मुंबई, 11 मे : अभिनेता इरफान खाननं 29 एप्रिलला या जगाचा निरोप घेतला. इरफानच्या जाण्यानं संपूर्ण देश हळहळला. त्याच्या अशा एकाएकी जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेमात कोणताही फिल्मी मसाला नसताना केवळ अभिनयाच्या जोरावर सिनेमा हिट करणारा अभिनेता अशी इरफानची ओळख होती. व्यावसायिक सिनेमात काम न करता ज्या सिनेमांचं कथा दमदार असेल अशा सिनेमात काम करून आपली स्वतंत्र ओळख बनवलेला अभिनेता म्हणजे इरफान खान.
काही दिवसांपूर्वीच इरफानने जगाचा निरोप घेतला. एक चांगला अभिनेता गमावल्याची खंत सबंध बॉलिवूडमधून आणि सर्वसामान्यांमधून व्यक्त झाली. त्याचे काही जुने व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. एका पुरस्कार सोहळ्यातला इरफानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सोहळ्याचं सूत्रसंचालन शाहरुख खान करत होता आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या इरफानने नाराज होऊन सोहळ्याबाहेर पडण्याची तयारी केली होती. या व्हिडीओमध्ये इरफान शाहरुखवर खूप रागावलेला दिसत आहे.
शाहरुखच्या सिनेमांना पुरस्कार मिळत असताना चिडलेल्या इरफानने पुरस्कार सोहळ्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाहरुखने त्याला अडवलं आणि त्यामागचं कारण विचारलं. तेव्हा व्यावसायिक सिनेमांना टोमणा मारत इरफान मंचावर जातो. “तुमच्या सिनेमांमध्ये मसाला खूप असतो, त्यांना अनेक पुरस्कार मिळतात. मग आमच्या सिनेमांना झुकतं माप का”, असा प्रश्न तो शाहरुखला विचारतो. शाहरुख त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो.
यावेळी इरफान या अवॉर्ड सोहळ्यात एक व्हिडीओ दाखवण्याची विनंती करतो. या व्हिडीओत शाहरुखच्या ‘मोहब्बतें’ सिनेमातील दृश्य इरफान साकारताना दिसतो. मात्र त्याला ते फारसं जमत नाही. त्यानंतर शाहरुख इरफानच्या ‘पिकू’ सिनेमातील भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यालाही ते जमत नाही. अशा वेळी, तू तुझ्या व्यावसायिक सिनेमांध्येच ठीक आहेस आणि मी माझ्या सिनेमांमध्ये ठीक असं म्हणत दोघंही एकमेकांना समजून घेतात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला दिसत आहे.