मुंबई, 19 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर आणि अली अब्बाज जफर (ali abbas zafar) दिग्दर्शित वेब सीरीज 'तांडव'ला (Web Series Tandav) देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचां अपमान केल्याचा आणि जातिगत भावना भडकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे ही वेब सीरिज बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. विरोध पाहता अखेर या वेब सीरिजमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिग्दर्शक अली अब्बाज जफर यांनी ट्विट केलं आहे. तांडवमधील आक्षेपार्ह सीन बदलणार असल्याची पोस्ट त्यांनी केली आहे. तांडवच्या टीमकडून अधिकृतरित्या हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. पण कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असं या पत्रकात म्हटलं आहे. तसंच आवश्यक ते बदल करण्याचा निर्णयही घेतल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेब सीरीज तांडवच्या पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांना अमर्याद पद्धतीने दाखवून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवल्याचंही म्हटलं आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत वेब सीरीजविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
वेब सीरिजविरोधात देशभर विरोध होऊ लागला. काही राज्यांनी वेब सीरिजवर बंदीदेखील घातली. या सीरिजच्या बॅनबाबत होणाऱ्या मागणीनंतर महाराष्ट्रानेदेखील याबाबत भूमिका मांडली आहे.
'महाराष्ट्र सरकार हिंदू देवी देवतांचा अपमान सहन करणार नाही. कुणीही हिंदू-देवी देवतांबाबत चुकीचे वागावं अशी आमची अपेक्षा नाही. तसंच या प्रकरणात गृहमंत्री सर्व आरोप पडताळून पाहतील आणि गरज भासल्यास एफआयआर नोंदवला जाईल', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनी, या सीरिजमध्ये भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता झिशान अयू ब याला यासाठी माफी मागावी लागेल. तसंच सीरिजचे निर्माता दिग्दर्शक यांनी हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागायला हवी, असंही ते म्हणाले. त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल करीत सीरिजचे निर्माता, निर्देशक आणि अभिनेत्यांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली.