Zaira Wasim | Bollywood | या प्रकरणात झायराने स्वतःहून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान झायराची मॅनेजर तुहीन मिश्राने तिचं अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं होतं.
मुंबई, 01 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिच्यात आणि अल्लाहच्या मार्गात फार अंतर आल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. आता तिला धर्म आणि शांतीसाठी बॉलिवूडला अलविदा म्हणायचे आहे. या प्रकरणात झायराने स्वतःहून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान झायराची मॅनेजर तुहीन मिश्राने तिचं अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं होतं. आता मात्र तिने आपल्याच विधानावर घूमजाव करत, झायराचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं ती कधीच बोलली नाही असं नवं विधान तुहीनने केलं आहे. ‘मी झायराचं अकाउंट हॅक झालं असं कधीच म्हटलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की नक्की काय झालं ते पाहावं लागले.’ दरम्यान नवीन अपडेट नुसार झायरा वसीमचं अकाउंट हॅक झालं नसून तिने स्वतः ती पोस्ट लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वतः तुहीनने याबद्दलची माहिती दिली. शिवाय एएनआय या वृत्तसंस्थेने या संबंधीत ट्वीट शेअर केलं.
Tuhin Mishra, manager of #ZairaWasim, on reports that her Twitter account was hacked: We have never said that her account was hacked. We just said that we would definitely like to know what has happened. And the post was done by her. (File pic) pic.twitter.com/vruqIG8kwB
आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमने ३० जूनला इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहित, बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. झायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिलं. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
अनेकांनी तिला या निर्णयावरून ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यांनी झायराच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? तिला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’