वॉशिंग्टन, 17 ऑगस्ट : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केलं.
Legendary Indian classical vocalist & musician pandit #Jasraj ji has left his body for heavenly abode. Our prayer for departed soul. 🙏 pic.twitter.com/LlOBROdEWe
— Darshak Hathi (@DarshakHathi) August 17, 2020
पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ "पंडितजराज" असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज 90 वर्षांचे होते. न्यूजर्सीत शिष्य आणि परिवारासमवेत त्यांचं वास्तव्य होतं. आज सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल व्हायला मात्र त्यांनी नकार दिला. दीर्घश्वास घेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
पंडित जसराज यांना 2000 साली पद्मविभूषण सन्मान देण्यात आला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.
मराठी मातीशी नातं
हरियाणात जन्मलेल्या जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा मराठी आहेत. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी 1962 मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत.
भारताबरोबरच जगभरात पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. अमेरिका आणि कॅनडातही अनेक वर्षं त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे कित्येकांना दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.