मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईनं या पूर्वीही सलमान खानवर हल्ल्याचा रचला होता कट, वाचा केव्हा व कसा?

Salman Khan: लॉरेन्स बिश्नोईनं या पूर्वीही सलमान खानवर हल्ल्याचा रचला होता कट, वाचा केव्हा व कसा?

सलमान खान

सलमान खान

तुम्हाला माहिती आहे का, सलमान खानला धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी सलमानवर दोनदा हल्ल्याचा कट रचला होता.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 21 मार्च : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत समोर आल्यानंतर आता अभिनेता सलमान खान विशेष चर्चेत आला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं एका मुलाखतीत सलमान खानला त्याच्या काळवीट शिकार प्रकरणावरून पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्यातच आता सलमानला धमकीचा ई-मेलसुद्धा आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सलमान खानला धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी सलमानवर दोनदा हल्ल्याचा कट रचला होता. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.

  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची गँग चालवणाऱ्या गोल्डी ब्रारनं बॉलिवूडचा 'दबंग' म्हणजेच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर सलमानच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लॉरेन्सनं काही दिवसांपूर्वीच चित्रपट अभिनेता सलमान खानला मारणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. सलमान खानने बिश्नोई समाजाच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली असून भावना दुखावल्या होत्या. जर सलमाननं माफी मागितली, तर स्वतःचा विचार बदलेल, असंही बिश्नोई म्हणाला होता. त्यातच आता सलमानच्या मॅनेजरलाही धमकीचा मेल आलाय.

  Bhumika Chawala: सलमानची हिरॉईन म्हणून हिट; मग अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब; आता काय करते ही अभिनेत्री?

  या धमकीनंतर बॉलिवूडच्या दबंगच्या घराच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे जवान तैनात झालेत. विशेष म्हणजे सलमानला धमकवणारा चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून, बिश्नोई याचा खास मित्र गोल्डी ब्रार आहे. जो परदेशातून लॉरेन्सची गँग चालवतो.

  म्हणून सलमान आहे लॉरेन्सच्या हिटलिस्टवर

  सप्टेंबर-ऑक्टोबर 1998 मध्ये, जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना, सलमान खान त्याच्या सहकलाकारांसह भावड गावात शिकारीसाठी गेला होता. घोडा फार्म हाऊस येथे रात्री काळवीटाची शिकार करण्यात आली, व सलमान खानवर याचा आरोप करण्यात आला. शिकारीनंतर गावकऱ्यांना याची माहिती मिळताच, ते रात्री लाठ्या-काठ्या घेऊन बंदुकीच्या गोळीचा आवाज आला, त्या बाजून धावले होते. तेव्हा गावकरी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना दोन काळवीटांची कोणीतरी शिकार केली असल्याचे दिसले. त्याचवेळी, गावकऱ्यांना एक जिप्सी तेथून वेगानं जाताना दिसली. तेव्हा तेथील काही लोकांनी सलमान खानला ओळखलं आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल झालं होतं.

  हरणाला देवाचा दर्जा

  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज मूळचा जोधपूरजवळील पश्चिम थार वाळवंटातील आहे. निसर्गावरील प्रेमासाठी हा समाज ओळखला जातो. बिष्णोई समाजात प्राण्यांना देव मानलं जातं आणि विशेषतः हरणाला देवाचा दर्जा दिला जातो. म्हणूनच या समाजातील लोक हरिण आणि इतर प्राण्यांसाठी स्वत: चा जीव धोक्यात घालण्यापासून सुद्धा मागे हटत नाहीत. ते काळ्या हरणाची पूजा करतात. वास्तविक हे लोक हरणाला देव मानतात, व त्याचं रक्षण करतात. राजस्थानातील काही गावांमध्ये आजही स्त्रिया हरणाच्या पिल्लांना दूध पाजतात. काळवीटाच्या शिकार प्रकरणानंतर लॉरेन्स सलमानच्या मागे लागला आहे.

  काय म्हटलंय ई-मेलमध्ये?

  दरम्यान, सलमान खानच्या पर्सनल असिस्टंटला आता धमकीचा ई-मेल आला आहे. हा धमकीचा ई-मेल तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वतीनं गोल्डी भाई उर्फ गोल्डी ब्रार यानं पाठवला आहे. 18 मार्च 2023 रोजी सलमान खानच्या मॅनेजरला आलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं आहे की, ‘गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमच्या बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा, मी पाहून घेईन. प्रकरण बंद करायचं असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.’

  खरं तर, सलमान खानला धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी सलमानवर दोनदा हल्ल्याचा कट रचला आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा आणि 2022 मध्ये दुसऱ्यांदा. मागच्या वेळी सलमानचे वडील सलीम खान ज्या ठिकाणी सकाळी पार्कमध्ये फिरायला जायचे, तिथे त्यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ज्यामध्ये सलमान खानला धडा शिकवणार असल्याचं लिहिलं होतं.

  दोनदा झाला हल्ल्याचा प्रयत्न

  सलमान खानवर हल्ला करण्याचा पहिला प्रयत्न हा 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी हरियाणाचा गँगस्टर आणि बिश्नोईचा जवळचा मित्र संपत नेहरा 2019 मध्ये मुंबईत गेला व त्याने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. पण त्याच्याकडे असणाऱ्या शस्त्राची रेंज कमी असल्यानं त्यावेळी त्याने हल्ल्याची योजना पुढे ढकली. तो मोठ्या रेंजचे शस्त्र आणण्यासाठी हरियाणात गेला असता त्याला अटक करण्यात आली होती.

  तर, हल्ल्याचा दुसरा प्रयत्न 2022 मध्ये झाला होता. त्यावेळी कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून बिश्नोई टोळीचा शूटर सलमान खानवर हल्ला करण्यासाठी मुंबईत गेला होता. मुंबईत भाड्यानं खोली घेऊन तो राहत होता. सलमान खानच्या फार्म हाऊसची त्याने रेकी ही केली होती. शूटरनं फार्म हाऊसच्या गार्डशी मैत्री केली होती. आरोपींनी सलमानच्या प्रत्येक हालचालीची रेकी केली, मात्र सलमान खानसोबत असलेल्या कडक सुरक्षेमुळे हा प्लॅन फसला.

  पोलीस झाले सतर्क

  लॉरेन्स टोळीनं दिलेल्या धमकीनंतर पुन्हा एकदा पोलीस सतर्क झालेत. ई-मेल मिळताच सलमानच्या मॅनेजरनं वांद्रे पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तातडीनं सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवली असून तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सलमानच्या मॅनेजरनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तीन नावं असून यामध्ये तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोई, कॅनडामध्ये असलेला गोल्डी ब्रार, आणि रोहित गर्ग या तिघांचा समावेश आहे.

  दरम्यान, वाढत्या धमक्यांमुळे काही दिवसांपूर्वी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याबरोबरच त्याला बंदुकीचा परवानाही देण्यात आला होता.

  First published:
  top videos