मुंबई, 26 नोव्हेंबर- गेल्या काही दिवसांपासून 'बी टाउन' (B-Town) मध्ये लगीनघाई सुरू आहे. बॉलिवूडमधल्या अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकण्याची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा हे विवाहबंधनात अडकले. त्यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत (Marriage) जोरदार चर्चा सुरू आहेत. दिग्दर्शक कबीर खानच्या घरी विकी आणि कतरिनाची 'रोका सेरेमनी' पार पडल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. डिसेंबर (2021) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोघे राजस्थानमधल्या जोधपूर शहरातल्या 'सिक्स सेन्स फोर्ट'मध्ये (Six Senses Fort) लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक नवीन बाब समोर आली आहे. विकी आणि कतरिना लग्न करणार नाहीत, असा खुलासा विकीच्या एका जवळच्या नातेवाईकानं दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखती केला आहे.
विकी आणि कतरिना यांचं लग्न होणार की नाही, हा गोंधळ सुरू असताना विकीच्या मावसबहिणीनं एक मोठं वक्तव्य केलं आहे. विकीची मावस बहीण (Vicky Kaushal's cousin) डॉ. उपासना वोहरा (Dr. Upasana Vohra) यांनी दैनिक भास्करला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये, विकी आणि कतरिना लग्न करणार नसल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. दोघांचं लग्न या फक्त मीडियामध्ये सुरू असलेल्या अफवा असल्याचं डॉ. वोहरा यांनी म्हटलं आहे. डॉ. वोहरा कौशल कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाशी संबंधित नवनवीन बातम्या दररोजयेत आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबाबत सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. काही जण दोघांचं लग्न होणार असल्याच्या बातम्यांना दुजोरा देत आहेत, तर काही जण नकार देत आहेत. अद्याप दोन्ही स्टार्स किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्या केवळ रिपोर्ट्सच्या आधारावर आहेत.
(हे वाचा:लग्नानंतर कतरीना जाणार सलमानसोबत; तर विकी कौशल काय करणार? असा आहे प्लॅन)
'दोघांच्या लग्नाच्या तयारीपासून ते लग्नाच्या तारखांपर्यंतच्या अनेक बातम्या मीडियामध्ये पसरल्या आहेत. अशा बातम्या निव्वळ अफवा आहेत. दोघे लग्न करणारी नाहीत. ते खरंच लग्नाचा विचार करत असते, तर त्यांनी नक्कीच जाहीर केलं असतं. बॉलिवूडमध्ये अनेकदा अशा अफवा उडतात आणि नंतर लक्षात येतं, की प्रकरण काहीतरी वेगळंच होतं. माझं काही दिवसांपूर्वीचं माझ्या भावाशी (विकी) बोलणं झालं आहे. लग्नाबाबत तो काहीही बोलला नाही. हा विषय मी जास्त ताणून धरणार नाही; पण विकी आणि कतरिना लग्न करणार नाहीत, ही गोष्ट मात्र खरी आहे,' अशी ठाम प्रतिक्रिया डॉ. उपासना वोहरा यांनी दिली आहे.
विकीच्या मावस बहिणीनं लग्नाचं वृत्त फेटाळलं असलं, तरी चाहते यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. लग्नाबाबत गुप्तता राखण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचं जाणकारांचं मत आहे. विकीच्या बहिणीचंही याच वर्षी लग्न झालं असून विकी आणि त्याचा भाऊ सनी (Sunny Kaushal) दोघेही या लग्नात सहभागी झाले होते.जोपर्यंत विकी कौशल आणि कतरिना कैफ स्वत: काही माहिती देत नाहीत, तोपर्यंत माध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या चर्चांना विराम लागणार नाही, ही गोष्ट नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal