कोलकाता, 31 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. लग्न, आई झाल्याच्या बातम्या, त्यानंतर निखिल जैनसोबतचं लग्न मोडणं आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतचं (Yash Dasgupta) नातं या सर्व गोष्टींमुळे नुसरत या वर्षात खूप चर्चेत राहिली. यातच नुसरतने अलीकडेच रेडिओ शोमध्ये यशसोबतच्या नात्यावर जाहीरपणे भाष्य केलं. या रेडिओ कार्यक्रमात नुसरत आणि यश दासगुप्ताने आपल्या प्रेमाची कबूली देऊन उघडपणे आपल्या नात्यांचा स्वीकार केला होता. यानंतर दोघांकडूनही आपल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करण्यात येत आहेत. यशने नुसरत जहाँच्या प्रेग्नन्सी काळातल्या काही मजेदार गोष्टी नुकत्याच सांगितल्या. मीडियापासून लपून राहून नुसरतच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कशी धडपड केली, याबद्दल त्यानं सांगितलं.
अलीकडेच 'इश्क विथ नुसरत' या नुसरतच्या रेडिओ शोमध्ये यश दासगुप्ता आला होता. यादरम्यान दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. नुसरत प्रेग्नंट असताना तिने रोमँटिक ड्राईव्हवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा मीडियासमोर जाण्यास तिचा नकार होता. कारण, एका सामान्य मुलीप्रमाणे तिला विनामेकअप बाहेर पडायचं होतं. आपण घराबाहेर पडताच काही मीडियावाले आमच्या मागे आले; पण त्यांना चकवा देऊन इच्छित स्थळी पोहोचल्याचं यशने सांगितलं. 'वन इंडिया हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा : 2021 चा अखेरचा सूर्यास्त, विविध शहरांत दिसला असा नजारा; पाहा PHOTOs
'अभिनेते आणि अभिनेत्रींना नेहमीच चांगलं दिसावं लागतं; पण 24 तास ते शक्य नाही. छान कपडे घालून या ठिकाणी बसलोय; पण घरात किंवा प्रत्येकवेळी आम्ही असेच असतो असे नाही. घरामध्ये आम्ही विना मेकअप आणि अगदी साध्या कपड्यात असतो. अशावेळी मीडियासमोर येण्याची इच्छा नसते. लाँग ड्राईव्हवर जाताना नुसरत मेकअपशिवायच बाहेर पडली होती. आम्ही गाडीत बसणार तेवढ्यात मीडियावाल्यांनी आम्हाला पाहिलं. ज्या प्रकारे ते आमचा पाठलाग करत होते, तो एक लपाछपीचा खेळ होता,' असं यशने सांगितलं.
'आमची कार पुढे, त्यांची कार आमच्या पाठीमागे होती. मीडियाच्या तावडीतून सुटण्याचा माझा प्रयत्न होता; मात्र नुसरत या सर्व गोष्टींचा आनंद घेत होती,' असंही यशने सांगितलं. ती खूपच फिल्मी असल्याचंही तो म्हणाला.
नुसरत आणि यश याचवर्षी ऑगस्टमध्ये आई-बाब झाले आहेत. नुसरतने ऑगस्ट 2021 मध्ये मुलाला जन्म दिला. त्याचं नाव यिशान ठेवण्यात आलं आहे. नुसरत अनेकदा इन्स्टाग्रामवर मुलाचे फोटोज शेअर करते. पण तिने कधीच त्याचा चेहरा उघड केलेला नाही.
हेही वाचा : एकेकाळी पृथ्वीसारख्या असणाऱ्या शुक्रावर आज जीवसृष्टी का नाही?
नुसरतचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. तिचं पहिलं लग्न 2019 मध्ये तुर्कीतला बिझनेसमन निखिल जैनसोबत झालं होतं; पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. यानंतर ती गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने ते बाळ आपलं असल्याचं नाकारलं. त्यातच नुसरतचं नाव यश दासगुप्तासोबत जोडलं जाऊ लागले. सुरुवातीला नुसरतने या गोष्टी नाकारुन अफवा असल्याचं म्हटलं होतं; पण अखेर नुसरत जहाँने तिच्या वैवाहिक वादावर मौन सोडून सर्व गोष्टींचा खुलासा केला.
नुसरत आणि यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास हे दोघं 'टमास्टरमोशाई अपनी किचू देखनेनी है' या बंगाली चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिलादित्य मौलिक आहेत. हा चित्रपट पश्चिम बंगालमधल्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावर आधारित आहे. नुसरत आणि यशने गेल्या महिन्यात त्यांच्या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.