मुंबई, 26 नोव्हेंबर : आपल्या भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काल त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
काल विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारण होत असल्याची बातमी समोर आली होती. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले असून उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढलं जाऊ शकतं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे, असं जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
विक्रम गोखले काही महिन्यांआधीच स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेच्या निमित्तानं विक्रम गोखले अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. विक्रम गोखले यांनी तुझेच मी गीत गात आहे मालिकेत पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा साकारली होती. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पिढीबरोबर काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्र मध्ये विक्रम गोखले यांनी मोरेश्वर अग्निहोत्री यांची भूमिका साकारली होती. मोरेश्वर काकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आजही अग्निहोत्र ही मालिका प्रेक्षकांना आवडते.
हेही वाचा - Abhijeet khandakekar:'अशा दिग्गजाबरोबर चित्रीकरण करताना'; विक्रम गोखलेंबाबत काय म्हणाला अभिजीत खांडकेकर?
विक्रम गोखले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्या भारदस्त अभिनयानं सिनेमाला चार चांद लावले. 'लागलं का पाणी मारूतीच्या पायाला' संपूर्ण सिनेमात त्यांच्या तोंडी हे एकच वाक्य ऐकायला मिळतं. पण ते एक वाक्य विक्रम गोखले यांनी ज्या पद्धतीनं सादर केलं आहे त्याला तोड नाही. सिनेमातील विक्रम गोखलेंच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 साली पुण्यात झाला. सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांची काम केलं आहे. अभिनयाबरोबरचं त्यांनी लेखन, दिग्दर्शन देखील केलं आहे. अनेक सिनेमांच्या समीक्षण ते करत होते. सध्या ते नवोदित कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण देत होते. 'एखादी तरी स्मितरेषा', 'खरं सांगायचं तर', 'जावई माझा भला', 'बॅरिस्टर', 'सरगम', 'स्वामी' ही त्यांची प्रसिद्ध नाटकं होती. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Vikram Gokhale : विक्रम गोखले झाले गायक; 'या' मालिकेतून टेलिव्हिजनवर जोरदार कमबॅक
'वासुदेव बळवंत फडके', 'लपंडाव', 'माहेरची साडी', 'नटसम्राट', 'ज्योतिबाचा नवस' सारखे प्रसिद्ध मराठी सिनेमे तर 'अग्निपथ' , 'खुदा गवाह', 'वजीर', 'हम दिल दे चुके सनम' सारख्या अनेक हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे. मराठी तसंच हिंदी टेलिव्हिजनवर देखील विक्रम गोखले यांनी दर्जेदार मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अकबर बिरबल', 'अग्नीहोत्र', 'कुछ खोया कुछ पाया', 'या सुखांनो या', 'संजीवनी', 'सिंहासन' सारख्या मालिका खूप गाजल्या.
विक्रम गोखले यांना 'अनुमती' या सिनेमातील भूमिकेसाठी 2013 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला होता. तर 'विष्णूदास भावे जीवनगौरव' पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय. 'पुलोत्सव' सन्मानाचे देखील ते मानकरी ठरले आहेत. 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्कारही त्यांच्या नावे आहे.
घशाच्या त्रासामुळे विक्रम गोखले यांनी नाटकात काम करणं सोडलं असलं तरी नव्या कलाकारांना नाटकाचं प्रशिक्षण देण्याचं काम ते करत होतं. त्यांच्या नाट्यसंस्था त्यांनी सुरू केल्या होत्या. तसंच दूरदर्शनवरील दुसरी बाजू हा कार्यक्रम ते होस्ट करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.