली, असा संदर्भ इंडिया टुडेच्या वृत्तात सापडतो वादळापूर्वी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असतं, तरी त्या वेळी ओडिशात केवळ 21 आपत्कालीन निवारे होते. त्यात केवळ 2000 व्यक्तींची सोय होऊ शकत होती. शिवाय आपली घरं सोडून तिथे जायला लोकांची तयारीही नव्हती. त्यातूनच हा सगळा हाहाकार माजला. ती भारतातली सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली. वादळ शमल्यानंतर शिल्लक राहिलेले लोक रस्त्यावर अक्षरशः फिरत होते. अन्नासाठी भांडत होते. त्या वेळच्या चुका सुधारण्यासाठी मधल्या काळात बरेच प्रयत्न झाले. 2019मध्ये फॅनी चक्रीवादळ (Fani Cyclone) ओडिशाला धडकलं, त्यापूर्वी ओडिशात 900 आपत्कालीन निवारे तयार होते. त्या वादळाचे अचूक अंदाज हवामान खात्याने वर्तवले आणि सरकारी यंत्रणांनी त्याबरहुकूम कार्यवाही केली. त्यामुळे त्या वेळी जीवितहानीने 10चा आकडाही ओलांडला नाही. कारण तेव्हाही दोन-तीन दिवसांत साडेअकरा लाख नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यंत्रणा यशस्वी झाली. तसंच, त्या चक्रीवादळाच्या एक दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची तातडीची मदत संबंधित राज्यांना पाठवली होती. हे वाचा-इस्रायल-पॅलेस्टाइन वाद : जेव्हा गांधीजी म्हणाले होते की, जर मी ज्यू असतो तर... संयुक्त राष्ट्रसंघासह (UN) जागतिक पातळीवर भारताच्या या प्रयत्नांचं कौतुक झालं आहे. आत्ता यास चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालेलं असतानाही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक (Navin Patnaik) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर आर्थिक ताण येऊ नये म्हणून पंतप्रधानांकडे वेगळ्या मदतीची मागणी केली नाही. हे खर्च आम्ही आमच्या राज्य पातळीवरच्या निधीतून भागवू, असं ट्वीट त्यांनी कालच केलं होतं. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाला भेट देऊन 500 कोटींचं अर्थसाह्य जाहीर केलं. एकंदरीतच संघराज्य म्हणून भारताच्या सामूहिक आणि समन्वित प्रयत्नांतूनच चक्रीवादळासारख्या भयाण आपत्तीला तोंड देण्याची क्षमता विकसित झाली असून, येत्या काळात ती अधिक व्यापक करण्याची गरज आहे.
First published:

Tags: Cyclone

पुढील बातम्या