कमल हासनचं राजकारण रजनीकांतपेक्षा वेगळं कसं?

कमल हासनचं राजकारण रजनीकांतपेक्षा वेगळं कसं?

चित्रपटांप्रमाणेच, राजकारणातही दोघांची स्पर्धा आणि तुलना होणं साहजिकच. तामिळनाडूतले जाणकार सांगतात, रजनीकांत यांचा सामान्य माणसाशी कनेक्ट जबरदस्त आहे.

  • Share this:

अमेय चुंभळे,22 फेब्रुवारी : तामिळनाडूतले सुपरस्टार कमल हासन यांनी बुधवारी आपल्या पक्षाचं नाव घोषित केलं. मक्कळ नीधी मैय्यम, अर्थात लोकांसाठी न्यायाचं केंद्र. रजनीकांत यांनीही काही महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला. चित्रपटांप्रमाणेच, राजकारणातही दोघांची स्पर्धा आणि तुलना होणं साहजिकच. तामिळनाडूतले जाणकार सांगतात, रजनीकांत यांचा सामान्य माणसाशी कनेक्ट जबरदस्त आहे. त्यांची लोकप्रियता जाती, धर्म, लिंग आणि वय या सगळ्या पलीकडे आहे.

पण कमल यांचं तसं नाहीये. ते एका विशिष्ठ वर्गाशी, खासकरून आर्थिक आणि शैक्षणिकरित्या भक्कम असलेल्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. म्हणूनच, तिथे दुधाचा अभिषेक वगैरे आचरट प्रकार अलिकडे कमल हासन यांच्या चित्रपटादरम्यान होत नाहीत. त्यांनी सुपरहिट चित्रपट देऊनही बराच काळ लोटलाय.

नेमकं आताच हे दोघं राजकारणात का आले ? प्रमुख कारण - अम्मांची अकाली एक्झिट. अम्मा गेल्यावर तामिळनाडूच्या राजकारणात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालीये. त्यात, द्रमुकचे करुणानिधी आजारी असतात. त्यांची मुलं स्टालीन आणि अळगिरी यांचा तितकासा प्रभाव पडत नाही. मुलगी कनिमोळी दिल्लीतल्या राजकारणात रमतात. राहिली सत्ताधारी अण्णा द्रमुक. मुख्यमंत्री पलनीसामी हे मास लीडर नाहीत. उपमुख्यमंत्री पण्णीरसेल्वम यांचंही तसंच. मग उरलं कोण ? नेमक्या याच कारणामुळे रजनी आणि कमल आता राजकारणात आलेत.

रजनीकांतना भाजपचा छुपा पाठिंबा आहे, असंही बोललं जातं. त्यामुळे 2021 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रजनीकांत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात. तसंही, एमजीआर यांच्या रुपानं तसा पायंडा तिथे आहेच. प्रश्न एवढाच आहे, की फारसा मास बेस नसणारे कमल हासन या सगळ्या समीकरणांमध्ये कुठे बसतात?  येणारा काळच याचं उत्तर देऊ शकेल, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 02:56 PM IST

ताज्या बातम्या