Home /News /entertainment /

'रामायण', 'महाभारत'नंतर ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

'रामायण', 'महाभारत'नंतर ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु करण्याचा ट्रेंड लॉकडाऊनमध्ये आहे. आता मराठीतली एक अतिशय गाजलेली मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर: कितीही नव्या वेब सीरिज किंवा चित्रपट प्रदर्शित झाले तरी जुन्या चित्रपटांची आणि मालिकांची मजा काही औरच असते. प्रेक्षकांची हीच नस ओळखून जुन्या मालिका पुन्हा सुरू करण्याचा ट्रेंड सध्या आला आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी गाजलेली एक धागा सुखाचा (Ek Dhaga Sukhacha) ही मालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एकेकाळी 'एक धागा सुखाचा' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेतून जगण्याबद्दलचा अतिशय सुंदर संदेश देण्यात आला होता. एका बंगाली मालिकेवरुन ही मराठी मालिका साकारण्यात आली होती. या मालिकेची कथा, पटकथा, संवाद आणि शीर्षक गीत अनिल हर्डीकर (Anil Hardikar) यांनी लिहिलं होतं आणि शीर्षक गीत प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी गायलं होतं. ही मालिका एखाद्या वाहिनीवर न दाखवली जाता क्लासिक मनोरंजन या यूट्यूब चॅनलवर दाखवली जाणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून या मालिकेचं प्रसारण सुरू होणार आहे. 1 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता पहिल्या भागाचं प्रसारण होणार आहे. आत्ताच्या मालिकांसारखी ही सीरिअल लांबलचक नसेल. केवळ 26 भागांची ही मालिका बघताना अनेक प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत तर तरुणाईला एखाद्या छान क्लासिक मालिकेचा आनंद घेता येणार आहे. एक धागा सुखाचा मालिकेत प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, जयंत सावरकर, उमेश कामत, विजय चव्हाण, सोनालिका जोशी, संतोष जुवेकर, चंद्रकांत गोखले, सुहास जोशी, नयनतारा, आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय कदम, अनिल हर्डीकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. त्यामुळे नेहमीच्या त्याच मालिका किंवा वेब सीरिज पाहून कंटाळला असाल तर निखळ मनोरंजनाचा आनंद नक्की घ्या.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Marathi entertainment, Serial

    पुढील बातम्या