जेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा

जेव्हा लेखकच बनतो सिनेमातली व्यक्तिरेखा

लेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

विराज मुळे, 12 आॅक्टोबर : सिनेसृष्टीत अभिनेता निर्माता किंवा दिग्दर्शकाला जेवढं ग्लॅमर आहे तेवढं लेखकाला नाही असं नेहमीच म्हटलं जातं. काही अंशी ते खरंही आहे. मात्र आता काळ बदलतोय. आणि लेखक हीच सिनेमातली कॅरेक्टर्स बनून आपल्या भेटीला येणारेत. सध्या या गोष्टीची सुरुवात झाली असून येत्या काही काळात अशीच काही हटके कॅरक्टर्स आपल्याला सिनेमात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

भा.रा. भागवत यांचं कॅरेक्टर नव्या 'फास्टर फेणे' या सिनेमात दिलीप प्रभावळकर करतायत.खरं तर भा.रा. भागवतांच्या  प्रतिभेतून बनेश म्हणजेच फास्टर फेणे हे कॅरेक्टर तयार झालं. पुस्तकाच्या रूपाने अनेकांचं बालपण समृद्ध करणारं हे कॅरेक्टर आजही अनेकांना आपलसं वाटतं.मात्र फास्टर फेणेच्या एकाही गोष्टीत भागवतांचा संदर्भ नाही. मात्र या विषयावर सिनेमा करताना मात्र भारांचं कॅरेक्टर तयार करून त्यांना या सिनेमात खास स्थान देण्यात आलंय.

पण मराठीत हे काही पहिल्यांदाच घडलंय असं काही नाही. पुलं देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक कॅरेक्टर्स पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्षितीज झारापकरने केला तो गोळाबेरीज या सिनेमातून. पण याच सिनेमात भाऊंच्या भूमिकेत खुद्द पुलंही होतेच. त्यांच्याच भूमिकेच्या माध्यमातून या सगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.

हे प्रयत्न फक्त मराठीत झालेत असंही नाही बरं का, तर टीव्हीवरची सध्याची हिट मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा तुम्हाला माहितीच असेल.आजवर या मालिकेचे हजारहून जास्त एपिसोड ऑन एअर झालेत. मात्र या मालिकेत अभिनेता शैलेश लोढा हे ज्या पुस्तकावर ही मालिका आधारित आहे. तिचे लेखक तारक मेहतांचीच व्यक्तिरेखा या मालिकेत साकारतात.

आता बॉलिवूडही या ट्रेंडपासून फार लांब राहिलेलं नाही. नंदिता दासने बंडखोर उर्दु कथालेखक मंटो यांच्या आयुष्यावर एक लघुपट तयार केलाय आणि आता तीच या विषयावर पूर्ण सिनेमाही तयार करणारे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी हा मंटोंच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. तर संजय लीला भन्साळीही शायर साहिर लुधियानवी आणि लेखिका अमृता प्रितम यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सिनेमात त्यांच्या भूमिका नक्की कोणती जोडी साकारणार याची उत्सुकता आहे.

जावेद अख्तर हे बॉलिवूडमधले नावाजलेले गीतकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय अभिनेता फरहान अख्तरने घेतलाय. शबाना आझमी यांच्या विनंतीवरून तो हा सिनेमा बनवणार असून यात स्वतः फरहानच जावेदजींची भूमिका साकारणारे.

थोडक्यात काय तर लेखकांनी लिहिलेल्या कथा यशस्वी ठरतात हे तर सर्वश्रृतच आहेच. पण आता लेखकांवर बनणारे सिनेमे किंवा लेखकांची स्वतःची कॅरेक्टर्स असणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतात ते पहायचं.

First published: October 12, 2017, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading