मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बिग बींनी दाखल केलेली 'पर्सनॅलिटी राइट्स' याचिका नक्की आहे तरी काय?

बिग बींनी दाखल केलेली 'पर्सनॅलिटी राइट्स' याचिका नक्की आहे तरी काय?

अभिताभ बच्चन

अभिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या नकला करण्याची खूप हौस आहे; मात्र आता अशी नक्कल करणं चाहत्यांना महागात पडू शकतं. बिग बींनी दाखल केलेली 'पर्सनॅलिटी राइट्स' याचिका नक्की आहे तरी काय? जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासारखं दिसावं असं अनेकांना वाटतं. कोणी त्यांच्यासारखे कपडे घालतो, कोणी त्यांच्यासारखा आवाज काढतो, तर कोणी त्यांच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करतो. अमिताभ बच्चन यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या नकला करण्याची खूप हौस आहे; मात्र आता अशी नक्कल करणं चाहत्यांना महागात पडू शकतं. अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पर्सनॅलिटी राइट्सअंतर्गत एक याचिका दाखल केली आहे. आपला फोटो, नाव आणि आवाज यांच्या गैरवापराबाबत ही याचिका असून, न्यायालयाने ही याचिका स्वीकारून बच्चन यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने संबंधितांना तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

परवानगी घेतल्याशिवाय आपला आवाज, फोटो व नाव वापरण्यात येऊ नये, अशी याचिका सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या संदर्भात अमिताभ यांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्या माध्यमातून न्यायालयाला त्याबाबत विनंती करण्यात आली. न्यायालयाने ती याचिका स्वीकारली असून, संबंधित व्यक्तींना तशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा- Prashan Damle : आधी अमिताभ बच्चनकडून कौतुकाची थाप; आता प्रशांत दामलेंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

अमिताभ बच्चन लोकप्रिय आहेत. अनेक जाहिरातींमध्ये ते सामान्यांना दिसतात. मात्र त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, चेहरा किंवा इतर गोष्टींचा वापर स्वतःच्या व्यवसायवृद्धीसाठी केला जात असल्यामुळे अमिताभ बच्चन नाराज आहेत. अशा गोष्टींमुळे एका अभिनेत्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे सगळं लक्षात घेऊन न्यायालय अंतरिम आदेश देत असल्याचं न्यायाधीश नवीन चावला यांनी यावेळी सांगितलं.

लॉटरीसाठीच्या एका मोबाइल अ‍ॅप डेव्हलपरने अमिताभ बच्चन यांचा आवाज विनापरवानगी वापरला असल्याचं त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या म्हणजेच केबीसीच्या लोगोचाही गैरवापर होत असल्याचं यात म्हटलं आहे. केबीसीशी संबंधित पुस्तकं छापणारे, टी-शर्ट विकणारे व इतर व्यवसाय करणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांचा आवाज परवानगीशिवाय वापरता येऊ नये असं बच्चन यांच्या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुनावणी होणार आहे.

पर्सनॅलिटी राइट्स म्हणजे काय?

कोणतीही स्त्री किंवा पुरुषाला हा अधिकार असतो. लोकप्रिय व्यक्तींसाठी हा अधिकार खूप महत्त्वाचा मानला जातो. समाजात त्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर काही वस्तू किंवा व्यवसायामध्ये केला जातो. त्यामुळे अशा लोकप्रिय व्यक्तींनी स्वतःच्या नावाची नोंद पर्सनॅलिटी राइट्ससाठी करणं आवश्यक असतं.

भारतीय संविधानाच्या 21व्या परिच्छेदात गोपनीयता आणि प्रसिद्धीबाबत अधिकार दिलेला आहे. बौद्धिक संपदा कायदाही पर्सनॅलिटी राइट्स देतो. कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957मध्ये लेखकांना त्यांच्या लेखनाबाबत तसा अधिकार दिलेला आहे. त्यात अभिनेता, गायक, नर्तक, संगीतकार यांचाही समावेश आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये पर्सनॅलिटी राइट्सबाबत काही विशेष अधिकार नाहीत. अमेरिकेसारख्या देशात चुकीचं एंडॉर्समेंट केलं गेल्यास लोकप्रिय व्यक्तींना खास संरक्षण दिलं जातं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News