मुंबई, 22 जून: झी मराठीवरील
( Zee Marathi) मन उडू उडू झालं
( Man Udu Udu Jhal) मालिकेनं फार महत्त्वाचं वळणं घेतलं आहे. इंद्राचं खरं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानं त्यांनी इंद्रा आणि दीपूचं लग्न
( Indra-Deepu) मोडलं आहे. दुसरीकडे दीपूपासून दुरावलेल्या इंद्रानं स्वत:चं फार वाईट हाल करुन घेतले आहेत. देशपांडे सरांनी मी गुंडाच्या हातात माझ्या मुलीचा हात देणार नाही असं सांगून दोघांचं नातं संपवलं आहे. मोठ्या संकटातून बाहेर आलेल्या दीपूच्या आयुष्यात पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असं असलं तरी दीपूचं इंद्रावर असलेले प्रेम काही कमी झालेलं नाहीये. तिचं प्रेम मिळवण्यासाठी दीपू आता घरच्यांच्या विरोधात उभी राहणार आहे. दीपूच्या या बदललेल्या स्वभावामुळे देशपांडे सरांना पुन्हा दोघांच्या प्रेमाची जाणीव होणार आहे.
मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात देशपांडे सरांना न जुमानता दीपू इंद्राची मदत करण्यासाठी जाताना दिसत आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, जयश्री आणि इंद्राच्या घरचे दीपू भेटण्यासाठी देशपांडेंच्या घरी जातात. तिथे त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढतात. मात्र देशपांडे सर 'माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हातात देणार नाही हे लग्न इथेच मोडलं असं समजा', असं ठणकावून सांगतात. त्यानंतर दीपू देशपांडे सरांबरोबर रिक्षामधून जात असताना ती रस्त्यात वाईट अवस्थेत बसलेल्या इंद्राला पाहते आणि मला त्याला भेटायचं आहे असं सांगते. 'तू कुठेही जायचं नाहीस', असं सांगून देशपांडे सर तिचा हात पकडून ठेवतात. मात्र 'इंद्राजींना माझी गरज आहे', असं सांगत दीपू बाबांनी धरलेला हात झिडकारुन रिक्षातून खाली उतरुन इंद्राच्या जवळ जाते. 'मी काही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही', असं वचन दीपू इंद्राला देते.
हेही वाचा -
सिद्धार्थ जाधवचं पत्नीसोबत बिनसलं? तृप्तीने सोशल मीडियावरुन हटवलं 'जाधव' आडनाव
दीपू आणि इंद्रा यांच्या प्रेमाची परीक्षा ते पुन्हा एखदा लढणार आहे. आपल्या कुटुंबावर प्रेम करणारी आणि वडिलांची आज्ञाधारी मुलगी आता घरच्यांच्या विरोधात उभी राहून आपलं प्रेम मिळवण्यासाठी धडपड करणार आहे. तर दुसरीकडे ज्याच्यासाठी देशपांडे सर हे देवासमान आणि वडिलांसमान होते त्यांच्या मनातून आपली जागा कायमची निघून गेल्यानं इंद्रा पूर्णपणे तुटून गेला आहे.
मालिकेत इंद्रा दीपूच्या नात्यात आलेला दुरावा पाहून प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केलीय. 'इंद्राचा कबीर सिंह झालाय', असंही काहींनी म्हटलंय तर दोघांच्या दमदार अभिनयाचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. आता इंद्रा -दीपू त्यांच्या प्रेमाची ही लढाई कशी जिंकणार? घरच्यांच्या विरोधात गेलेल्या दीपूला पुढे काय सहन करावं लागणार आहे? इंद्रा देशपांडे सर आणि जयश्री यांच्या मनात त्याची जागा पुन्हा निर्माण करू शकणार का? इंद्रा दीपूची लव्ह स्टोरी मालिकेत पुढे काय वळण घेणार हे पाहण महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.