VIDEO- 'माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...', 'वेडिंगचा शिनेमा'तलं हे गाणं एकदा पाहाच

VIDEO- 'माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...', 'वेडिंगचा शिनेमा'तलं हे गाणं एकदा पाहाच

हे गाणं डॉ. सलील कुलकर्णीचा मुलगा शुभंकरने गायले आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी ‘चिंटू’ चित्रपटात पहिलं गाणं गायलं होतं.

  • Share this:

मुंबई, १३ मार्च २०१९- संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत. नुकतेच या चित्रपटाचे तिसरे गाणे ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...कुणी जेवल्या वाचून नाही जायचं हं...’ रिलीज झाले. हे गाणं डॉ. सलील कुलकर्णीचा मुलगा शुभंकरने गायले आहे. पक्या शहाणे, परी प्रधानला लग्नाची मागणी घालतो आणि त्यांचं लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते आणि त्याचं निमंत्रण पक्याचे भाचे गाणे गाऊन देतात.

१४ वर्षाच्या शुभंकर सलील कुलकर्णीने हे गाणं गायलं आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी ‘चिंटू’ चित्रपटात पहिलं गाणं गायलं होतं. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे. प्रसेनजीत हा जेव्हा ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये सहभागी झाला होता, त्यावेळी सलीलने प्रसेनजीतला गाणं गाण्याची संधी देण्याचा शब्द दिला होता, तो या माध्यमातून सलीलने पूर्ण केला आहे.

पारंपरिक रीतीरिवाज ते आधुनिक पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. या दोघांची सांगड घालणं हे संपूर्ण कुटुंबासाठी तारेवरची कसरत असते. यातून मिळणारा आनंदही काही कमी नसतो. बहुचर्चित मराठी चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शिवाय, शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत.

त्यात ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘मुंबई पुणे मुंबई-2’, ‘मुंबई पुणे मुंबई-3’, ‘बॉईज-2’, ‘बापजन्म’, ‘आम्ही दोघी’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडियाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांचा समावेश आहे.

First published: March 14, 2019, 6:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading